नरेंद्र मोदी : ‘दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरुषम्’

    दिनांक : 17-Sep-2022
Total Views |
आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी वयाची ७२ वर्ष पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर आपल्या सामाजिक, राजकीय जीवनाची ५० वर्षे आणि प्रशासकीय कारकिर्दीची २१ वर्षेही पूर्ण करीत आहेत. त्यांचा हा सगळा प्रवास जेवढा संघर्षमय आहे तेवढाच प्रेरणादायीदेखील आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीत जन्म झाला तरीसुद्धा निर्धारपूर्वक प्रयत्न करून माणूस कुठे पोहोचू शकतो, ‘दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरुषम्’ असे म्हणण्याचा अधिकार स्वकर्तृत्वाने कसा व किती मिळवता येतो याचे मोदी मूर्तिमंत उदाहरण आहेत.
 
modiji1 
 
 
 
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातल्या वडनगर नावाच्या लहानशा गावात रेल्वे स्टेशनवर चहाचे दुकान चालवणार्या एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले मोदी आज जगातील अत्यंत प्रभावशाली नेत्यांपैकी एक गणले जातात. बालवयातच मोदींचा रा.स्व.संघाशी संबंध आला आणि तो आजतागायत कायम आहे. त्यांच्या जडणघडणीत संघाच्या संस्कारांचा व कार्यपद्धतीचा प्रचंड प्रभाव आहे. १९७१ साली त्यांनी रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम सुरू केले. त्या वेळेला त्यांच्यावर अहमदाबाद शहरामधील काही जबाबदार्या सोपवण्यात आल्या होत्या. त्या काळात गुजरातमधील विद्यार्थ्यांनी चालवलेले ‘भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण आंदोलन’ संघटित करण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
 
हे विद्यार्थी आंदोलन गुजरात, बिहार व देशाच्या अन्य भागात पसरत गेल्यानंतर तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली व आपल्या विरोधकांची सरसकट धरपकड करून त्यांना तुरुंगात डांबले. स्वाभाविकपणे आणीबाणीविरुद्ध देशात संघर्ष चालू झाला. रा. स्व. संघ व संघ परिवारातील अनेक कार्यकर्ते भूमिगत राहून हे आंदोलन चालवत होते. मोदींसुद्धा गुजरातमध्ये त्याच पद्धतीने काम करीत होते. हे आंदोलन चालवण्यासाठी संघाने ‘गुजरात लोकसंघर्ष समिती’ स्थापन केली होती. मोदी त्या समितीचे सरचिटणीस म्हणून काम पाहात होते. आणीबाणी संपल्यानंतर मोदींनी रा. स्व. संघाच्या कामात पुन्हा व्यस्त झाले व त्यांच्यावर १९७८ मध्ये ते बडोदा व सुरत या भागाचे ‘संभाग प्रचारक’ म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. १९७९ साली त्यांची नियुक्ती संघाच्या दिल्ली मुख्यालयात झाली. तेथून ते काही काळाने परत गुजरातमध्ये आले. याच काळात त्यांनी गुजरात युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्रात ‘एम.ए’ची पदवीही मिळवली.
 
१९८५ साली संघाने त्यांच्यावर गुजरातमधील भाजपच्या कामाची जबाबदारी सोपवली. १९८६ साली लालकृष्ण अडवाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर मोदींवर गुजरात भाजपच्या संघटनमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली गेली. त्यानंतर १९८७ साली झालेली अहमदाबाद महापालिकेची निवडणूक भाजपने पहिल्यांदाच पण भरघोस बहुमत मिळवून जिंकली. त्याचे श्रेय मोदींच्या संघटन कौशल्याला दिले गेले. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. १९९० साली भाजपच्या ‘राष्ट्रीय निवडणूक समिती’ या सर्वोच्च समितीवर त्यांची नेमणूक झाली. लालकृष्ण अडवाणी यांची ‘राम रथ यात्रा’ व मुरली मनोहर जोशी यांची ‘एकता यात्रा’ आयोजित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
 
१९९५ साली गुजरात विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यात मोदींच्या नियोजनाचा व संघटनकौशल्याचा मोठा वाटा होता. त्याचवर्षी त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली गेली. त्यानंतर १९९८ साली गुजरात विधानसभेची झालेली निवडणूकसुद्धा भाजपने केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीरित्या जिंकली, त्यामागेदेखील मोदींची व्यूहरचना होती. गेली २७ वर्षे गुजरातमध्ये भाजपचा एकहाती प्रभाव आहे आणि तो पुढेही कायम राहील अशीच लक्षणे आहेत. मोदींनी उभी केलेली पक्षाची संघटना आणि सरकारच्या लोककल्याणकारी कारभाराची तयार केलेली कार्यशैली या दोन गोष्टींचा हा परिणाम आहे.
 
त्यानंतर काही काळातच भाजपच्या राष्ट्रीय संघटनमंत्री पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मोदींवर सोपवली गेली. २००१ मध्ये भूज येथील भूकंपामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेला कोणी सांगण्याची वाट न पाहता मोदी कच्छमध्ये उतरले आणि त्यांनी मदतकार्याला चालना दिली. गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री केशुभाई पटेल ती परिस्थिती हाताळण्यात कमी पडले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध संपूर्ण गुजरातमध्ये असंतोष होता.
 
ती परिस्थिती लक्षात घेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरातमध्ये नेतृत्वबदल करण्याचा निर्णय घेतला व मोदींवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. विधानसभेच्या निवडणुकांना एक वर्षांपेक्षा कमी काळ बाकी असताना त्यांनी दि. ७ ऑक्टोबर, २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दि. २४ फेब्रुवारी, २००२ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत ते राजकोट मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर लढवलेली विधानसभेची अथवा लोकसभेची प्रत्येक निवडणूक त्यांनी जिंकली आहे. त्यातही वैशिष्ट्य हे आहे की, स्वत: प्रत्येक निवडणूक जिंकत असताना त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्या पक्षाला राज्यात आणि देशात पूर्ण बहुमतदेखील मिळवून दिले आहे.
 
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विकासाच्या राजकारणावर भर दिला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात गुजरातचा विकास जलदगतीने झालेला पाहायला मिळाला. त्यांच्या या कामगिरीचा परिणाम म्हणून २०१४च्या लोकसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच २८२ जागा जिंकून भाजपने लोकसभेत स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवले. त्याचा परिणाम म्हणून मोदींनी २६ मे रोजी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चे नेते या नात्याने पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
 
भारत स्वतंत्र झाल्यानंतर जन्माला आलेल्या पिढीतून पंतप्रधान होणारे ते पहिले होते. २०१९ साली आणखी एक विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला. त्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा जिंकत असताना भाजपने पूर्वीपेक्षा अधिक जागादेखील जिंकल्या. दि. ३० मे, २०१९ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ पुन्हा घेतली तेव्हा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर निवडणुका जिंकणारे ते पहिले बिगर काँग्रेस पंतप्रधान ठरले. त्यानंतरचा सगळा इतिहास ताजा आहे.
 
गेल्या आठ वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर दोन ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था म्हणून उभे राहायला आपल्याला तब्बल ६२ वर्षे लागली होती. पण, त्यानंतरचा एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा मात्र आपण अवघ्या आठ वर्षांत गाठला. आज आपली अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडून पुढे गेली आहे. याच काळात सगळ्या जगाप्रमाणे आपल्यालाही कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागला. आपल्या देशाच्या आरोग्य सेवेसमोर उभे राहिलेले ते एक बिकट आव्हान होते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेसाठी तो फार मोठा झटका होता. पण, मोदींनी त्या आव्हानाचेही संधीत रुपांतर करण्यात यश मिळवले. आज आपली अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात असून अलीकडेच इंग्लंडला मागे टाकून आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था या स्थानावर झेप घेतली आहे.
 
आजवर आपल्या देशात अनेक जीवघेण्या रोगांच्या साथी येऊन गेल्या. त्या प्रत्येक वेळेला प्रतिबंधात्मक लसींसाठी आपण विदेशांवर अवलंबून होतो. यावेळेला मात्र मोदींनी पुढाकार घेऊन स्वत:च्या देशात, स्वत:ची लस निर्माण करण्यावर भर दिला. त्यासाठी सरकारी व खासगी संस्थांना संशोधन करायला प्रोत्साहन दिले व त्यात आवश्यक असलेली गुंतवणूक सरकार म्हणून केली. त्या कामात वेळोवेळी स्वत: लक्ष घालून काम कुठेही रखडणार नाही, रेंगाळणार नाही याची काळजी घेतली. त्याचा परिणाम म्हणून स्वत:ची कोरोना प्रतिबंधक लस असलेल्या जगातल्या मोजक्या १०-१२ देशांमध्ये आपण आज आहोत. त्यातही भारतासह केवळ चारच देश जगात असे आहेत की, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त कोरोनारोधक लसी आहेत. कोरोनाच्या काळात आपण २०० कोटी मात्रा आपल्या देशातल्या नागरिकांना दिल्या आणि त्याखेरीज जगातील १०१ देशांना २५४४.१५२ लाख मात्रांचा पुरवठा केला. याच काळात आपल्या देशातल्या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवल्या गेल्या.
 
याच काळात भारताची अन्य क्षेत्रामधील निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे आज आपल्याकडे सोने व परकी चलन या दोहोंचा विक्रमी साठा आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये आपले शेती उत्पादन दुप्पट झाले असून, त्याच्या जोडीला शेती उत्पादनां वरप्रक्रिया करणारे उद्योगही उभे राहायला लागले आहेत. अनेक लोककल्याणकारी योजना राबवून त्यांच्या माध्यमातून करोडो कुटुंबांना दारिद्य्ररेषेच्या वर आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. ग्रामीण भागाचे संपूर्ण विद्युतीकरण, घरोघरी स्वच्छतागृहे, खेड्यापाड्यातील रस्त्यांपासून आंतरराज्य राष्ट्रीय महामार्गांपर्यंतच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे कामही या काळात मोठ्या प्रमाणावर झाले. गेल्या आठ वर्षांमध्ये भारताच्या कोणत्याही नागरी वस्त्यांवर दहशतवादी हल्ले किंवा बॉम्बस्फोट झालेले नाहीत.
 
या सगळ्याच्या जोडीला गेल्या आठ वर्षांमध्ये आपले आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान चांगलेच उंचावले आहे. ‘क्वाड’च्या माध्यमातून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर हातमिळवणी करून आपण एक नवी लष्करी ताकद उभी केली आहे. चीनच्या दादागिरीला खंबीरपणे तोंड देत असतानाच पाकिस्तानला जगाच्या व्यासपीठावर एकटे पाडण्यात आपण यशस्वी झालो आहोत. एकंदरीतच मोदींच्या नेतृत्वाखाली आपण चौफेर प्रगतीची वाटचाल करीत आहोत.
आज वयाची ७२ वर्षे पूर्ण करणार्या मोदींना देशभरातील जनतेबरोबरच हार्दिक शुभेच्छा देऊ या!!!
 
माधव भंडारी
 
(लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत.)