मकर संक्रांती

    दिनांक : 14-Jan-2022
Total Views |
ज्ञानमंथन
 
मकर संक्रांती हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.
 

JTB-Makar Sankranti 
 
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या २३.५ दक्षिण या अक्षांशावर लंबरुपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकणे. इसवीसनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण ( प्रवेश) करत असे, त्यामुळे साडेतेविस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले.पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात 21-22 डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन (अक्षाभोवती फिरणे) गतीमुळे सूर्याच्या मकर संक्रमणाची तारीख पुढे पुढे जात राहिली. अशी भौगोलिक नोंद केलेली आढळून येते. साहजिकच या कारणाने हिंदूंच्या मकरसंक्रांत हा सणाची तारीख बदलत राहिली. इंग्रजी महिन्यानुसार हा दिवस बहुधा १४ जानेवारी रोजी येतो परंतु,दर काही वर्षांनी ही तारीख मागे पुढे झालेली दिसून येते. याचे कारण म्हणजे पृथ्वीच्या परिभ्रमणानुसार वर्ष हे मुळात ३६५.२४ दिवसांचे असते. परंतु आपण ३६५ दिवसांचेच धरतो,म्हणून सौर कालगणनेनुसार काही वर्षांत संक्रांतीचा दिवस १-२ दिवस पुढे किंवा मागे झालेला दिसून येतो.
 
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटले जाते.मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो.सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर या गोलार्धात फिरत असतो.
 
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट बघत पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान मिळालेले होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला. उत्तरायण हे भारतीय परंपरेत पूर्वापार पासून असलेले पर्व आहे याचा दाखला देणारा हा प्रसंग आहे. भारतीय परंपरेत उत्तरायणचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.
 
संक्रांती बाबतीत समाजात काही समजुतीही दिसून येतात.संक्रांती ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. ज्योतिषीय प्रमाणानुसार कधी तिचे वाहन हत्ती,कधी गाढव तर कधी वराह असल्याचे सांगितले जाते.
 
मकर संक्रांती हा सण पूर्ण भारतभर तसेच भारताबाहेरील देशांत देखील साजरा केला जातो. फक्त प्रदेशानुसार सणाचे नाव,दिवस आणि पद्धतीत बदल झालेला दिसून येतो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यांस भोगी, संक्रांती आणि किंक्रांती ( संक्रांती करिदिन) अशी नावे आहेत.
 
मकर संक्रांतीचा आधीचा दिवस महाराष्ट्रात ' भोगी ' य नावाने ओळखला जातो. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो.य दिवशी सकाळी आपले घर त्याचप्रमाणे घरभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. अंगणात रांगोळी काढतात.घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात.महिला नवीन अलंकार धारण करतात.सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंग भाज्या, फळ भाज्या यांची तिळाचा कुट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी,लोणी,पापड, वांग्याचे भरीत,चटणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात. प्रथम देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवा बसतात. परंतु आपापल्या प्रथेनुसार घरा-घरांत काही प्रमाणात वेगळेपण दिसून येते.
 
मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवी पुराणातील श्लोक याचा दाखला देतो.
 
" संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवैः |
तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनि | | "
 
अर्थात् मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात, त्या-त्या वस्तू सूर्य देवता त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो.
 
सुघटात गहू,उसाचे तुकडे,हळकुंडे, कापूर,बोरे,द्रव्य घालून ते दान देण्याची प्रथा आहे.
 
मकर संक्रांतीच्या दिवसापासून विवाहित स्त्रिया एकत्र येऊन हळदी-कुंकू चा समारंभ करतात,तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काही तरी वस्तू भेट देण्याची प्रथा आहे. याला वाण असे म्हटले जाते.या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात.मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात आणि काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असतात.कले वस्त्र परिधान करण्यामागे असे शास्त्रीय कारण सांगितले जाते.
 
संक्रांतीला तीळाचे फार महत्व आहे.या दिवशी तिळगुळाच्या पोळीलाही विशेष महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो म्हणून अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ली जाते.तसेच बाजरीची भाकरी,लोणी इत्यादी इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात.स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा संक्रांतीच्या या दिवशी तिळगुळाची देवाण-घेवाण करायची,स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे.जुने असलेले समृद्ध करायचे,तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा उद्देश असतो.
 
संक्रांतीचा दुसरा दिवस "किंक्रांत"(करीदिन) म्हणून ओळखला जातो.संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार करून त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. अशी अख्यायिका आहे.पंचांगात हा दिवस करीदिन मानला जातो.या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही अशी मान्यता आहे.
 
महाराष्ट्रा बाहेरही मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्व आहे.हिमालयातील देवप्रयाग, किर्तीनगर, व्यासघाट येथे संक्रांतीच्या निमित्ताने मेळे भरतात.अनेक भाविक गंगा स्नान करतात.दक्षिणेतही ताम्रपर्णी नदीमध्ये स्नान करण्यासाठी अनेक लोक तिरुवनवेल्ली जिल्ह्यामध्ये जात असतात.केरळमधील शबरीमला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविक येतात. "दक्षिण भारतात" हा दिवस "सूर्य पोंगल" किंवा "भोगी पोंगल" म्हणून साजरा करतात.तेथे या दिवशी इंद्रदेवतेची पूजा आराधना केली जाते. मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण करून आप्तजनांसह भोजन करण्याची प्रथा आहे. भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात आणि भावाला ओवाळतात असेही सांगितले जाते."गुजरात" आणि "राजस्थान" मध्ये मकरसंक्रांतीचा दिवस "उत्तरायण" म्हणून ओळखला जातो. गुजरातमध्ये या दिवशी घरोघरी पतंग उडवतात. येथील पतांगोत्सव (पतंगबाजी) पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजरातला भेट देतात."उत्तर भारतातील" हिमाचल प्रदेशात संक्रांत "लोहडी" म्हणून साजरी केली जाते. तर ''पंजाब'', या भागात १३ जानेवारी या दिवशी "लोहडी" हा सण शेतातून आलेल्या पिकांच्या उत्पन्नाचा आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. पूर्व भारतातील "बिहार" मध्ये "संक्रांती" ,"आसाम"मध्ये 'भोगली बिहू' "प.बंगाल" आणि "ओडिसा" मध्ये " मकर संक्रांती" म्हणून ओळखला जातो. भारताबाहेर बघितल्यास, नेपाळ मध्ये थारू लोक माघी तर अन्य भागात माघ संक्रांती म्हणून साजरा करतात.अशा प्रकारे नेपाळ व्यतिरिक्त अन्य देशांतही संक्रांती वेगळ्या नावाने आणि वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
 
मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्य देवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते.भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून असते.मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका,ऊस,भुईमूग इ.घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते आणि घराघरांत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. यामुळे शास्त्रीय,वैदिक आणि भौतिक कारणांनी युक्त असा आनंदोत्सव म्हणून मकर संक्रांती हा सण सर्वत्र( भारतभर आणि भारताबाहेरही) आपापल्या परंपरेनुसार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
 
                                                                                                                                                  - - भूमिका कानडे
                                                                                                                                                    ज्ञानमंथन संयोजक, 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव