मोरगाव खुर्द गाव शिवारात ५ नाल्यांचे जबरदस्त खोलीकरण

    दिनांक : 20-Feb-2019
मोरगाव खुर्द गाव शिवारात ५ नाल्यांचे जबरदस्त खोलीकरण
पहिल्याच वर्षी २ कोटी ८० लाख लिटर पाणी साठवण क्षमता: १८० तास पोकलँडद्वारे अहोरात्र चालले काम
 
 
 
  •  केलेले खोलीकरण पहिल्याच पावसात तुडूंब
  • ४ हजार ब्रास गाळ, मुरूम यांचा उपयोग शेती, रस्ता बांधणीसाठी
  • गावशिवारातील जलपातळी वाढण्यास मदत
  • लवकरच ग्रामस्थ गती देणार उर्वरीत खोलीकरण, रूंदीकरणाला 
 
 
मोरगाव खुर्द ता.रावेर
अहोरात्र १८० तास पोकलँडद्वारे ५ नाल्यांचे ११८० मीटर लांब आणि सुमारे १० फूट खोल, १५ फूट रुंंद असे जबरदस्त खोलीकरण करुन सुमारे २ कोटी ८० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण केली आहे मोरगाव खुर्द गावाने. २६ मे ते ८ जून या अवघ्या ११ दिवसातील या १८० तासांच्या कामाने, जलअभियानाने येत्या काही वर्षातच पाणी टंचाई दूर होऊ शकते, याचे आनंददायी संकेत दिले आहेत.
 

 
 
या कामी या गावाचे थोर सुपुत्र आणि इंदोरचे प्रसिद्ध उद्योेजक उद्योगपती रतिराम सिताराम/ आर.एस.पाटील यांनी एकट्याने दिलेले ७५ हजार रु. नंतर पुढे येत कष्टाळू, जल व शेतीप्रेमी ८-१० शेतकर्‍यांनी दिलेले सुमारे ५० हजार रु. आणि औरगांबादच्या महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानने दिलेल्या २ लाख ८० हजार रु. निधीद्वारे या कामाला बळ मिळाले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जलगती विधीचे प्रांतमंडळ सदस्य महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ या संस्थेने नियुक्त केलेले जलप्रेमी सागर धनाड यांच्या मार्गदर्शनानुसार ही जलक्रांती होऊ पहात आहे. जलगती विधीचे रावेर तालुका प्रमुख जीवन सोनार तसेच भुसावळ तालुक्याचे दत्तात्रय मोहिते (वाकोद) यांचेही याकामी योगदान लाभले आहे.
 
 
रावेर या तालुकास्थानापासून सुमारे १८ किलोमीटरवरील मोरगाव खुर्द हे गाव सुमारे २ हजार वस्तीचे कसदार काळ्या जमिनीचे, अर्थात प्रामुख्याने केळी आणि ऊस पिकविणारे. साहजिकच भौतिक दृष्ट्या समृद्ध आणि विशेष गौरवास्पद म्हणजे दानतीच्याबाबतही... गावात जिल्हा बँक, पोस्ट, फक्त दहावीपर्यंत शाळा आहे. मात्र कष्टाळू शेतकरी परिवारातील मुलांनी उच्च शिक्षण घेत अनेक शहरी स्थायिक होत उद्योगव्यवसायात गरुड झेप घेतली आहे. त्यातील अनेकांनी ऋणभावना कायम राखत या कामी यथाशक्ती सहकार्य केलेले आहे.
 
 
नालाखोलीकरण
आधी ११ दिवस केलेली ही कामे आणि नंतर पहिल्याच पावसात, पहिल्याच वर्षी एकदाच झालेल्या जोरदार पावसाने हे नदी नाले तुडूंब भरले. तहानलेल्या जमीनीने काही तासांतच लाखो लिटर पाणी जिरले. या कामांमुळे नागरिक आनंदचकित झाले, यामुळे भविष्यात या चळवळीला अधिक व्यापक स्वरुप येणार आहे. जलसंधारणाची ही कामे अशी- गावशिवारातील स्मशानभूमी ते वाघोड रेल्वेलाईनपर्यंत ४०० मीटर ( ३ हजार ब्रास माती काठावर आणि ५० ते १०० शेतकर्‍यांना १०० रु. ट्रॉलीभराई या दरात पुरविण्यात आली. साठवण क्षमता दीड कोटी लिटर, बसस्थानक ते ग्रामपंचायत बोरवेल- २०० मीटर, व्ही.टी.लांडगी ते खिरवड रस्ता- २०० मीटर असे रुंदीकरण,खोलीकरण करण्यात आले. ७०० ब्रास माती वा गाळ वा मातीचा उपयोग रस्ता करण्यासाठी झाला. साठवण क्षमता ५० लाख लिटर.
 
 
लांडगी ते धुळे आमराई- १०० मीटर, जुनी पांडी- १०० मीटर तसेच जुन्या मातीच्या बंधार्‍याचे खोलीकरण १० फूट खोल आणि १५ फूट रुंद केलेले आहे. पाणी वाहून वाया जाऊ नये, यासाठी येथील विचारी मंडळीने २०० ते २५० फूट अंतरावर कप्पे, उंचवटे (बॉक्स) केलेले आहेत. यामुळे पाणी जिरत राहील, भूजलपातळी वाढत राहील.या कामी ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सद्गुरु सेवेकरी यांचेही मौलिक सहकार्य लाभले आहे.जामनेरचे गोसावी यांनी वाजवी दरात पोकलॅड दिले. २२००लिटर, पावणेदोन लाखाचे डिझेल लागले.
 
 
भविष्यात म्हणजे येत्या काही दिवसातच तिघारा नाला, पांडी नाला, खारक्या नाला आणि भोकर नदीचे जेवढे अधिकाधिक खोलीकरण करण्याचा संकल्प गावकर्‍यांनी सोडला आहे. पुढचा पावसाळा भरपूर होवो, आणि परिसरात कधीच पाणी टंचाई जाणवणार नाही.
 
 
भविष्यात समृद्धी, आनंद, समाधानाचे हे चित्र अनेक व्यक्ती आणि गावांचे प्रेरणास्थान ठरेल.
नाला खोलीकरणासह स्मशान भुमी रस्ता, परिसरातील जागेचे सपाटीकरण बसण्यासाठी सुंदर आणि टिकावू बाकडे, परिसरात भारतीय संस्कृतीनुसार दिर्घकाळ टिकणार्‍या वृक्षांचे वृक्षारोपण गांवातील हनुमान मंदिराचा जिर्णोध्दार आणि त्यात राम,लक्ष्मण व सीता यांच्या सुबक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, व दुसर्‍या मजल्यावर भव्य सभागृह, सदगुरू उपासना केंद्र, रूग्णांसाठी आरोग्य शिबीर ही कामे ही लोकसभागातून झालेली आहेत. भविष्यात बहुउद्देशिय हॉल सौरउर्जेवर चालणारे पथदिवे इत्यादी सुधारणा करण्याचा गावाचा संकल्प आहे.
 
 
पैशाचा काटेकोर विनियोग
जे.आर.पाटील हे कमिन्स कंपनीतील निवृत्त जवान, सैनिक असून ते ३५ वर्ष सेवेत होते, निवृत्तीनंतर ते गावीच स्थायिक झाले असून अतिशय समर्पण भावनेने गावाचे रंगरुप पालटण्यासाठी झटत आहेत. ते जनतेच्या पैशाचा विनियोग विधायक कामीच व्हावा, यासाठी दक्ष असतात. ते कोणताही, साधा चहाचा खर्चही ते होऊ देत नाहीत.
 
 
आर.एस.पाटील यांच्या औदार्यांमुळे चालना..
या गावाचे थोर सुपुत्र आणि इंदोरचे प्रसिद्ध उद्योेजक उद्योगपती रतिराम सिताराम/ आर.एस.पाटील यांनी एकट्याने दिलेले ७५ हजार रु. त्यांच्या पुढाकाराने ‘भोकर नदी परिसर विकास संस्था’ १९ मे २०१८ रोजी स्थापत तिची नोंदणी करण्यात आली. अध्यक्ष आहेत जगन्नाथ रावजी तथा जे.आर.पाटील, सचिव बाळकृष्ण काशिनाथ पाटील (रावेर न्यायालयात वेंडर),सहसचिव-संदीप बळीराम चौधरी, उपाध्यक्ष विनोद विश्‍वनाथ पाटील व कैलास दामोदर पाटील, सदस्य-आत्माराम रामचंद्र पाटील आदींनी या कामी स्वत:ला झोकून दिले आहे.
 
 
संपर्क- जे.आर.पाटील.
९५११७८२६६३