भारताला केंद्रस्थानी आणणारे भाषण

    दिनांक : 06-Oct-2022
Total Views |

 
सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात इतरही अनेक मुद्दे मांडले. मात्र, त्या सर्वच मुद्द्यांचा केंद्रबिंदू भारत, भारतीयत्व, भारताची प्रगतीच होता. त्यासाठी काय करायला हवे, याचे मार्गदर्शन डॉ. मोहनजी भागवत यांनी केले व संघाची वाटचालही त्यानुसारच सुरू राहील.
 
 
 
 
 

mohanji 
 
 
 
 
 
“भारत प्राचीन, एक राष्ट्र असून भारतीय ओळख व परंपरेत सहभागी होऊन आपापल्या वैशिष्ट्यांसह परंपरांसोबत राहून प्रेम, सन्मान, शांतिभावाने नि:स्वार्थपणे राष्ट्रसेवा करत राहू. परस्परांच्या सुख-दुःखाचे साथीदार होऊ, भारताची ओळख करून घेऊ, भारतीय होऊ. हीच एकात्म, समरस राष्ट्राची संघाची संकल्पना आहे, यामध्ये संघाचा कोणताच स्वार्थ किंवा उद्देश नाही,” अशा स्पष्ट शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी विजयादशमी उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मांडली, तसेच संघाला आपले न मानणार्‍यांनाही राष्ट्रनिर्माणात एकत्वाच्या भावनेने सहभागी होण्याचे आवाहन केले. सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात इतरही अनेक मुद्दे मांडले. मात्र, त्या सर्वच मुद्द्यांचा केंद्रबिंदू भारत, भारतीयत्व, भारताची प्रगतीच होता. त्यासाठी काय करायला हवे, याचे मार्गदर्शन डॉ. मोहनजी भागवत यांनी केले व संघाची वाटचालही त्यानुसारच सुरू राहील.
 
मात्र, गेल्या काही काळापासून सर्व समाज घटकांकडून रा. स्व. संघाशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला जात असून त्याला संघाकडूनही प्रतिसाद दिला जात आहे. त्याची पार्श्वभूमीदेखील सरसंघचालकांच्या विजयादशमी संबोधनामागे व त्यातील संदेशामागे आहे. त्यातला सर्वाधिक चर्चिला गेलेला संवाद म्हणजे, सप्टेंबरमध्ये ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’च्या आमंत्रणावरून डॉ. मोहनजी भागवत यांनी घेतलेली ‘इमाम उमर अहमद इलियासी’, दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग व अन्य मुस्लीम बुद्धिजीवींची भेट. रा. स्व. संघाने धर्मांध, कट्टरपंथी, मूलतत्त्ववादी मुस्लिमांविरोधात नेहमीच भूमिका घेतली. पण, सर्वसामान्य मुस्लिमांशी, देशाच्या संस्कृतीला आपले मानणार्‍या मुस्लिमांशी, भारताला भारत म्हणूनच राहू देऊ इच्छिणार्‍या मुस्लिमांशी संघाचा वाद नाही. त्यालाच अनुसरुन सरसंघचालकांनी मशीद व मदरशात जाऊन मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्याला कारणही तसेच आहे.
 
आज हिंदूंसमोरचे वर्षानुवर्षे, दशकानुदशके, शतकानुशतकांपासूनचे संघर्षाचे प्रश्न संपल्यात जमा आहेत. अर्थात, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हिंदूंना स्वातंत्र्यानंतरही तब्बल 70-75 वर्षांचा काळ लागला. इतकी वर्षे संघर्ष केल्यानंतर गेल्या आठ वर्षांत नरेंद्र मोदी देशाच्या सत्तास्थानी आल्यापासून त्या प्रश्नांची सोडवणूक केली गेली. त्यात अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिर उभारणीचा प्रश्न महत्त्वाचा होता. आता तर काशीतील विश्वनाथाच्या पुनर्स्थापनेचा संघर्षदेखील न्यायालयीन मार्गाने सुरू आहे. त्यासाठी अर्थातच मुस्लिमांच्या मर्जीची आवश्यकता नाही किंवा मुस्लिमांच्या मर्जीशिवाय सुटणारा तो प्रश्न आहे. कारण, स्वतः न्यायालयच त्या विषयाची दखल घेत आहे. पण, दुसर्‍या बाजूला सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात राजस्थानच्या उदयपूरमधील कन्हैयालाल यांच्या निर्घृण हत्येचाही उल्लेख केला. मुस्लिमांतील काही प्रमुख व्यक्तींनी त्या घटनेचा निषेध नोंदवला. पण, निषेधाची भावना अपवादात्मक राहू नये, तर अधिकाधिक मुस्लिमांचा तसा स्वभाव व्हायला हवा, असे डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. त्याला कारण भारतासमोर एक देश म्हणून भविष्यात उभे ठाकणारे प्रश्न आणि त्याच्या सोडवणुकीसाठी एकभावनेच्या समाजनिर्मितीचे आहे.
 
वरील सर्व घटनांची पार्श्वभूमी लक्षात घेता सरसंघचालक समाजासमाजात सर्वसमावेशक संभाषणाच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत असल्याचे दिसते. देशात दोन समाजादरम्यान तयार झालेले भीतीचे, संशयाचे वातावरण संवाद साधूनच दूर केले जाऊ शकते. त्यासाठी रा. स्व. संघ कर्तव्य भावनेने पुढाकार घेत आहे. कारण, एकसंध समाजाशिवाय राष्ट्रनिर्माणाचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही आणि राष्ट्रनिर्माण हे संघाचे ध्येय आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय स्तरावर कार्यरत आहेत, तर डॉ. मोहनजी भागवत सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक स्तरावर. त्यातूनच आपला धर्म, परंपरा, उपासनापद्धती वेगवेगळी असली तरी माणुसकीचा धर्म महत्त्वाचा आहे आणि या सगळ्यातही राष्ट्र सर्वोपरी आहे, अशी प्रतिक्रिया मुस्लिमांतूनही उमटू लागली आहे. म्हणूनच तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावाद्यांनी कितीही टीका केली तरी इमाम इलियासी सरसंघचालकांच्या सुरात सूर मिसळत भारताला, भारतीयत्वाला बळकट करण्याची भाषा करत आहेत. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य असून आपण सर्व एक आहोत, एकच राहू, सर्वांना एकतेची आवश्यकता आहे, असे ते म्हणत असल्याचे दिसते. दोन्ही समाजात सुरू झालेल्या संवादाचा हा परिणाम असून त्यातून आणखीही उत्तमोत्तम गोष्टी घडण्याची शक्यता निर्माण होते.
 
ते रा. स्व. संघाच्या मदतीमुळेच होऊ शकते आणि याची जाणीव मुस्लिमांनादेखील आहे. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातली सर्वात मोठी बिगर सरकारी संस्था असून त्याच्याशिवाय देशात बंधुभावाची स्थापना होऊ शकत नसल्याचे नजीब जंग म्हणाले. दोन्ही समाजादरम्यान सहमती तयार होणार नाही, असा मुद्दा नाही. दोन्ही समाजात जो विरोधाभास, गैरसमज, अंतर आहे ते दूर करण्यासाठी संवाद साधणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही व संघाने घेतलेल्या पुढाकारामुळे 90 टक्के लोक खुश आहेत, असे म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, भारताची जसजशी जगभरात पत-प्रतिष्ठा वाढत आहे, शक्ती वाढत आहे, तसतशी चारी बाजूला बसलेल्या शत्रूंचीही चुळबुळ वाढत आहे. एका बाजूला पाकिस्तान तर दुसर्‍या बाजूला चीनसारखे कुरापतखोर देश असताना भारताला शक्तिशाली करणे गरजेचे आहे अन् त्यासाठी देशातील सर्व समाजघटकांत संवाद, सामंजस्य असणे गरजेचे आहे. बलशाली भारताच्या उभारणीचा उद्देश असलेली संस्थाच त्या दिशेने पावले उचलू शकते व सध्याच्या घडीला रा. स्व. संघाशिवाय तसे कोणी दिसत नाही. डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हणूनच संवादासाठीच्या आमंत्रणाला प्रतिसाद दिला व त्यांच्या विजयादशमीच्या संबोधनातही भारतच केंद्रस्थानी होता. त्यासाठीच त्यांनी परस्परांच्या सुख-दुःखाचे साथीदार होऊ, भारताची ओळख करून घेऊ, भारतीय होऊ, असे म्हटले.