वडिल पहिल्या तर मुलगा शेवटच्या बॅचमध्ये सत्त्याग्रही...
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019

जळगावचे श्रीकृष्ण नाईक १७ महिने कारावासात, तर विजय ४५ दिवस बंदी

 
 
 
देशभर अटक व दमनसत्रात हजारो संघस्वयंसेवकांना आणि विरोधकांना डांबले होते... ते घरी कधी परततील?...याची शाश्‍वती नाही!... अशा भयावह आणीबाणीच्या काळ्याकुट्ट कालखंडात घरदार, शिक्षण आणि आयुष्य पणाला लावले होते, जळगावातील उच्चशिक्षित अन् अवघ्या विशीतल्या ८ सत्त्याग्रही गटातील महाविद्यालयीन युवा ३७ स्वयंसेवकांनी. त्यात काही तर विद्यालयीनही होते.
 


यातील पहिल्या तुकडीत होते श्रीकृष्ण काशिनाथ नाईक (तेव्हा रहिवास जळगावच्या बँक स्ट्रीट, नवीपेठ, सांगली बँकेच्यावर ) आणि आठव्या शेवटच्या १७ फेब्रुवारीच्या तुकडीत होते त्यांचे सुपुत्र विजय (रहिवास सध्या रिंगरोडवरील ब्रुक बॉंड कॉलनीत) तसेच व.वा.जिल्हा वाचनालयासमोरील ‘सेवाश्रम’ लॉजवास्तूतील रहिवासी देवेश्‍वर अनंत कासखेडीकर. (रहिवास सध्या शिवाजीनगर, पुणे)
 
 
नाईक पिता-पुत्रांनी सत्त्याग्रह करीत अनुक्रमे १७ महिने, दीड महिना कारावास भोगला. विजय यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ चा. टेबलटेनिस, बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो, बॉस्केटबॉलचे ते महाविद्यालय स्तरावरचे खेळाडू.
 
 
‘आणीबाणी मुर्दाबाद, जयप्रकाश नारायण झिंदाबाद, भारत माता की जय, संघावरील बंदी रद्द करा, स्थानबद्ध कार्यकर्त्यांना मुक्त करा’ या घोषणांचे फलक गळ्यात अडकवलेले आणि अशाच जोरदार घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून टाकला आणि घोषणा देत देतच ते प्लॅटफॉर्मवर पोहोचले...अन् तेथे चकराही मारल्या. महाराष्ट्र एक्स्प्रेस, सुरत-भुसावळ व भुसावळ-सुरत अशा ३ गाड्यांमध्ये प्रवाशांना ४०० वर पत्रकं वाटत शेकडो जनतेपर्यंत आपला विचार पोहोचवण्यात ते यशस्वी होत होते. अर्ध्या तासाने जिल्हा पेठ पोलिसांची जीप आली आणि ४ पोलिसांनी या दोघांना पकडले आणि अटक करीत सध्याच्या नवीन बस स्टँडसमोर, चिमुकल्या राममंदिराच्या बाजूला असलेल्या जिल्हा पोलीस ठाण्यात आणले...रात्री २ पर्यंत जो पोलीस यायचा आणि तो मोठी मर्दुमकी गाजवण्याच्या थाटात या दोघांची कसून चौकशी, विचारणा करायचा.
 
 
मध्यरात्रीनंतर २-३ वाजता तहसीलदार कार्यालयातील पोलीस कोठडीत दोघांना डांबण्यात आले...विजय यांचे काका पांडुरंग तथा पंडित नाईक हे सकाळी आले, त्यांनी या दोघांना मोठ्या अभिमानाने चहा आणून दिला. अर्थात चहा पुरवण्याचे कर्तव्य होते पोलिसांचे पण त्यांनीही काकांकडून ‘फुकट’ चहा पिऊन घेतला..
 
 
नंतर सकाळी ७-८ ला दोघांना पोलीस ठाण्यात आणले. पुन्हा तेच चौकशीची मर्दुमकी. न्यायालयाला सुटी असल्याने न्यायाधिश महोदयांच्या घरी दोघांना उभे करण्यात आले... त्यांनी ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली. पुन्हा तोच खाक्या. रोज १४-१५ पोलीस ठाण्यात एकत्र वा स्वतंत्र बसवणे, उलटसुलट विचारणा करणे हा खाक्या चालला. अर्थात काही लपवण्यासारखी माहिती नव्हतीच! अखेर २१ जानेवारीला न्यायालयीन कोठडी न्यायालयाने दिली अन् या दोघांना जिल्हा उपकारागृहात आणण्यात आले. तेथे आधीच अनेक ठिकाणचे सत्त्याग्रही होतेच...
 
 
त्यांच्यासोबत जळगावचे दिनेश देसाई, दिलीप मेने, पद्माकर निळे, श्रीप्रकाश चंद्रात्रे, उदय तिवारी, घनश्याम जोशी (सध्या धुळे येथे वास्तव्य), अजित मधुकर कुळकर्णी (गेल्या १०.९.१८ ला पुणे येथे दिवंगत), भुसावळचे जयंती सुराणा, दिलीप ओक, अनिल तारे, अमोद्याचे डॉ.चंद्रकांत चौधरी, पाचोर्‍याचे बाळासाहेब कुळकर्णी, धरणगावचे बाळासाहेब चौधरी, नंदकुमार हरीभाऊ अग्निहोत्री, तेजमल नथमल गोठी. कुर्‍ह्याचे एकाच बॅचचे ११ सत्त्याग्रही होते. त्यात पद्माकर शिवलकर, अशोक खिरळकर, जगदेव शंकर खिरळकर, दगडू महिपत राठोड, भानुदास चिंचोलकर, दिनकर राणू पाटील, शालिग्राम त्र्यंबक सोनवणे, गुलाब नारायण काकडे, शामसुंदर घनश्याम शर्मा. १ मार्च ७६ ला सुटका झाली. पुढे पदवी मिळवल्यानंतर विजय हे स्टेट बँकेत रुजू झाले. अनेक ठिकाणी उत्तम सेवा बजावल्यावर ते नाशिकला चीफ मॅनेजर असतांना ३० नोव्हेंबर २०१७ ला निवृत्त झाले. सध्या त्यांचा निवास जळगावला बहिणाबाई उद्यानालगतच्या ब्रुक बॉंड कॉलनीत असला तरी गेल्या एप्रिलपासून औरंगाबादला जलसंधारणाच्या कामी कार्यरत संघ परिवारातील ‘म.फुले प्रतिष्ठान’चे काम बघतात. पत्नी विंदा या भगिनी मंडळ, आनंदीबाई शिक्षण संस्थेत पदाधिकारी आहेत. सुपुत्र डॉ.विनित हे एम.डी.आयुर्वेद आणि स्नुषा डॉ.किरण या एम.एस्. (जनरल सर्जरी) आयुर्वेद असून जळगावातच सेवा देताहेत. कन्या विशाखा अभिजित रेडगावकर या ठाणे जनता सहकारी बँकेत अधिकारी आहेत. बंधू गिरीश हे शेतकी खात्यातून निवृत्त व धाकटे बंधू सतीश हे जळगावला सी.ए.आहेत.
आणीबाणीत संकटं अनुभवाला आली, पण त्यांनी कणखरता शिकवत आयुष्य समृद्ध करण्यासाठी दिशा दिली...असे त्यांना वाटते.
 
 
पाय जडावत अन् डोळे पाणावत...
संघशाखेतले, महाविद्यालयातले अन् कारागृहातले असे स्वतंत्र, वेगळे विश्‍व अनुभवणारे हे बहुतेक सत्त्याग्रही संघविचाराचे आणि विशेषत: सुसंस्कृत, एकत्र कुटुंबातले...खूप नात्यांची वीण अनुभवलेलेे...साहजिकच कारागृहातील सत्त्याग्रही शिक्षा पूर्ण झाली की आपल्या घरी परतत असत. त्यांना संघ व देशभक्तीच्या भावनेने एकत्र येत बंधुतुल्य नातं जडलेली समवयस्क सहकारी मंडळी सोडून घरी जाणे जड जाई, त्यांना निरोप देता-घेतांना डोळ्यात आसू दाटत...आणीबाणीने देशातल्या हजारो स्वयंसेवकांना कारागृहात एकत्र आणत जणू संत ज्ञानदेवांच्या ‘पसायदान’मधील ‘परस्परा जडो मित्र जीवांचे’ या सूत्राची अनुभूती दिली.
 
‘नेमका’ दिवस निवडला...
देवेश अन् विजय हे व.वा.जिल्हा वाचनालयासमोरच्या प्रांगणात भरणार्‍या ‘अभिमन्यू’ सायंशाखेचे नियमित स्वयंसेवक. सत्त्याग्रहासाठी निवडला तो दिवस होता शनिवारचा, आठवडे बाजाराचा जास्त गर्दीचा आणि वेळही रेल्वेगाड्यांच्या येण्याच्या जाण्याची सायंकाळची ६ च्या आसपासची वरिष्ठांनी ठरवलेल्या व्यूहरचना व वेळेनसुार हे दोघे शहरातील मध्यवर्ती व जास्तीत जास्त वर्दळीच्या नेहरु पुतळ्याजवळ ‘प्रकट’ झाले ते निर्धारपूर्वक. पूर्वकल्पना असल्याने विजय यांचे आई आशालता यांनी औक्षण केलेले होते.
 
श्रीकृष्ण नाईक : १७ महिने स्थानबद्ध
श्रीकृष्ण नाईक (जन्म १९३०चा, पदवीधर शेतकरी ,जानेवारी ९१ मध्ये दिवंगत) यांनी पहिल्या तुकडीत मुद्दाम गर्दीचा दिवस निवडत जळगावच्या रथोत्सवाच्या धामधुमीत १५ नोव्हेंबर ७५ ला घाणेकर चौकात सत्त्याग्रह केला. जळगाव, अकोला, नाशिक कारागृहात त्यांनी एकूण १७ महिने कारावास भोगला. मार्च ७७ मध्ये ते मुक्त झाले.
 
जेलर अ्न गुन्हेगारांचेही प्रेम मिळवले...
वेळ आणि उत्साहही भरपूर...याचा परिणाम पाण्याचा अस्वच्छ हौदही काहींनी धूत स्वच्छ केला अन् त्यात पाणी भरुन घेत उड्या मारण्याचा, पोहोण्याचा आनंद लुटला...पाण्याची भितीही कमी होत गेली. वृत्तपत्र वाचन, रेडिओवरील कार्यक्रम, गाणी ऐकणे तसेच भगव्या ध्वजाविना संघशाखा लावत खेळ, व्यायाम, संघाची देशभक्तीपर पद्य म्हणणे यात ते व्यस्त असत. तत्कालीन सहृदय जेलर सोनुने यांचेही मन जिंकले होते, ते एवढे की दहशतीने नोकरशाहीसह देश भयांकित असतानाही संकेत-नियम न जुमानता काही जणांसाठी त्यांनी घरुन चहा मागवला होता. कारागृहात विविध गुन्ह्यात असलेले कच्चे काही कैदीही आदरभावाने त्यांचा शिधा, अन्नपदार्थ पुरवित...मग त्यातून कधी कांद्याची भाजी व अन्य पदार्थही चाखता येत असत.

- संपर्क -विजय श्रीकृष्ण नाईक.
८२०८८८७६७४