भारतातील सर्वोत्तम कंपन्या : एक अध्ययन

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |
 
हल्ली केवळ पगाराचे आकडे बघूनच नव्हे, तर संबंधित कंपनीतील व्यवस्थापन आणि त्याच कंपनीची ध्येय-धोरणेही कर्मचार्‍यांसाठी तितकीच महत्त्वाची ठरतात. तेव्हा, भारतातील एका अध्ययनात सर्वोत्तम ठरलेल्या कंपन्या आणि त्यांनी राबविलेली कार्यशैली यांची माहिती देणारा हा लेख...
 
 
 
company
 
 
 
‘दि ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’तर्फे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली ३० वर्षे सर्वोत्तमकंपन्यांची वार्षिक पडताळणी केली जाते. ६० देशांमधून सुमारे दहा हजारांच्यावर कंपन्या या अभ्यास पडताळणीमध्ये सहभागी होतात. देशांतर्गत स्तरावर भारतातील सर्वोत्तम कंपन्यांचा सर्वेक्षणाद्वारे अभ्यास करून त्यांची क्रमवारी ठरविण्यात येते. सद्यःस्थितीत भारतातील कंपन्यांमध्ये व्यवहार-व्यवसाय या उभयक्षेत्रात सर्वोत्तम ठरण्यासाठी कर्मचार्‍यांची पात्रता-क्षमता-कार्यक्षमता यांची सांगड बदलत्या व लवचिक व्यवसाय परिस्थितीशी घालून यशस्वी होणे, हाच प्रमुख मापदंड असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे. 
 
सर्वेक्षणातून स्पष्ट झालेली अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अधिकांश कंपन्या या त्यांच्या आर्थिक निकषाच्या आधारे त्यांच्या व्यावसायिक यशाचे मूल्यमापन करीत असल्या तरी बदलता काळ आणि परिस्थितीनुसार कंपन्यांचे व्यवस्थापन कर्मचार्‍यांची पात्रता-क्षमता व कार्यक्षमता याला अधिकाधिक चालना देऊन त्या आधारे केवळ आर्थिकच नव्हे, तर एकूणच व्यावसायिक यशावर भर देत असतात, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. यावेळी विशेेषत्वाने दिसून आलेली बाब म्हणजे, सद्यःस्थितीत कर्मचार्‍यांचा कंपनीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला आहे. विशेषत: कोरोनानंतरच्या काळातील बदलत्या परिस्थितीनुरुप झपाट्याने बदललेल्या व्यावसायिक गरजा व संपूर्णपणे नव्या परिस्थितीवर यशस्वीपणे काम करणार्‍या कंपनी व व्यवस्थापनाला कर्मचार्‍यांची आग्रही पसंती देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
सर्वेक्षणातील सामील कर्मचार्‍यांची दोन प्रकारे यावेळी चाचणी-चाचपणी करण्यात आली. यापैकी एक निकष म्हणजे, कर्मचार्‍यांची पात्रता, क्षमता व कार्यक्षमता व त्यांचा परस्पर अधिकारी-कंपनीवरील विश्वास. यासाठी कर्मचार्‍यांचा निनावी प्रतिसाद व मतांचा विचार करण्यात आला. असे करण्यामागे कंपनीचे व्यवस्थापक-व्यवस्थापन या सर्वांच्या मन आणि मनोगत याचा सर्वसमावेशक प्रयत्न करण्यात आला. दुसरा मुद्दा म्हणजे, कंपनी स्तरावरील कार्यशैली व कार्यपद्धतीची पडताळणी करण्यासाठी कंपनीच्या कार्यसंस्कृतीचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी कंपनीतील कार्यपद्धती व कामकाज पद्धती यांवर कर्मचार्‍यांमधील परस्पर विश्वासावर भर दिला गेला. या सार्‍यांचा कंपनी आणि कर्मचारी या उभयतांवर व्यक्तिगतच नव्हे, तर व्यवसायात्मक संदर्भात काय सकारात्मक परिणाम नेमका घडून आला, त्याचा अभ्यास यानिमित्ताने झाला. या सार्‍या तपशीलवार पार्श्वभूमीवर ‘ग्रेट फोक टू वर्क’ या सर्वेक्षण उपक्रमांतर्गत सर्वोत्तम ठरलेल्या निवडक कंपन्यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण बाबी त्यांच्या सर्वोत्तम क्रमवारीनुसार पुढीलप्रमाणे.
 
१) ‘सिस्को सिस्टिम्स इंडिया प्रा. लिमिटेड’: बंगळुरुस्थित संगणकीय व्यवसाय विषयक ही कंपनी. या कंपनीच्या कार्यशैलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, कर्मचार्‍यांना आपापल्या क्षेत्रात प्रगत व उत्तमोत्तम कार्य करण्यासाठी आवर्जून प्रोत्साहन दिले जाते. कंपनीतर्फे महिला कर्मचार्‍यांना विशेष मार्गदर्शन केले जाते. याशिवाय कंपनी-कर्मचार्‍यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचार्‍यांना कंपनी अंतर्गत चाकोरीबद्ध कामकाजाशिवाय कंपनीच्या विविध क्षेत्रांशी संबंधित विशेष काम करून त्याची अंमलबजावणी करतानाच कंपनीच्या कर्मचार्‍यांना नेहमीच प्रोत्साहित केले जाते.
 
२) ‘आय फायनान्स प्रा. लिमिटेड’ : आर्थिक सेवांतर्गत लघु-उद्योग क्षेत्रात वित्तीय साहाय्य करणार्‍या गुडगाव येथील या कंपनीमध्ये कर्मचारी-कंपनी यांच्या परस्पर संबंधावर विशेष भर दिला जातो. याचाच भाग म्हणून कंपनीत उमेदवारांची कर्मचारी म्हणून निवड करण्यापूर्वी त्यांना प्रत्यक्ष ग्राहक संपर्क व व्यवसाय व्यवस्थेच्यादृष्टीने सराव केल्यावरच कर्मचार्‍यांची निवड केली जाते. याशिवाय कर्मचार्‍यांमधील नाविन्यपूर्ण कल्पकता व नवनवीन सुधारणांसाठी कंपनीच्या ‘मासिक संवाद’ या उपक्रमांतर्गत विशेष चालना दिली जाते. यामध्ये कंपनीच्या एचआर व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी दरमहा कंपनीच्या शाखांमध्ये जाऊन कंपनी-कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्यांच्या व्यवसाय-विकास विषयक संकल्पानांना प्रोत्साहन देतात.
 
३) ‘फोर्ड मोटार्स प्रा. लिमिटेड’ : चेन्नईच्या ‘फोर्ड मोटार्स बिझनेस सोल्युशन्स’ या कंपनीमध्ये कंपनीला व्यवसाय-विकासात सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी कर्मचार्‍यांचा सहभाग मोलाचा ठरला आहे. त्याचबरोबर कर्मचार्‍यांना विकास करण्यासाठी आवश्यक साधने, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाते. ‘कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक विकासातून कंपनीचा व्यावसायिक विकास’ या विशेष धोरणांतर्गत कर्मचार्‍यांना व्यवसायानुरुप विकास कल्पना राबविण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले जाते.यासाठी कर्मचार्‍यांनी ठरावीक काळासाठी इतर वा विविध विभागात काम करणे, विविध व्यवस्थापकांनी त्यांना सहकार्य वा मार्गदर्शन करणे, कर्मचार्‍यांनी मोठी जबाबदारी व काम स्वीकारावे यासाठी प्रोत्साहन देणे इ. उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा मोठा फायदा कर्मचारी व कंपनी या उभयतांना होतो. ‘फ्लरिश अ‍ॅट फोर्ड’ या विशेष उपक्रमांतर्गत कंपनी व कर्मचारी या उभयतांच्या परस्पर प्रगतीसाठी कर्मचारी विकासावर विशेष भर दिला जातो. यातून कंपनीला अधिकाधिक प्रमाणात कर्मचारीप्रवण म्हणून घडविले जाते.
 
४) ‘एसआयएस लिमिटेड’ : दिल्ली येथे मुख्यालय असणार्‍या ‘एसआयएस लिमिटेड’ या व्यावसायिक सेवा पुरविणार्‍या या कंपनीमध्ये ‘उडान’ या कर्मचारीप्रवण उपक्रमांतर्गत कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाद्वारे अधिकाधिक कार्यक्षम बनविले जाते. यामध्ये कर्मचार्‍यांच्या कौशल्य विकासाचाही समावेश असतो. याचा फायदा कर्मचार्‍यांची प्रगती व कंपनीचा विकास या उभयतांसाठी होतो. याशिवाय कंपनीतर्फे कर्मचार्‍यांना अधिकाधिक प्रमाणात टीम स्वरूपात काम करून कंपनीअंतर्गत नेतृत्त्व विकासाला प्रोत्साहन दिले जाते.
 
५) ‘सेल्स फोर्स’: बंगळुरु येथील संगणक सेवा क्षेत्रात काम करणार्‍या या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी ‘इनोव्हेटिव्ह बॉक्स’ हा विशेष उपक्रम यशस्वीपणे राबविला जातो. याद्वारे प्रत्यक्ष काम करणार्‍या कर्मचार्‍यांना व्यावसायिक सुधारणांसाठी प्रयत्न करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी अधिकारी उभय स्तरावर प्रयत्न केले जातात. कंपनी अंतर्गत व्यावसायिक नेतृत्त्व सर्वेक्षण हा नवा उप्रकम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. याद्वारे कंपनीला अनुभवी कर्मचार्‍यांना तर कर्मचार्‍यांना नेतृत्त्वासह प्रगती साधण्याचा दीर्घकालीन फायदा होतो. कर्मचार्‍यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण यामुळे घटले आहे. थोडक्यात, म्हणजे यावेळच्या सर्वेक्षणाद्वारा कंपन्या सर्वोत्तम ठरण्यासाठी काय आणि कशा प्रकारे नाविन्यपूर्ण व कल्पक प्रयत्न केले जातात, याचा कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रयत्नांचा आढावाच ‘गे्रट प्लेस टू वर्क’ सर्वेक्षणाद्वारे घेण्यात आला आहे. विशेषतः कोरोनानंतरच्या काळात या कंपन्यांची उत्तमपासून सर्वोत्तमकडे सुरू असलेली वाटचाल स्पष्ट झाली असून, ती कंपनी कर्मचार्‍यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.
 
- दत्तात्रय आंबुलकर

(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)