चर्चा दंगलींचीही व्हावी!

    दिनांक : 18-Jun-2022
Total Views |
 
चर्चा बुलडोझरची होणार असेल, तर नमाजनंतर दगड मारण्याचीही व्हायला हवी. गोध्रा जळीतकांडावर बोलायचे नाही. मात्र, गुजरात दंगलीच्या पिपाण्या वाजविण्याइतकेच हे दांभिक आहे.
 
 
yogiji
 
 
 
उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईबाबत चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. आपल्या देशातील पोपट पुरोगाम्यांनी या चर्चेच्या केंद्रस्थानी योगींनाच ओढले आहे. अर्थात, योगींना या बुणग्यांच्या वटवटीशी काही देणेघेणे नाही. दंगेखोर मुसलमान असले की, आपल्या देशातल्या एका उरल्यासुरल्या पुरोगामी कंपूला मोठा कळवळा यायला लागतो. हे लोक धाय मोकलून रडायला लागतात. पूर्वी मोदी-शाहंच्या नावाने हे लोक उर बडवायचे, आता ते योगींच्या नावाने बडवतात. मोदींनाही त्याचा फारसा फरक पडला नव्हता आणि योगींनाही त्याचा फरक पडत नाही. मात्र, गेली कितीतरी दशके आपल्या समाजाचे समाजमन घडविण्याचे काम करणारी ही मंडळी किती दांभिक, दुटप्पी आणि हिंदूविरोधी होती, ते या घटनेने दिसून येते. जेवढी चर्चा या बुलडोझर कारवाईची होते, तेवढीच चर्चा धर्मांध मुस्लिमांच्या दंगेखोरपणाची होताना दिसत नाही.
 
रांची दंगलीवर तर या सगळ्यांचे मौन विस्मयकारक आहे. नमाज पढून झाला की, लगेच हातात दगड घेऊन निरपराध लोकांवर दगड मारणारी ही जमात कुणाच्या हिताची आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायला हवे. मात्र, ते कोणाच्याही प्राथमिकतेत नाही. दिल्ली दग्यांनंतर जे एक चित्र पुढे आले होते आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती होताना अलीकडेच दिल्लीतही दिसली. दगड मारणार्‍यांपैकी एक जण चक्क हातात पिस्तुल घेऊन गोळ्या झाडताना दिसला. याच ठिकाणी पोलिसी कारवाईमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता, असा मृत्यू एखाद्या मुस्लीम युवकाचा झाला की, आपल्याकडल्या माध्यमांना अधिक पान्हा फुटतो. यातील एका मुलाची आई मोठ्या मोठ्याने रडत होती. ‘माझ्या एकुलत्या एक मुलाला आमच्या कुटुंबापासून हिरावून घेतले,’ असा तिचा सूर होता. पुरोगाम्यांच्या लाडक्या चॅनलने ही क्लिप पुन्हा पुन्हा चालविली. मात्र, या आईला तिचा मुलगा दगड मारण्याच्या मोहिमेत का सामील झाला होता, हे विचारण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही. झारखंडमध्ये पोलिसांसह २० निरपराध नागरिक गंभीरपणे जख्मी झाले आहेत. यातली काहींच्या तर जीवावर बेतले आहे. मात्र, त्यांची कुणालाही पर्वा नाही. उत्तर प्रदेशातही असेच काहीसे सुरू आहे. दंगेखोरांवर कारवाई केली की, पुरोगामी कंपू रडायला लागतो. दंगेखोरांच्या पार्श्वभागावर दंडुके पडले हे लोक विव्हळायला लागतात.
 
या सगळ्याच मागे एक लपलेला अजेंडा असल्याचे आपल्याला कळून येईल. भारतात दंगे करणे आता तितके सोपे नाही. मशिदींच्या भोंग्यातून मुल्ला-मौलवींनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी निरपराधांवर हल्ले करणेही आता शक्य नाही. मग देशी आणि विदेशी माध्यमांतल्या अल्पसंख्याकांच्या हितरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या अर्धवटांना सोबत घेऊन आता हा खेळ खेळला जात आहे. इस्लामी देशांत पसरविलेले भारतविरोधी किटाळ भारत सरकारने उत्तमरित्या निपटून काढले. मात्र, या देशी भूजंगांना कसे ठेचायचे, हा सध्याचा सवाल आहे. दंगेखोरांना एकदा का तुम्ही ‘निरपराध’ म्हणून प्रशस्तिपत्रक दिले की, मानवी हक्काच्या नावाखाली त्यांच्यासाठी आरडाओरडा करणेही शक्य असते. मग देशविदेशातून त्यांच्या नावावर देणग्या गोळा करून आपल्या तुंबड्या भरता येतात. एका दृष्टीने पाहिले, तर हा गोध्राचाच दुसरा प्रकार आहे. त्यावेळीसुद्धा कारसेवक प्रवास करीत असलेले रेल्वेतील डबे अत्यंत निर्घृणपणे जाळण्यात आले. त्याला प्रतिक्रिया म्हणून हिंदूंनी रस्त्यावर उतरून उत्तर दिले. त्यावेळी हिंदूंनी रस्त्यावर उतरून उत्तर दिले नसते, तर निष्पाप लोक प्रवास करीत असलेल्या गाडीचे डबे पेटविण्याची पद्धतच रूढ झाली असती.
 
आज जसे दगड मारत पुढे यायचे आणि मग मधून कोणीतरी आपल्या पिस्तुलातून गोळ्या झाडायच्या, अशी एक पद्धत दंगेखोरांत तयार झाली आहे. याचा मुहूर्त शुक्रवारच्या नमाजनंतरच असतो. इतर समाजात प्रार्थनास्थळांवरून लोक प्रसाद, आशीर्वाद किंवा धार्मिक उपदेश घेऊन बाहेर पडतात; इथे मात्र निरपराध लोकांवर मारण्यासाठी दगड घेऊन बाहेर पडणारे दंगेखोर समोर येतात. यांच्या समर्थकांचा हलकटपणा असा की, गुजरातची दंगल सांगितले जाते. मात्र, गोध्रामध्ये जाळलेले हिंदू कोणालाच दिसत नाहीत. रामजन्मभूमीच्या न्याय्य मागणीसाठी गेलेल्या कारसेवकांवर गोळीबार होतो. काही लोक त्यात धारातिर्थी पडतात. मात्र, मुलायमसिंहांना कोणी ‘मौत का सौदागर’ म्हणत नाही; ते विशेषण फक्त मोदींच्याच वाट्याला येते!
आता यातलेही फार थोडे उरले आहेत. ईशनिंदेच्या विरोधाच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते निष्षापांसाठी घातक आहेच. पण, गोरगरिबांनाही नाडविणारे आहे. दंगे झाल्यावर हातावर पोट असणार्‍यांचे काय हाल होतात, हे कुठल्याही डाव्या माणसाला दिसत नाही.
 
धर्माच्या प्रार्थनेनंतर निष्पापांच्या रक्ताला चटावलेले लोक झुंडीने बाहेर पडत असतील, तर त्यांचे निर्दालन करण्याचा मार्ग काय असला पाहिजे? चर्चा व्हायची असेल, तर या सगळ्याचीच झाली पाहिजे. ही चर्चा एकांगी असता कामा नये. हिंदूंवर अन्याय करणारी तर बिलकुलच असता कामा नये. ज्यांच्या सहिष्णुतेवर हे सगळे चालू आहे, त्या हिंदू समाजाच्या सहिष्णुतेला भेकडपणा समजण्याचा जो खेळ सध्या सुरू आहे, तो दारुगोळ्याला काड्यापेटीच्या काड्या पेटवून चिडविण्यासारखा आहे. नमाजानंतरच्या दंग्यांवर मुस्लीम समाजातून विरोधाचे सूर उमटत असले तरी ते क्षीण आहेत. अशा मंडळींनी समर्थन व सहकार्य करावेच लागेल व हाच सूर मुख्य इस्लामचा असेल, असे पाहावे लागेल; अन्यथा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’, असे भीमसेन जोशी आणि अन्य डझनभर कलाकारांकडून गाऊन घेणे व्यर्थ आहे.