तुकडे होण्याच्या मार्गावर पाकिस्तान   

    दिनांक : 10-Jun-2022
Total Views |
पाकिस्तानकडून होणार्‍या रसद पुरवठ्याच्या जोरावर भारतात हिंसक घटनांना प्रत्यक्षात आणण्याचे काम तुकडे तुकडे गँग करत असते. पण, आता मात्र पाकिस्तानची परिस्थितीच इतकी बिकट झाली की, ‘तुकडे तुकडे गँग’च्या नंदनवनाचेच तुकडे होण्याची वेळ आली आहे. तसे झाल्यानंतर ‘तुकडे तुकडे गँग’कडून केला जाणारा मातम नक्कीच पाहण्यासारखा असेल.
 
 
 
pak1
 
 
 
गेल्याच आठवड्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी आपल्या देशाचे तीन तुकडे होतील, असा दावा केला. ती प्रक्रिया कशाप्रकारे पार पाडली जाईल, हे सांगतानाच त्यांनी कोणत्याही पाकिस्तानी नेत्याप्रमाणे भारत बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. कारण, भारताच्या नावाने गळा काढला की, भावनेच्या भरात पाकिस्तानी जनता आपल्यामागे उभी ठाकेल व आपल्याला सत्तेच्या तख्तापर्यंत जाता येईल, असे तिथल्या राजकारण्यांना वाटते. तसे इमरान खान यांनाही वाटले व म्हणूनच त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यकांक्षेमागे भारताचा हात असल्याचे म्हटले, तर संपूर्ण पाकिस्तानचे कसे कसे तुकडे पडतील, हेदेखील इमरान खान यांनी सांगितले. पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकारच्या धोरणांमुळे पाकिस्तान आधी दिवाळखोर होईल, त्यानंतर पाकिस्तानच्या कंगालीचा पहिला फटका लष्कराला बसेल. लष्कर दुबळे झाल्यानंतर जगातील शक्तीशाली देश ‘डि-न्युक्लियरायझेशन’साठी १९९० मध्ये युक्रेनवर आणला तसाच दबाव पाकिस्तानवर आणतील, त्यामुळे आपल्याला आपली अण्वस्त्रे गमवावी लागतील आणि त्यानंतर देशाचे तीन तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असे ते म्हणाले. इमरान खान पाकिस्तानचे तुकडे तुकडे होण्याबद्दल जे म्हणाले, त्यात भारताशी संबंधित भाग वगळता काहीही चुकीचे नाही.
 
वस्तुतः पाकिस्तानची स्थापनाच मुळी अनैसर्गिक पद्धतीने झाली. इस्लामधर्मीयांचे स्वतंत्र राष्ट्र म्हणत अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानी सरकारमध्ये कधीही बलुची, सिंधी, पख्तुनी मुस्लिमांबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झाली नाही. पंजाबी वर्चस्वाच्या पाकिस्तानने आपला प्रदेश वगळता इतरांवर नेहमीच अन्याय-अत्याचारच केला, त्यांची नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिज संपत्ती ओरबाडली अन् त्यांना सर्दैव आपल्यापुढे हात पसरून उभे असलेले आश्रितच मानले. परिणामी, धर्म एक असूनही त्या देशात अलगतेची मागणी पुढे येत गेली. त्यातूनच १९७१ साली पूर्व पाकिस्तान संपला अन् बांगलादेश तयार झाला, तर त्याआधी व त्यानंतरही आजपर्यंत पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, सिंध व खैबरपख्तुनख्वा या प्रांतांतून स्वातंत्र्याची मागणी केली जाऊ लागली. म्हणजेच आज पाकिस्तानची अवस्था तीन निराळे तुकडे व चौथा पंजाब, असे चार देश निर्माण होतील, अशी झालेली आहे. भारतातील ‘तुकडे तुकडे गँग’ पाकिस्तानकडे मोठ्या आशेने पाहात असते. पाकिस्तानकडून होणार्‍या रसद पुरवठ्याच्या जोरावर भारतात हिंसक घटनांना प्रत्यक्षात आणण्याचे काम तुकडे तुकडे गँग करत असते. पण, आता मात्र पाकिस्तानची परिस्थितीच इतकी बिकट झाली की,‘तुकडे तुकडे गँग’च्या नंदनवनाचेच तुकडे होण्याची वेळ आली आहे. तसे झाल्यानंतर ‘तुकडे तुकडे गँग’कडून केला जाणारा मातम नक्कीच पाहण्यासारखा असेल. पण, त्यांनी दुखवटा साजरा केला तरी त्याने वास्तव बदलणार नाही अन् पाकिस्तानचे तुकडे होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
 
आजच्या पाकिस्तानमध्ये प्रत्येकजण स्वतःला स्वतंत्र वा दुसर्‍यापेक्षा वरचढ समजतो. त्यात लष्कर, ‘आयएसआय’, सत्ताधारी, प्रशासकीय व्यवस्थेचा समावेश होतो. त्या सार्‍यांनाच दुसर्‍यावर अधिकार गाजवायचा आहे, पण यामुळेच पाकिस्तानचे तुकडे पडण्याची घटना साधली जाणार आहे. ही प्रक्रिया इमरान खान आज बोलले म्हणून सुरू होईल, असे नव्हे, तर त्याची सुरुवात आधीच झालेली आहे. आता फक्त पाकिस्तानवर एक घाव पडायचा अवकाश की पाकिस्तानचे तुकडे तुकडे झालेले प्रत्यक्षात येईल, अशी स्थिती आहे. इमरान खान यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा संबंध भारताशी जोडला, पण ते तसे नाही. बलुचिस्तानची स्वातंत्र्याची मागणी अगदी १९४८ सालापासूनची, म्हणजे पाकिस्तान तयार झाल्याच्या एक वर्षापासूनची आहे. सात दशकांपासून केल्या जाणार्‍या स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीचे नेतृत्व आता ‘बलूच नॅशनलिस्ट आर्मी’चे बंडखोर करत आहेत. त्यांना आता भलताच जोर चढला असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच इथे बलूच बंडखोरांनी २० मोठे व घातक हल्ले केले, त्यात 80 सुरक्षा सैनिकांचा बळी गेला. उल्लेखनीय म्हणजे, महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. त्याचा दाखला 26 एप्रिलला शारी बलूच या महिलेने केलेल्या आत्मघाती हल्ल्यातून मिळाला आहे. येत्या काळात तर स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी आणखी आक्रमकपणे केली जाईल व पाकिस्तान तुटू लागेल.
 
मुझे जंग-ए-आजादी का मजा मालूम हैं,
बलोचों पर जुल्म की इंतेहा मालूम हैं
मुझे जिंदगी भर पाकिस्तान में
जीने की दुआ मत दो
मुझे पाकिस्तान में साठ साल
जीने की सजा मालूम हैं
 
अशा शब्दांत हबीब जालिब यांनी कवितेच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये राहून होत असलेला त्रास व्यक्त केला आहे. हीच गत पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवाशांची आहे. १९६७ साली पाकिस्तानी सरकारने सिंधवर उर्दू भाषा लादली अन् इथल्या जनतेने विरोधाला सुरुवात केली. त्यातून इथे सिंधी अस्मितेचा जन्म झाला व त्यांनी स्वतंत्र देशाची मागणी सुरू केली. आता तर इथली स्वातंत्र्याची मागणी इतकी जोरकस झाली आहे की, सिंध सरकारने जूनच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत जनतेला दडपण्यासाठी ‘कलम १४४’ लावले आहे. सिंधप्रमाणेच खैबरपख्तुनख्वामधूनही वेळोवेळी स्वातंत्र्याची मागणी केली गेली.
 
आता तर इथले मुख्यमंत्री महमूद खान यांच्याच विधानातून त्याचे संकेत मिळाले आहेत. इमरान खान यांनी २५ मे रोजी इथे एक रॅली केली होती, तेव्हा महमूद खान यांनी आपल्या प्रांतातील सुरक्षा बळाचा वापर सत्तेविरोधात करू, असे म्हटले होते. महमूद खान यांनी शाहबाज शरीफ सरकारला ‘आयातीत व अक्षम’ म्हणत राज्यातील जनतेवर सरकारने केलेल्या जुलूमाचा बदला घेणार, अशी शपथ घेतली होती. खैबरपख्तुनख्वावरील तुमचा-शाहबाज शरीफ सरकारचा अधिकार हिसकावून घेणार असे ते म्हणाले होते. म्हणजेच, पाकिस्तानमध्ये आझादीची आग लागलेली असून लवकरच त्याचे वणव्यात रुपांतर होईल, असे वाटते. तेव्हा भारतातील तुकडे तुकडे गँगवाल्यांचा प्रिय देश पाकिस्तानच तुकड्या तुकड्यांत विखुरलेला दिसेल.