मकरसंक्रांत २०२२, पूजेचा मुहूर्त आणि विशेष योग जाणून घ्या

    दिनांक : 13-Jan-2022
Total Views |
सनातन धर्मात मकर संक्रांत आणि कर्क संक्रांत यांना विशेष महत्त्व आहे. भारतात मकरसंक्रांत चार वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.
 
 

sankant 
 
 
उत्तर भारतात मकरसंक्रांत आणि खिचडी या दोन नावांनी मकरसंक्रांतीचा सण ओळखला जातो. तामीळनाडूत या सणाला पोंगल असे म्हणतात. गुजरातमध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात. या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाचे पूजन करणे आणि त्याला अर्ध्य वाहणे याला विशेष महत्त्व आहे. पुराणकथेनुसार या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूने पृथ्वीलोकात असुरांचा संहार केला होता. भगवान विष्णूच्या विजयाचा आनंद मकरसंक्रांतीच्या रुपाने साजरा करतात. यंदा शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी मकरसंक्रांत हा पवित्र सण आहे.
 
शास्त्रीयदृष्टीकोनातून मकरसंक्रात विशेष महत्त्वाची आहे. या दिवशी वातावरणात बदलाला सुरुवात होते. पृथ्वीवरील सूर्यप्रकाशाचे प्रमाण वाढते आणि तापमान वाढीस लागते. सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो आणि ग्रीष्म ऋतू सुरू होतो.
हिंदू पंचांगानुसार दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी रोजी मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो. यंदा शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी मकरसंक्रांत हा पवित्र सण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजून २७ मिनिटांनी सूर्य देव मकर राशीत गोचर होतील. हा दिवस पुण्यसंचयाचा आहे.
 
मकरसंक्रांतीच्या पूजेचा मुहूर्त
 
यंदा शुक्रवार १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांपासून संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत पुण्यकाळ आहे. महापुण्याचा काळ सकाळी ९ ते सकाळी १०.३० पर्यंत आहे. या कालावधीत सूर्यदेवाचे नामस्मरण करणे, सूर्यमंत्राचा जप करणे, गायत्री मंत्राचे पठण करणे, गरजूंना दानधर्म करणे याला विशेष महत्त्व आहे.
 
मकरसंक्रांतीचे महत्त्व
 
धार्मिकदृष्ट्या मकरसंक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाचे पूजन करणे आणि त्याला अर्ध्य वाहणे याला विशेष महत्त्व आहे. यामुळे मनातील अनेक इच्छा पूर्ण होतात. तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला अर्ध्य वाहिल्याने पुण्यसंचय होतो तसेच पद-प्रतिष्ठा-संपत्ती यात वृद्धी होते. शारीरिक आणि अध्यात्मिक शक्तींची वृद्धी होते. मंगलकार्याची सुरुवात करण्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस आहे. या दिवशी लग्न, मुंज, जावळ काढणे, बारसं अशा मंगल सोहळ्यांचे आयोजन केले जाते.
 
मकरसंक्रांतीच्या दिवशी मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळतो, असे म्हणतात. त्या आत्म्याची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. यामुळेच भीष्म पितामह यांनी महाभारत काळात ५८ दिवस बाणांच्या शय्येवर राहिल्यानंतर प्राणत्याग करण्यासाठी सूर्याच्या उत्तरायणाचा क्षण साधला.