दहशतवादाविरुद्ध सौदी अरब भारताला करणार 'ही' मदत!
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019
 

 
 
नवी दिल्ली : सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दहशतवादाशी लढा देण्यासाठी सौदी अरब भारताला दहशतवादासंबंधीत गोपनीय माहिती देऊन मदत करणार असल्याचे मोहम्मद बिन सलमान यांनी जाहीर केले. मंगळवारी रात्री उशिरा मोहम्मद बिन सलमान भारतात दाखल झाले. बुधवारी सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. सौदी अरबच्या राजपुत्रांचा हा भारतातील पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि सौदी अरब यांच्यात नवे संबंध प्रस्थापित होताना दिसत आहेत. सौदी अरब आणि भारतामध्ये ५ महत्वपूर्ण करार झाले. सौदी अरब हा जगातील सर्वात मोठा तेल रिफायनरी देश आहे. त्यामुळे भारताने सौदी अरबशी केलेले ५ महत्वपूर्ण करार हे फायद्याचे ठरणार असल्याचे दिसते.
 
 
दरम्यान, सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत, दहशतवाद संपवण्यासाठी भारताला मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. “दहशतवादा विरुद्ध लढा देण्यासाठी आम्ही भारताला गोपनीय माहिती देऊ. तसेच पदोपदी भारताला मदत करू. भविष्यातील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही सर्वांसोबत मिळून काम करू.” असे मोहम्मद बिन सलमान यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला मोठ्या भावासारखे आहेत, मी त्यांचा लहान भाऊ आहे”. असे मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटले. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण सौदी अरब आणि भारतासाठी अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
“पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला ही मानवतेवरील क्रूर निशाणी आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर दबाव आणण्याची गरज आहे. आमच्या देशातील तरुणांनांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. सौदी अरबच्या राजपुत्रांनी भारतात येण्याचे आमचे आमंत्रण स्वीकारले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय सौर उर्जा प्रकल्पाच्या गटात सामील झाल्याबद्दल सौदी अरबच्या राजपुत्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. संरक्षण सहकार्य आणखी मजबूत कसे करता येईल, याबाबत पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद बिन सलमान यांच्यात चर्चा झाली. तसेच दहशतवाद, समुद्री सुरक्षा, आणि सायबर सुरक्षा या विषयांवरही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
 
 
भारत आणि सौदी अरब या दोन देशांमध्ये झालेले ५ महत्त्वपूर्ण करार-

आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जेचा करार

ऊर्जा करार

पर्यटन क्षेत्रातील एमओयूवर स्वाक्षऱ्या

प्रसार भारती आणि सौदी अरबमध्ये प्रसारण संबंधीच करार

द्विपक्षीय व्यापारसंबंधीत करार
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...https://www.facebook.com/Tarunbharatjal/