‘आप’ची झाली काँग्रेस!

    दिनांक : 16-Jun-2022
Total Views |

आपसारखा नवखा पक्षही काँग्रेसच्या व इतरांच्याच वाटेवर चालत असल्याचे मात्र दिसते. कारण, आप काँग्रेसला पर्याय म्हणून समोर आला, पण आज त्याचे नेते मात्र काँग्रेसी जशी नौटंकी करतात, त्यापेक्षाही वरचढ नौटंकी स्वतःही करताना दिसतात. मग या दोन्ही पक्षात फरक तो काय उरला? दोघेही आपण केलेला भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळा लपवण्यासाठीच राबताहेत.
 
 
 
gandhi
 
 
 
'मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी नवीच नौटंकी सुरु केली आहे. सत्येंद्र जैन यांच्या घरासह सात ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने ६ जूनला छापेमारी केली. यावेळी ‘ईडी’ला सत्येंद्र जैन यांच्याकडे २.८२ कोटींची अघोषित रोख रक्कम आणि १.८० किलो सोने सापडले. तसेच, सत्येंद्र जैन यांनी पत्नी आणि मुलीच्या नावावर १६ कोटींची फसवाफसवी केल्याचा दावाही यावेळी ‘ईडी’ने केला होता. त्यानंतर सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली. पण, आपण भ्रष्टाचाराने कितीही बरबटलेलो असलो तरी धुतल्या तांदळासारखेच असल्याची बतावणी करणार्‍यांची काँग्रेस, आपसह विरोधी पक्षांत खोगीरभरती झालेली आहे. त्यानुसार सत्येंद्र जैन आपल्या तर अरविंद केजरीवाल आपल्या सहकार्याच्या प्रामाणिकपणाची ग्वाही देऊ लागले.
 
केजरीवाल तर सत्येंद्र जैन यांना ‘पद्मविभूषण पुरस्कार’ देण्याची मागणी करण्यापर्यंत घसरले. पण, ‘ईडी’ किंवा कायद्यापुढे सारेच समान असतात आणि तिथे तुमचा प्रामाणिकपणा साक्षी-पुराव्यांनीच सिद्ध करावा लागतो. मतदारांना आपल्यालाच मतदान करण्यासाठी काहीबाही आश्वासने देऊन गुंडाळतो, तसे इथे चालत नाही. सत्येंद्र जैन यांच्याबाबतही तसेच झाले आणि त्यांची चौकशी सुरू झाली. पण, त्यात त्यांनी दिलेले उत्तर जितके मजेशीर, तितकेच ते सर्वसामान्य माणसाला चीड आणणारेही आहे. ‘ईडी’ने सत्येंद्र जैन यांना काही कागदपत्रांबाबत वेगवेगळे प्रश्न विचारले. हवालाकडून पैसे प्राप्त होणार्‍या ट्रस्टशी सत्येंद्र जैन यांचा काय संबंध आहे? सत्येंद्र जैन त्या ट्रस्टचे सदस्य आहेत का? आणि पैसे नेमके कुठून आले? हे ते प्रश्न. पण, त्यावरच सत्येंद्र जैन यांनी उत्तर देताना चक्क, “मला कोरोना झाला होता व कोरोनामुळे माझा स्मृतिभ्रंश झाला,” असे म्हटले. म्हणजेच, सत्येंद्र जैन यांनी ‘ईडी’ची प्रश्नावली व उत्तरे टाळण्याचा नवाच बहाणा निवडल्याचे यातून स्पष्ट होते. कारण, सत्येंद्र जैन यांना स्मृतिभ्रंश झाला असेल, तर आपल्याला कोरोना झाला होता, हे तरी त्यांच्या स्मृतीत कसे राहिले, हा प्रश्नही निर्माण होतो. त्यामुळे सत्येंद्र जैन फक्त ‘ईडी’च्या प्रश्नांच्या तावडीत सापडू नये आणि आपले मालक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही वाचावेत, यासाठीच स्मृतिभ्रंशाचे कारण सांगत असावेत, हे स्पष्ट होते.
 
सत्येंद्र जैन यांची ‘ईडी’ चौकशी होण्याच्या काळातच काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचीही ‘ईडी’कडून ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी कसून चौकशी करण्यात येत आहे. पण, इथेही आमचा नेता अगदीच स्वच्छ असल्याचा आरडाओरडा करत काँग्रेस नेते, कार्यकर्ते देशभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून मोदी सरकार, भाजपविरोधात घोषणाबाजी सुरू असून राहुल गांधींचे निर्दोषत्व पटवून देण्यासाठी त्यांनी बुधवारी तर जाळपोळीलाही सुरुवात केली. खरे म्हणजे, राहुल गांधी प्रामाणिक असतील, तर त्यांनी चौकशीला सामोरे जावे आणि त्यातून तावूनसुलाखून बाहेर यावे. पण ते तसे नाहीत, म्हणूनच विरोध, निषेध, मोर्चा, आंदोलनानंतर आता काँग्रेसजन टायर-ट्युब जाळण्यापर्यंत आले. महत्त्वाचे म्हणजे, राहुल गांधी किंवा सत्येंद्र जैन याच दोघा राजकारण्यांची भारतीय राजकारणात चौकशी होत आहे, असे नाही. २००२ साली धर्मांध मुस्लिमांकडून रामभक्त कारसेवकांना रेल्वे डब्यात जीवंत जाळले गेल्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीच्या आरोपाखाली तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचीही सातत्याने दिवस दिवसभर चौकशी करण्यात आलेली आहे. पण, त्यांनी कधीही आज राहुल गांधी वा इतर लोक करतात तसा आकांडतांडव केला नाही.
 
उलट ते प्रत्येक चौकशीला निर्भिडपणे भिडले आणि न्यायालयाच्या कसोटीवर आपले निर्दोषत्व सिद्ध करुन मुक्तही झाले. अर्थात, राहुल गांधी वा सत्येंद्र जैन मोदींच्या पासंगालाही पुरणार नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून तशी काही अपेक्षाही करता येत नाही. पण, यातून आपसारखा नवखा पक्षही काँग्रेसच्या व इतरांच्याच वाटेवर चालत असल्याचे मात्र दिसते. कारण, आप काँग्रेसला पर्याय म्हणून समोर आला, पण आज त्याचे नेते मात्र काँग्रेसी जशी नौटंकी करतात, त्यापेक्षाही वरचढ नौटंकी स्वतःही करताना दिसतात. मग या दोन्ही पक्षात फरक तो काय उरला. दोघेही आपण केलेला भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळा लपवण्यासाठीच राबताहेत.
 
मात्र, काँग्रेसला आप एकमेव पर्याय नाही, तर यानंतरही असे पर्याय येऊ शकतीलच. पण, अशा पक्षांना राजकारणात टिकून राहायचे असेल, तर त्यांना जनहिताशी बांधिलकी जपावी लागेल, वैचारिक निष्ठा अंगीकारावी लागेल. तसे न करता फक्त लाटेवर स्वार होऊन निवडून येते गेले, सत्ता मिळवत गेले, भ्रष्टाचार करत गेले, तर त्यांचे पतनही तितक्याच लवकर होईल, हे निश्चित. तसेच, पर्याय म्हणून नवनवे पक्ष निर्माण होत गेले व त्यांनी निवडणुका लढवल्या तरी त्या सर्व प्रक्रियेचा खर्च अवाढव्य असतो. एखाद्या व्यक्तीला, सर्वसामान्य माणसाला एखादा पक्ष आवडत असला तरी तो या पक्षांना निधी देत नसतो. म्हणजे, सरकारी निधीतून निवडणुकीची प्रक्रिया पार पडते, पण ते करुन सत्तेत आलेले सत्येंद्र जैनच्या बरोबरीचे निघाले, तर त्यांच्या जागीही पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावीच लागणार.
 
त्यामुळे याचाही कधीतरी सर्वच राजकीय पक्षांनी व नागरिकांनी विचार केला पाहिजे, जेणेकरुन निवडणुकीचा खर्चही वाचेल. आज सत्येंद्र जैन ‘ईडी’च्या प्रश्नांच्या उत्तरादाखल जी भाषा बोलताहेत, तसा प्रकार एकेकाळी काँग्रेस नेते सुख राम आणि राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद यादवांनीही केलेला आहे. अर्थात, लोकशाहीला भार झालेल्या या नेत्यांची अवस्था नंतर जनतेने किती वाईट केली, याचाही दाखला आहेच. पण, आताच्या सत्येंद्र जैन प्रकरणाने आपले काळे कारनामे लपवण्यासाठी असे राजकारणी किती बेशरमपणा करु शकतात, हेही स्पष्ट झाले. तथापि, यातून सत्येंद्र जैन, अरविंद केजरीवाल व आपचीच विश्वासार्हता लयाला जाईल, जशी काँग्रेसची गेली, हेही नक्की!