जिल्‍हा न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याने वाळू चोरट्याला दंडाची शिक्षा

    दिनांक : 06-Sep-2022
Total Views |
जळगाव : गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करुन नेणाऱ्या ट्रॅक्टरमालक व चालकाविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्‍हा न्यायालयाने पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

court

 
गिरणा नदीपात्रातून (एमएच १९ झेड ४७३६) आणि (एमएच १९ झेड ५२७५) दोन्ही डंपर वाळूची चोरी करुन नेत असताना म्हसावद (ता. जळगाव) महसुलच्या गस्ती पथकाला ५ सप्टेंबर २०१७ रोजी मध्यरात्री दीड वाजता मिळून आले होते.
तलाठी मनोहर बाविस्कर यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन डंपरचालक जनार्दन सखाराम कोळी आणि बळवंत लक्ष्मण पाटील (मयत) यांच्याविरुद्ध गौणखनीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाधिकारी सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड यांनी या प्रकरणी तपास पूर्ण करुन वेळेत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एस. देशमुख यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु होते.
सरकारी अभियोक्ता ॲड. रंजना पाटील यांनी १० साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात नोंदवून घेतल्या. प्राप्त दस्तऐवज आणि साक्षीदारांच्या साक्ष अचूक तपासातून संशयितांविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने कलम-३७९/३४ अन्वये ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.