भारताचा खणखणीत आवाज

    दिनांक : 27-Sep-2022
Total Views |
संयुक्त राष्ट्रांच्या ७७व्या आमसभेत भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केलेले १६ मिनिटांचे भाषण केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठीही पथदर्शक ठरावे. त्यामुळे जयशंकर यांच्या रुपाने संयुक्त राष्ट्रात गरजलेला भारताचा हा खणखणीत आवाज ‘विश्वगुरु’ म्हणून हिंदुस्थानच्या जागतिक वाटचालीवर मोहोर उमटविणाराच ठरला आहे.
 
 
 
 
jayshankar
 
 
महिन्याच्याच ११ तारखेला जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांच्या गाजलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाला १२९ वर्षे पूर्ण झाली. त्या सुप्रसिद्ध भाषणाचा प्रारंभ ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो’ अशा सर्वसमावेशक शब्दांत करुन स्वामी विवेकानंदांनी सनातन संस्कृतीतील ‘विश्वबंधुत्वा’चा संदेश जगभरात ध्वनित केला. त्याचाच पुन:प्रत्यय यंदा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रात गाजलेल्या भाषणादरम्यानही आला.
 
आपल्या भाषणाच्या प्रारंभी भागात जयशंकर यांनीही ‘माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो’ असे जागतिक समुदायाला संबोधन करुन, भारत सरकार हे विवेकानंदांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतिशीलतेत साकारणारे असल्याचेेच अधोरेखित केले. खरंतर २०१४ सालापासून मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला खुद्द पंतप्रधानांनी अथवा परराष्ट्र मंत्र्यांनी संबोधित केले, त्या प्रत्येक भाषणांतच ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या विश्वबंधुत्वाच्या भावनेचा जागरच झाला. कारण, मुळातच विश्वबंधुत्वाचा सर्वव्यापी विचार हा भारतीय संस्कृतीच्या, जीवनमूल्याच्या अगदी मुळाशी रुजलेला. मोदी सरकारने या विचारांना केवळ पुनरुज्जीवितच केले नाही, तर मागील आठ वर्षांत आपल्या प्रत्येक कृतीतून याबाबतची भारताची कटिबद्धता सिद्धही करुन दाखवली. ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा हा एकट्या भारतालाच सामर्थ्यवान करणारा नाही, तर राष्ट्रकल्याणाबरोबरच जागतिक कल्याणाची फलश्रुतीही त्यात अगदी नैसर्गिकपणे अभिप्रेत आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे यंदाचे संयुक्त राष्ट्रातील भाषणही याला अजिबात अपवाद ठरले नाही.
 
एस. जयशंकर हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात ओळखले जातात. त्यांच्या या स्पष्टोक्तीची झलक त्यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणात उमटली नसती तरच नवल! आपल्या भाषणाच्या आरंभीच ‘१.३ अब्जांहून अधिकच्या लोकसंख्येच्या आमच्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्यावतीनेमी आपणा सगळ्यांचे अभिवादन करतो,’ असे उद्गार काढून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोेदींप्रमाणेच भारताच्या जनशक्तीचा आणि लोकशाही मूल्यांचा प्रारंभीच गौरव केला. भारतातील सर्वच क्षेत्रांत नवचैतन्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगत त्यांनी भारतातील सर्वंकष गतिमान प्रगतीची प्रशंसा केली. हे करताना देशाच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या पंचप्राणांचाही जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. यामध्ये आगामी २५ वर्षांत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवणे, वसाहतवादी मानसिकता-प्रतिकांतून मुक्ती, संपन्न सांस्कृतिक वारशाचा अभिमान आणि जतन, जागतिक आव्हानांचा सामना करताना एकतेचा पुरस्कार आणि आपल्या राष्ट्राप्रतीचे देशप्रेम या पंचप्राणांवरच देश भविष्यात वाटचाल करणार असल्याचे सांगत, भारताच्या सर्वांगीण विकासाचा एक ‘रोडमॅप’च यानिमित्ताने जयशंकर यांनी जगासमोर सादर केला.
 
पण, एकंदरीतच जयशंकर यांच्या भाषणाचा सूर हा जगाला सध्या भेडसावणार्या समस्या आणि त्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधण्याकडे होता. त्यामुळे जागतिक समस्यांची मांडणी करतानाही जयशंकर यांनी कुणाचीही भीड न राखता, जागतिक समुदायाला एकत्र येऊन या समस्यांवर मात करण्याचे आवाहन केले. जयशंकर यांनी ‘कोविड’ काळातील लसींच्या वाटपावरून जागतिक असंतुलनाचा हवाला देत, उत्तर-दक्षिण भेदाभेदाची दरी कशी दूर करता येईल, याचाही कानमंत्र या आमसभेत सर्वांसमक्ष ठेवला. ‘कोविड’नंतर सावरणार्या अर्थव्यवस्थांपासून ते कर्जबाजारी झालेल्या देशांपर्यंत जयशंकर यांनी चिंता तर व्यक्त केलीच. पण, प्रत्येक देशाने ‘मी आणि माझे’ यापलीकडे जाऊन, आपल्या संकुचित राष्ट्रीय अजेंड्याला छेद देऊन जागतिक हिताचा विचार आणि त्या अनुषंगाने कृती करण्याचा बहुमूल्य सल्लाही त्यांनी दिला.
 
रशिया-युक्रेन युद्धावर भारताने यापूर्वीही आपली भूमिका विविध माध्यमांतून विशद केली होतीच. जयशंकर यांनीही भारत हा कोणत्याही एका गटाच्या बाजूने नसून शांततेच्या, चर्चेच्या, लोकशाहीच्या बाजूने असल्याचे सांगत, हा युद्धाचा नव्हे, तर विकासाचा आणि सहकार्याचा काळ असल्याचेच पुनश्च अधोरेखित केले. ‘शांघाय सुरक्षा परिषदेत’ही पंतप्रधान मोदींनी हीच भूमिका मांडली होती व त्याचेही जगभरातील नेत्यांकडून स्वागतही झाले.
 
इतकेच नाही, तर पंतप्रधान मोदी, व्हॅटिकनचे पोप आणि संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष अॅन्थोनी गुटेरस यांच्या एकत्रित समितीने रशिया-युक्रेन युद्धपरिस्थितीत मध्यस्थी करून कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशाही चर्चा रंगू लागल्या. तसेच, भारताच्या या भूमिकेचे स्वागत करत अमेरिकेसह रशियानेही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व बहाल करण्यात यावे, या मागणीलाही पाठिंबा दिला. म्हणजेच काय तर कोणे एकेकाळी संयुक्त राष्ट्राने आपले प्रश्न सोडवावे म्हणून मदतीची याचना करणारा भारत आणि आज जगाचे प्रश्न भारताने सोडवावे म्हणून आपल्या देशाकडून वाढलेल्या जागतिक अपेक्षा, असा हा फरक अगदी स्पष्ट आहेच.
 
जयशंकर यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दांत भारताचा हाच आत्मविश्वास आणि आपल्या देशाकडे बघण्याचा बदललेला एकूणच जागतिक दृष्टिकोन, असाच पदोपदी प्रतिबिंबित झालेला दिसला. त्याच अनुषंगाने कोरोना प्रतिबंधक लसींवरून जेव्हा जागतिक राजकारण रंगले होते, तेव्हा भारताने संकटकाळात १०० हून अधिक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींची मदत करुन निभावलेली ‘व्हॅक्सिन मैत्री’ ही त्यांनी पटलावर ठेवली. त्याचबरोबर अफगाणिस्तान, श्रीलंकेला संकटकाळात केलेल्या नि:स्वार्थी मदतीचाही दाखला देत, जगभरात ७०० हून प्रकल्पांची भारत उभारणी करत असल्याचे सांगत, भारताची जागतिक सज्जता दाखवून दिली.
 
जगाला भेडसावणार्या जागतिक तापमान वाढ आणि दहशतवादाच्या प्रश्नांवरही जयशंकर यांनी गंभीर चिंता व्यक्त करत, दहशतवादविरोेधी भारताच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा पुनरुच्चार करत पाकिस्तानचे नाव न घेता कडक शब्दांत इशारा दिला. एवढेच नाही, तर अमेरिकेतीलच एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकेने पाकिस्तानला युद्धसामग्री विक्री करण्याच्या निर्णयावरही ताशेरे ओढत, अमेरिका-पाकिस्तान संबंधांमुळे दोन्ही देशांचे आजवर काहीच भले झाले नसल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
 
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या कार्यपद्धतीतही व्यापक सुधारणांची यावेळी अपेक्षा व्यक्त करत, दक्षिणेकडे होणारे दुर्लक्ष आणि अन्याय यावरही नेमक्या शब्दांत बोट ठेवले. भारत आपल्या परीने जागतिक मदतीसाठी सदैव तत्पर आहेच, पण आता जगानेही आपापसातील हेवेदावे, उत्तर विरुद्ध दक्षिण, विकसित विरुद्ध अविकसित राष्ट्र अशा भेदांपलीकडे जात जागतिक कल्याणासाठी एकत्र येण्याची हीच वेळ असल्याचे जयशंकर यांनी जगाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘भारत भाग्यविधाता’ ही आपल्या राष्ट्रगीतातच मुळी अंकित भावना भारताचा खणखणीत आवाज ठरलेल्या एस. जयशंकर यांनी जगासमोर मांडली. त्यामुळे समस्त भारतीयांच्या मनात आत्मभान जागृत करणारे आणि जगाच्याही डोळ्यात अंजन घालणार्या जयशंकर यांच्या भाषणाचे कौतुक करावे तेवढे कमीच!