जळगावात पीएफआयशी संबंधित एकाला अटक; एटीएसची कारवाई

    दिनांक : 27-Sep-2022
Total Views |
जळगाव : देशभरात पीएफआयच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. जळगावात आजही (दि. २७) एटीएसने एकाला ताब्यात घेतलं आहे. उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव), असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पटेल विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसून सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अनिस हा पीएफआय संघटनेत शारीरीक शिक्षक असल्याची माहिती मिळाली. अनेक दिवसापासून तो या संघटनेचे काम करीत होता.
 
 
 

arreast 
गेल्या आठवड्यात दि. २२ रोजी एटीएसने मेहरुण परिसरातून एकाला ताब्यात घेतले होते. यानंतर आज पुन्हा एटीएसने कारवाई केली आहे. जळगाव दहशतवाद विरोधी शाखा, एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या यांच्या संयुक्त पथकाने पीएफआय या संस्थेशी संबंधित उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव) याला पहाटे साडेतीन वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत शहाद्याचा एक तरुण होता. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले होते. तर पटेल याला सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करत कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
 
२२ सप्टेबर रोजी दहशतवादी विरोधी पथकाने मेहरुणमधील दत्त नगरातील एका धार्मिकस्थळावर छापा टाकून अब्दुल हद्दी अब्दुल रौफ (वय ३२,रा.रमहेमान गंज, जालना) याला ताब्यात घेतले होते. अब्दुल हा पीएफआय या संस्थेचा खजिनदार तसेच जालना जिल्ह्याचा सोशल मिडिया प्रमुख होता. दरम्यान, आता पटेल याला पहाटेच ताब्यात घेण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. जळगाव दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख चंद्रकांत पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.