जळगाव जिल्ह्यातील लताबाई सोनवणेंचे पद धोक्यात !

    दिनांक : 27-Sep-2022
Total Views |
 
आमदारकी रद्द करण्याची द ट्रायबल ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांची राज्यपालांकडे मागणी

जळगाव : जिल्ह्यातील लताबाई सोनवणें अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातनू शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. वैध जात प्रमाणपत्रावरून शिंदे गटाच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स (द ट्रायबल ऑर्गनायझेशन) चे अध्यक्ष सुशीलकुमार पावरा आणि संघटनेच्या राज्यभरातील एकूण 522 पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. आता राज्यपाल निवडणूक आयोगाचे मत विचारात घेऊन काय निर्णय घेणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
 
 

latabai 
 
 
 
कोण आहेत आमदार लताबाई सोनवणे?
 
लताबाई चंद्रकांत सोनवणे ह्या जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातनू शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. सध्या त्या शिंदे गटाच्या आमदार आहेत. 13 वी विधानसभा निवडणूक जिंकून येणाऱ्या माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनावणे यांच्या त्या पत्नी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबतच्या 40 आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा समावेश होता आणि त्यात सोनवणे या एक होत्या. यावेळी शिवसेनेकडून आमदार लताबाई सोनवणे यांना महाराष्ट्र विधानसभा मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव यांच्या स्वाक्षरीने नोटीस देखील बजावण्यात आली होती.
 
काय आहे प्रकरण?
 
आमदार सोनवणे यांनी 2019 ची सार्वत्रिक निवडणकू लढवताना खोटे जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले होते. दरम्यान, आमदार सोनवणे यांचे "टोकरे कोळी" अनुसूचित जमातीचे जात वधता प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार जिल्हा यांनी 9 फेब्रुवारी, 2022 रोजी अवैध ठरवले होते. त्या अनुषंगाने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर रीट याचिकेतनू कमिटीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठाने 10 जून 2022 रोजी ही याचिका फेटाळून लावत प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता.
 
या संदर्भात आमदार सोनवणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली असता ती देखील 9 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या विरोधात बिरसा फायटर्स ऑर्गनायझेशनने राज्यपालांसमोर राज्यघटनेच्या कलम 192 अन्वये वकील भूषण महाजन यांच्या माध्यमातून मागणी केली आहे. आमदार लताबाई चंद्रकांत सोनवणे यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी खोटे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देऊन संविधानाची फसवणूक केली आहे असा यक्तिवाद त्यांनी राज्यपालांकडे केला आहे.
 
आमदारकी रद्द होण्याचे निकष
 
कलम 191 (1) अन्वये सोनवणे यांची अपात्रता ही निवडणूक पूर्व अपात्रता आहे. त्यामुळे त्या खोट्या अनसुचित जमातीच्या प्रमाणपत्रावर आधारित आहेत आणि कलम 192 अन्वये अपात्र ठरण्यास पात्र आहेत. लताबाई चंद्रकांत सोनवणे या शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आता नवीन सरकारच्या शिंदे गटाच्या आमदार आहेत. त्यांनी शिवसेनापक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, सध्या पक्षाच्या अधिकृत चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कार्यवाही प्रलंबित आहे.