...तर पाकिस्तानात जा!

    दिनांक : 26-Sep-2022
Total Views |
‘पीएफआय’ समर्थक इस्लामी कट्टरपंथियांची निष्ठा भारतात नव्हे तर पाकिस्तानातच असल्याचे स्पष्ट झाले. पण, त्यांनी तेवढ्यापुरतेच थांबू नये, तर त्यांच्यासारख्या विचारांचे जे जे असतील त्या त्या सर्वांनी सरळ पाकिस्तानात निघून जावे. देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभ्या राहणार्‍या पाकिस्तान-इस्लामी राज्याच्या नेतृत्वाच्या बरोबरीने आपणही ‘अल्ला के नाम पे दे दो’ म्हणावे.
 

pakisthan 
 
 
 
देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अड्ड्यांवर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. त्यात ‘पीएफआय’च्या शेकडो नेते-कार्यकर्त्यांना तपास यंत्रणांनी अटक केली. मात्र, त्याविरोधात ‘पीएफआय’ समर्थकांनी हिंसक निदर्शने केली. केरळमध्ये ‘पीएफआय’ समर्थकांनी पेट्रोलबॉम्बसह दगडफेक करत अशांतता माजवली, तर तामिळनाडू, कर्नाटकातही हिंसक निदर्शने केली. त्यासोबतच ‘पीएफआय’ समर्थकांनी महाराष्ट्रातल्या पुण्यातही तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा प्रयत्न केला. मात्र, ‘पीएफआय’ समर्थकांचे आंदोलन सुरु होण्याआधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे ‘पीएफआय’ समर्थकांनी आंदोलनाचे नियोजन रद्द केले, पण याचवेळी जमलेल्या आंदोलकांनी ‘नारा-ए-तकबीर’, ‘अल्ला-हू-अकबर’सह थेट ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची नारेबाजी केली.
 
धर्मांध इस्लामी आक्रमकांच्या पाच पातशाह्यांना गाडून हिंदू साम्राज्याची स्थापना करणार्‍या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची नारेबाजी करणार्‍यांचा खरेतर कडेलोटच करायला हवा, तो अर्थातच ‘युएपीए’ आणि देशद्रोहाच्या कलमांतर्गतच! राज्यात फडणवीस-शिंदेंच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्याने तसे होईलही. पण, यातून ‘पीएफआय’ समर्थक इस्लामी कट्टरपंथियांची निष्ठा भारतात नव्हे तर पाकिस्तानातच असल्याचे स्पष्ट झाले, नव्हे ते त्यांनी स्वतःहूनच दाखवून दिले. पण, त्यांनी तेवढ्यापुरतेच थांबू नये, तर त्यांच्यासारख्या विचारांचे जे जे असतील त्या त्या सर्वांनी सरळ पाकिस्तानात निघून जावे. देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांसमोर भिकेचा कटोरा घेऊन उभ्या राहणार्‍या पाकिस्तान-इस्लामी राज्याच्या नेतृत्वाच्या बरोबरीने आपणही ‘अल्ला के नाम पे दे दो’ म्हणावे.
 
‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना सोडणार नाही, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील कठोर कारवाईचा इशारा दिला. याव्यतिरिक्त समाजमाध्यमांतही ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍या ‘पीएफआय’समर्थक धर्मांध मुस्लिमांविरोधात प्रचंड रोष आहे. तो ते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्तही करत आहेत, पण इस्लामी कट्टरपंथीयांना समर्थन देणार्‍या टोळ्याही त्यावर व्यक्त होत असल्याचे दिसते. त्यातल्या अनेकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची नारेबाजी करणार्‍यांचे समर्थन करताना सर्वसामान्यांना संभ्रमित करु शकेल, असा मुद्दा उपस्थित केला. परदेशात राहणारे भारतीय 15 ऑगस्ट-स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी-प्रजासत्ताक दिन साजरा करतात. त्यावेळी त्यांच्याकडून ‘भारतमाता की जय’, ‘जय हिंद’ची नारेबाजी केली जाते.
 
तरी त्यांना त्या देशांतले प्रशासन, सरकार देशद्रोही ठरवत नाही, मग आता पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची नारेबाजी करणारे देशद्रोही कसे? त्यांनी ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’ तर म्हटले नाही ना? असा प्रश्न विचारत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांचे समर्थन केले आहे. पण, परदेशात राहणार्‍या भारतीयांची मायभूमी भारतच आहे, तर भारतात राहणार्‍या मुस्लिमांनी फाळणीवेळी पाकिस्तानला आपली मायभूमी निवडले नव्हते. त्यामुळे त्यांना ‘हिंदुस्तान जिंदाबाद’च म्हणावे लागेल, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ नव्हे. त्याउलट कोणी करत असेल तर त्याला देशद्रोहाशिवाय अन्य काहीही म्हणू शकत नाही आणि त्यांच्या जोडीला त्यांना समर्थन देणारेही देशद्रोहीच!
 
‘पाकिस्तान जिंदाबाद’चे समर्थन करण्यामागेही ‘पीएफआय’ची काम करण्याची पद्धतीच आहे. ‘नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट’ व अन्य संघटनांच्या एकत्रिकीकरणातून 2006 साली स्थापन झालेली ‘पीएफआय’ वरकरणी दहशतवादी संघटना वाटत असली तरी ती ‘अल-कायदा’, ‘लष्कर-ए-तोएबा’, ‘इसिस’सारखे काम करत नाही. तर ‘पीएफआय’ ‘मुस्लीम ब्रदरहूड’ संघटनेप्रमाणे काम करते. ‘मुस्लीम ब्रदरहूड’ने सौदी अरेबिया, तुर्की, बहारीन, इजिप्तसारख्या देशांत दहशतवादी कारवायांत सामील होण्याचे टाळत त्यांना कट्टर इस्लामी केले. त्यासाठी ‘मुस्लीम ब्रदरहूड’ने विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, न्यायाधीश, पत्रकार-संपादकांच्या रुपात आपल्या सदस्यांची घुसखोरी केली. त्यातून त्या त्या क्षेत्रात कट्टर विचारांचा प्रचार-प्रसार केला गेला आणि ‘पीएफआय’देखील त्यानुसारच काम करत आहे.
 
‘पीएफआय’ने यासाठी वेगवेगळ्या संघटनांची स्थापना केली. ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’, ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’, ‘नॅशनल वुमन्स फ्रंट’ या संघटनांच्या माध्यमातून आपण दलित आणि मुस्लीम, विद्यार्थी आणि महिलांसाठी काम करत असल्याचे ‘पीएफआय’ने दाखवले. हिंसाचार, दंगलीत थेट म्होरक्यांनी भाग घेण्याऐवजी, रसदपुरवठा करण्याऐवजी एकाकडून दुसर्‍याकडे, दुसर्‍याकडून तिसर्‍याकडे अशाप्रकारे कारवाया करवून घेतल्या. अशा कार्यपद्धतीमुळे ‘पीएफआय’ला मोठ्या प्रमाणावर समर्थनही मिळाले. मुस्लीम समाजातील व्यक्तीच नव्हे, तर आज ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला योग्य ठरवणारे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादीही तयार झाले.
 
उल्लेखनीय म्हणजे, स्वतःला मुस्लिमांचे प्रतिनिधी मानणारे व कट्टर देशभक्त म्हणून पेश करणारे ‘एमआयएम’प्रमुख असदुद्दीन ओवेसीदेखील ‘पीएफआय’विरोधातील कारवाईवर शांतच आहेत. त्याचेही कारण ‘पीएफआय’चा दक्षिण भारतातील वाढता प्रसारच आहे. ‘पीएफआय’विरोधात बोलल्यास मुस्लीम आपल्याला समर्थन देणार नाही, त्यापेक्षा तोंड बंद ठेवलेले बरे, असे ओवेसींना समजले आहे. पण, मोदी सरकारने ‘पीएफआय’चे उच्चाटण करण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच ‘एनआयए’, ‘ईडी’सारख्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र, ‘पीएफआय’ची व्याप्ती देशातल्या 20 राज्यांत पोहोचली असून त्याविरोधात केंद्रालाही विशेष उपाययोजना कराव्या लागतील. कारण, ‘सिमी’वर बंदी घातली तर ‘पीएफआय’ तयार झाली, आता ‘पीएफआय’ सदस्यांना अटक केली, त्या संघटनेवर बंदीही घातली जाईल. पण नंतर अशीच संघटना तयार होणार नाही, यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तसे झाले तर नक्कीच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणण्याची हिंमतही कोणी करु शकणार नाही.