सावधान ... पावसानंतर पडणार आता गोठविणारी थंडी

    दिनांक : 20-Sep-2022
Total Views |
उत्तर भारतातील डोंगराळ भागात गेल्या 3 दिवसांपासून बर्फवृष्टी
 
नवी दिल्ली :देशातील बहुतांश भागात जोरदार पावसानंतर मान्सून लवकरच निरोप घेणार असून थंडीचे आगमन होणार आहे. दरम्यान देशात यंदा कडाक्याची थंडी पडण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. शीखांचे पवित्र तीर्थक्षेत्र बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबच्या शिखरांसोबतच केदारनाथमध्येही पहिली बर्फवृष्टी झाली आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागात गेल्या 3 दिवसांपासून बर्फवृष्टी होत असून, बद्रीनाथ, हेमकुंड साहिबमध्ये पारा घसरल्याने थंडी वाढली आहे.
 
 

thandi
 
 
 
 
केदारनाथ, बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबमध्ये तीन दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू असून पर्वतांची शिखरे बर्फाने झाकली गेली आहेत. या मोसमात चारधामला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्याही मोठी असते, त्यामुळे येथे मोठी गर्दी असते. अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे भाविक आणि पर्यटक येथे बर्फवृष्टीचा आनंद लुटत आहेत. दरम्यान उत्तराखंडच्या मैदानी भागात cold थंडी झपाट्याने वाढली आहे. खरं तर, मंगळवारी या मोसमात दुसऱ्यांदा केदारनाथच्या उंच शिखरांवर बर्फवृष्टी झाली. केदारनाथ भागातही यंदा चांगला पाऊस झाला असून आता बर्फवृष्टीमुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे, त्यामुळे चारधाम यात्रेकरूंची संख्याही वाढली आहे.गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या उंच शिखरांवरही बर्फवृष्टी झाली. चारधाममध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीनंतर आता कडाक्याची थंडी जाणवू लागली असून येथील लोकांनी उबदार कपडे काढण्यास सुरुवात केली आहे. हवामान केंद्राचे संचालक बिक्रम सिंह यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टीपासून दिलासा मिळू शकतो मात्र थंडीही वाढण्याची शक्यता आहे.