देशभरात दोन हजार ठिकाणी घेतली जाणार ‘हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा’ !

    दिनांक : 02-Sep-2022
Total Views |
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक-पूर्ती निमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

जळगाव : हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने गेली २० वर्षे अविरतपणे कार्यरत आहे. या वर्षी 26 सप्टेंबर 2022 या दिवशी अर्थात घटस्थापनेच्या दिनी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या द्विदशक-पूर्ती निमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत हे अभियान राबवले जाईल. या अभियानात देशभरात 2000 हून अधिक ठिकाणी ‘हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा' घेण्यात येणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली आहे.

HINDU-RASHTRA 
 

हिंदु राष्ट्र संकल्प अभियानातील विविध उपक्रम !
 
‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’त ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील 3000 ठिकाणी व्याख्याने, 2000 ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, 1000 मंदिरांची आणि 250 ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, 350 ठिकाणी महिला संघटनाचे उपक्रम तर 200 ठिकाणी महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याशिवाय 30 हून अधिक ‘हिंदु राष्ट्र संघटन मेळावे’, 50 ठिकाणी ‘वर्धापनदिन सोहळे’, 50 ठिकाणी 'हिंदु राष्ट्र परिसंवाद', 70 ठिकाणी पथनाट्ये, 200 हून अधिक संघटनांच्या बैठका, 60 हून अधिक अधिवक्ता बैठका आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत. या उपक्रमांतून हिंदु समाजमनात हिंदु राष्ट्राचा संकल्प दृढ व्हावा आणि हिंदु समाजाने हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, यादृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे, असेही शिंदे म्हणाले.
 
या अभियानाचा शुभारंभ चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील श्री परशुराम मंदिरात श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकापूर्वी भगवान श्री परशुरामांची महापूजा केली. समर्थ रामदास स्वामी यांनी श्री परशुराम मंदिरासमोर दक्षिणाभिमुख हनुमंताचे मंदिर बांधले. अशा ठिकाणी समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात राबवल्या जाणार्‍या ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’चा शुभारंभ होणे हा शुभसंकेतच म्हणावा लागेल, असेही शिंदे यांनी सांगितले.