धक्कादायक... सीसीटीव्ही झाकून 5 मुली निवारागृहातून 5 मुली पळाल्या

    दिनांक : 01-Sep-2022
Total Views |
पुणे : घरून काहीही न सांगता पुण्यात आलेल्या पाच अल्पवयीन मुलींनी फुरसुंगीच्या निवारागृहातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना चकवा देत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर प्लास्टिकची पिशवी टाकून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

cc
 
 
 
 
 
या पाच मुलींपैकी चार मुली सोळा वर्षांच्या, तर एक 17 वर्षांची आहे.
 
एक मुलगी आईसोबत भीक मागत असताना दिवे येथून पुण्यात पळून आली होती. दोन मुली जळगाव येथून पुण्यात आल्या होत्या. तर, एक मुलगी प्रेमप्रकरणातून बिहार येथून आपल्या अल्पवयीन प्रियकराबरोबर पुण्यात आली होती. तसेच, उत्तर भारतातून आणखी एक मुलगी, अशा पाच मुलींना बाल कल्याण समितीसमोर नुकतेच हजर करण्यात आले होते.
 
निवारागृहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाचही जणींनी हिरीरीने सहभागदेखील घेतला होता. त्या पळून जातील अशी कोणतीही परिस्थिती नसताना निवारागृहाच्या अधीक्षक शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेल्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास पाच जणांपैकी एकीने निवारागृहातील कॅमरेर्‍यावर प्लॅस्टिकची पिशवी टाकून पलायन केले.
 
या वेळी बिहारवरून आलेली मुलगी व उत्तर भारतातील त्या मुलीलाही बरोबर घेऊन गेली. ज्या अल्पवयीन प्रियकराला निवारागृहात पाठविण्यात आले होते. त्याच्याजवळील मोबाईलवर तिने मेसेज केले होते. त्या आधारे ती तिच्या घरी बिहारला जाण्याच्या मार्गावर असल्याचे समजल्याचे निवारागृहातील अधीक्षक अर्चना चव्हाण यांनी सांगितले.
 
पलायन करण्यात आलेल्यांपैकी एक मुलगी तिच्या आईबरोबर भिक्षा मागत होती. परंतु, ती पुण्यात पळून आली होती. निवारागृहात आल्यानंतर तिनेही इतर मुलींबरोबर पलायन केले. तिच्याबाबत माहिती घेत असताना ती मुलगी सध्या दिवे येथील तिच्या घरी पोहचली आहे. तर, जळगाव येथून घर सोडून आलेल्या मुली पुन्हा जळगावच्या दिशने निघाल्या आहेत. तर, उत्तर भारतीय दोन मुलीही त्यांच्या घरच्या वाटेवर असल्याची माहिती समजली आहे.
 
– अर्चना चव्हाण, अधीक्षक, निवारागृह, फुरसुंगी.
 
29 ऑगस्टनंतर 30 ऑगस्टच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील फुरसुंगीमधील सुधारगृहात पाठविण्यात आलेल्या पाच मुलींनी कोणालाही काही न सांगता पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधारगृहाच्या अधीक्षक अर्चना चव्हाण (37) यांनी फिर्याद दिली आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे.
 
– सुशील डमरे, पोलिस उपनिरीक्षक, हडपसर पोलिस