विकासरथाचे सारथ्य स्त्रीशक्तीकडे

09 Aug 2022 10:16:33
 
वेध
 
कर्तृत्वात पुरुषांपेक्षा काकणभर (Women power) सरस महिला, आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत.
 
 
 

shrishakti 
 
 
 
कोणत्याही क्षेत्रात आर्थिक बाजू ही सर्वांत महत्त्वाची असते. ज्या देशात अर्थमंत्री म्हणून उच्चशिक्षित महिला विराजमान आहे, त्या देशात महिलांना किती सन्मान दिला जातोय्, हे वेगळ्याने सांगण्याची गरजच नाही. केवळ अर्थमंत्रीच नव्हे तर अगदी परराष्ट्रमंत्रिपदही या देशात महिलेने भूषविले आहे. आपल्या कर्तृत्वाने देशातील अनेक महिलांनी यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे. राजकारण, क्रीडा, अवकाश, कला, विज्ञान, आरोग्य, संरक्षण, अर्थ, न्यायालय, साहित्य, तंत्रज्ञान अशा अनेक अवघड क्षेत्रांत महिलांनी देशाच्या प्रगतीमध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे. महिला काहीच करू शकत नाहीत, हा भ्रम देशातील असंख्य महिलांनी खोटा ठरविला आहे.
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, (Women power) स्व. इंदिरा गांधी, स्व. सुषमा स्वराज, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पी. टी. उषा, किरण बेदी, कल्पना चावला, स्व. लता मंगेशकर अशा अनेक महिलांनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. अथांग प्रेमाचा ओतप्रोत भरलेला हा सागर, वेळ पडल्यास रणरागिणीही बनू शकतो, हा भारतीय इतिहास आहे. प्राचीन, सुंदर परंपरेने नटलेल्या या देशाच्या संस्कृतीने मातृशक्तीला पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला आहे. या परंपरेला पाईक होण्याची पात्रताही जगामध्ये सर्वाधिक भारतातच दिसून येईल. चूल आणि मूल या परिघामधून बाहेर पडून कीर्तिमान स्थापन करण्यात भारतीय महिला सदैव अग्रेसर राहिल्या आहेत. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, ताराराणी व यांच्यासारख्या कितीतरी महिलांनी आपल्या रक्ताचे पाणी करून इतिहासामध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. देशाच्या विकासात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही अमूल्य योगदान राहावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सदैव सजग असतात. (Women power) महिलांच्या हितासाठी अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला आहे.
 
राजकारणाच्या पटापासून तर खेळाच्या मैदानापर्यंत (Women power) महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. आता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) संचालकपदी नल्लाथंबी कलैसेल्वी यांची झालेली नियुक्ती त्याचे ताजे उदाहरण ठरले आहे. सीएसआयआर ही देशामधील सर्वोच्च विज्ञान संस्था असून, या संस्थेचे प्रमुखपद भूषविणे हा एक गौरवच आहे. या पदावर पोहोचणार्‍या त्या देशातील प्रथम महिला ठरल्या आहेत. नल्लाथंबी कलैसेल्वी या फेब्रुवारी 2019 पासून तामिळनाडूच्या कराईकुडी येथील केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कार्यरत होत्या. सीएसआयआर हे देशभरातील 38 संशोधन संस्थांचे संघटन असून, 1942 मध्ये त्याची स्थापना झाली आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने नवीन प्रणालीचा शोध घेणे, संशोधन क्षेत्रात सक्षम नेतृत्व पुरविणे, विकसित तंत्रज्ञानाबाबत उद्योगजगताला मार्गदर्शन करणे तसेच देशाच्या आर्थिक व (Women power) सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्नशील राहणे हे सीएसआयआरचे प्रमुख कार्य आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत व पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद कार्य करते.
 
सीएसआयआर या संस्थेमध्ये जवळपास 4 हजार 600 वैज्ञानिक कार्यरत आहेत, तर त्यांना साहाय्य करणारे जवळपास 8 हजार कर्मचारी आहेत. देशाच्या ग्रामीण भागातील विकासासाठी सीएसआयआर लागवड, प्रक्रिया उपक्रम, हस्त आणि लघुउद्योग, पर्यावरण व स्वच्छता, खाद्यान्न, शेतीविषयक, पेयजल तसेच निवासस्थाने बांधकाम या क्षेत्रांसाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचे कार्य करीत असते. सीएसआयआरचे दरवर्षी नावीन्यपूर्ण संशोधनासंदर्भात हजारो अहवाल प्रसिद्ध होत असतात. देशाच्या विकासात सीएसआयआरचे अमूल्य असे योगदान आहे. कराईकुडी, पिलानी, चंदीगड, नागपूर, व जमशेदपूर येथे या संस्थेची राष्ट्रीय प्रयोगशाळांची विभागीय केंद्रे आहेत. अशा या (Women power) अवाढव्य पसारा असलेल्या व देशाच्या सर्वोच्च संस्थेच्या महासंचालकपदी एका महिलेची वर्णी लागणे, ही मातृशक्तीची कर्तव्यनिष्ठा, कर्तव्यपरायणता व जिद्दीचे उदाहरण आहे.
 
- चंद्रकांत लोहाणा 

- 9881717856
Powered By Sangraha 9.0