आपली ध्वज संहिता (भाग- 5)

09 Aug 2022 13:27:26
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज संहिता 2006 ची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून विविध भागात ही माहिती देण्यात येत आहे. त्याचा भाग पाचवा असा…
 
 

tiranga 
 
 
 
 
कलम सहा, सलामी : ध्वजारोहणाच्या अथवा ध्वजावतरणाच्या प्रसंगी अथवा एखाद्या संचालनामधून ध्वज नेण्यात येत असताना अथवा पाहणी करीत असताना उपस्थित असलेल्या व्यक्तींनी त्याला उचित रीतीने सलामी द्यावी जेव्हा ध्वज दलाबरोबर नेला जातो तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या व्यक्ती, तो समोरून नेला जात असताना, सावधान स्थितीत उभ्या राहतील किंवा सलामी देतील. उच्चपदस्थ व्यक्तीला शिरोवस्त्र (Head Dress) न घालता सलामी घेतली तरी चालेल. कलम सात, इतर राष्ट्रे व संयुक्त राष्ट्रसंघाच्या ध्वजासमवेत राष्ट्रध्वज लावणे – आपला राष्ट्रध्वज हा जेव्हा इतर देशांच्या ध्वजाबरोबर सरळ रांगेत उभारावयाचा असेल तेव्हा तो उजवीकडे टोकाशी उभारावा म्हणजे जर एखादा निरीक्षक ध्वजाच्या रांगेच्या मध्यभागी प्रेक्षकांकडे तोंड करून उभा राहिला, तर राष्ट्रध्वज त्याच्या उजव्या हाताला टोकाकडे असावा. आपल्या राष्ट्रध्वजानंतर परदेशाचे राष्ट्रध्वज त्या- त्या देशांच्या नावांच्या इंग्रजी पाठाच्या आधारे वर्ण क्रमानुसार उभारावे. त्याशिवाय ध्वजाच्या रांगेत सुरवातीला आणि शेवटीही आपला राष्ट्रध्वज उभारता येईल आणि देशांच्या नावांचा इंग्रजी वर्ण क्रमाप्रमाणे सामान्यपणे जेथे त्याचे स्थान येईल तेथेही तो उभारता येईल.
 
आपला राष्ट्रध्वज सर्वांत अगोदर उभारण्यात यावा आणि सर्वांत शेवटी उतरविण्यात यावा. ध्वज जर खुल्या वर्तुळात म्हणजे एखाद्या कंसाकार अगर चापाकृती रचनेत वा अर्धवर्तुळात उभारावयाचे असतील, तर या कलमाच्या अगोदरच्या खंडात सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब करावा. ध्वज जर बंद वर्तुळात म्हणजेच पूर्ण वर्तुळात उभारावयाचे असतील, तर राष्ट्रध्वज वर्तुळाच्या सुरवातीस उभारावा आणि इतर देशांचे ध्वज घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने उजवीकडून डावीकडे उभारावेत की जेणेकरून शेवटचा ध्वज राष्ट्रध्वजाच्या शेजारी यावा. ध्वजाच्या वर्तुळाची सुरवात किंवा अखेर दर्शविण्यासाठी वेगवेगळे राष्ट्रध्वज उभारण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारच्या बंद वर्तुळात राष्ट्रध्वजाचा त्याच्या वर्ण क्रमानुसार येणाऱ्या जागी देखील समावेश करावा.
 
भिंतीवर दोन काठ्या फुलीसारख्या एकावर एक ठेवून त्यावर राष्ट्रध्वज दुसऱ्या एखाद्या ध्वजाबरोबर लावावयाचा असेल, तर अशा वेळी राष्ट्रध्वज दुसरीकडे म्हणजे ध्वजाच्या उजव्या बाजूला असावा आणि राष्ट्रध्वजाची काठी वरच्या बाजूस व दुसऱ्या ध्वजाची काठी मागे असावी. जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजाबरोबर फडकावयाचा असेल तेव्हा राष्ट्रध्वजाच्या कोणत्यही बाजूला तो लावता येतो. याबाबत नेहमीची पद्धत अशी की ध्वजाचे तोंड ज्या दिशेला असेल तिच्या उजवीकडच्या टोकाला (म्हणजे ध्वजाच्या काठ्यांकडे बघणाऱ्यांच्या अगदी डावीकडच्या टोकाकडे) राष्ट्रध्वज लावावा. जेव्हा राष्ट्रध्वज इतर देशांच्या ध्वजाबरोबर फडकावयाचा असेल तेव्हा सर्व ध्वजांच्या काठ्या सारख्या आकाराच्या असाव्यात. शांततेच्या काळात एका राष्ट्राच्या ध्वजाच्यावर दुसऱ्या राष्ट्राचा ध्वज लावणे आंतरराष्ट्रीय परिपाठाप्रमाणे निषिद्ध आहे. राष्ट्रध्वज एकाच काठीवर एकाच वेळी अन्य कोणत्याही ध्वजाबरोबर किंवा ध्वजांबरोबर लावू नये. निरनिराळ्या ध्वजांसाठी निरनिराळ्या काठ्या असाव्यात.
 
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,
धुळे
Powered By Sangraha 9.0