आपली ध्वज संहिता (भाग- 3)

08 Aug 2022 15:30:11
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर, इमारतीवर तिरंगा ध्वज लावावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय ध्वज संहिता 2006 ची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी म्हणून विविध भागात ही माहिती देण्यात येत आहे. त्याचा तिसरा भाग असा…
 
 
 

tiranga 
 
  
कलम दोनमध्ये ध्वजाविषयीची आदरभावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रध्वज शैक्षणिक संस्थांमध्ये(शाळा, महाविद्यालये, क्रीडा शिबिरे, बालवीरांची शिबिरे इत्यादीमध्ये) लावता येईल. याबाबत मार्गदर्शनपर सूचना पुढील प्रमाणे आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोकळ्या चौरस जागेत शिस्तबद्ध रितीने असे उभे राहावे की, या चौरस जागेच्या तीन बाजूस विद्यार्थी असतील आणि चौथ्या बाजूच्या मध्यभागी ध्वजस्तंभ असेल. मुख्याध्यापक, विद्यार्थी नेता आणि ध्वज फडकविणारी व्यक्ती (मुख्याध्यापका व्यतिरिक्त अन्य व्यक्ती असेल, तर) हे ध्वजस्तंभाच्या मागे तीन पावले उभे राहतील. विद्यार्थी आपापल्या वर्गानुसार व दहा- दहाच्या (किंवा विद्यार्थी संख्येनुसार कमी अधिक विद्यार्थी संख्येच्या) तुकड्या करून रांगेत उभे राहतील. या तुकड्या एकामागे दुसरी अशा पद्धतीने उभ्या कराव्यात. वर्गाच्या विद्यार्थी नेत्याने त्याच्या वर्गाची जी पहिली रांग असेल तिच्या उजवीकडे उभे राहावे आणि वर्ग शिक्षकाने आपल्या वर्गाच्या शेवटच्या रांगेमध्ये मागे तीन पावले मध्यभागी उभे राहावे. सर्वांत वरचा वर्ग उजवीकडील टोकास या प्रमाणे वरिष्ठतम वर्गाच्या क्रमानुसार वर्गांची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक रांगेमधील अंतर कमीत कमी एका पावलाइतके (30 इंच) असावे आणि तुकड्या-तुकड्यांमधील अंतरही तेवढेच असावे. जेव्हा प्रत्येक तुकडी किंवा वर्ग तयार असेल तेव्हा वर्ग नेता एक पाऊल पुढे टाकील आणि शाळेच्या निवडलेल्या विद्यार्थी नेत्याला सलामी देईल. सर्व तुकड्या तयार झाल्यावर लगेचच विद्यार्थी नेता मुख्याध्यापकां पाशी जाईल आणि त्यांना सलामी देईल. मुख्याध्यापक ही सलामी स्वीकारतील. त्यानंतर ध्वज फडकवण्यात येईल. त्यासाठी विद्यार्थी नेता साहाय्य करील. ध्वज प्रत्यक्ष फडकवण्यापूर्वी संचलनाचा (किंवा विद्यार्थ्यांच्या समुहाचा) प्रमुख असलेला शाळेतील विद्यार्थ्यांचा नेता संचलनातील विद्यार्थ्यांना सावधान स्थितीमध्ये उभे राहण्याचा आदेश देईल. ध्वज फडकायला वेळ लागेल तेव्हा त्यांना ध्वजाला सलामी देण्याचा आदेश देईल. संचलनातील विद्यार्थ्यांनी थोडा वेळ सलामीच्या स्थितीत उभे राहावे आणि त्यानंतर पूर्ववत हा आदेश मिळाल्यानंतर परत सावधान स्थितीत उभे राहावे. ध्वजाला सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीत सुरू असेपर्यंत संचलनातील विद्यार्थ्यांनी सावधान स्थितीत उभे राहावे.
 
जेव्हा प्रतिज्ञा घ्यावयाची असेल अशा सर्व प्रसंगी, राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रतिज्ञा घ्यावी. प्रतिज्ञा घेतली जात असेल तेव्हा विद्यार्थी समूहाने सावधान स्थितीत उभे राहावे आणि मुख्याध्यापक समारंभपूर्वक प्रतिज्ञा म्हणतील व विद्यार्थी समूह त्यांच्या मागोमाग प्रतिज्ञा म्हणेल. राष्ट्रध्वजाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेताना हात जोडून उभे राहून सर्वांनी एकत्रितपणे पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा म्हणावी, ‘मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतिक आहे त्या सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो’.
 
संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,
धुळे
Powered By Sangraha 9.0