ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत ७५ मुले-मुली पुन्हा परतली पालकांकडे

05 Aug 2022 12:17:22
जिल्हा पोलीस दलाने शोध मोहीम राबवत आईवडिलांकडे केले सुपूर्द
 
जळगाव : कुटुंबीयांशी झालेला वाद, अभ्यासाचा ताण यामुळे रागाच्या भरात किंवा शहरी सुखासिन जीवनाचे आकर्षणापोटी अशा विविध कारणांमुळे अनेकदा अल्पवयीन मुले-मुली घरातून पळून जावून रेल्वे किंवा बस स्थानक गाठतात. रागाच्या भरात घरातून पळून आलेल्या अशा मुला-मुलींचा स्थानिक जिल्हा पोलीस दलाच्या ‘निर्भया’ पथकाने शोध घेऊन ७५ मुला-मुलींना त्यांच्या पालकांकडे सुखरूप पोहचवले आहे. 
 

child 
 
 
पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार जिल्हयात १ ते ३० जून २०२२ दरम्यान जिल्हा पोलीस दलातर्फे ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियान राबविण्यात आले. अशा १० मोहीम आजवर राबविण्यात आल्या होत्या. या ११व्या मोहिमेत ४५ मुले आणि ३० मुली अशी एकूण ७५ अल्पवयीन मुले सापडली. त्यांच्या पालकांचा शोध घेउन या मुलांना त्यांच्याकडे सुखरूप सोपविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली. या मोहिमेत महिला सहायक फौजदार वैशाली महाजन, निलिमा हिवराळे, पो.हे.कॉ.रवींद्र गायकवाड, दादाभाऊ पाटील, शरद भालेराव, महिला हवालदार मनिषा पाटील, पोलीस नाईक वहिदा तडवी, पो.कॉ. गायत्री सोनवणे आदींचा सहभाग होता.
 
जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हाभरात ‘निर्भया’ पथकाव्दारे ‘ऑपरेशन मुस्कान-११’ अंतर्गत ७५ मुला-मुलींना त्यांच्या पालकांचा शोध घेत, संपर्क करून त्यांच्या स्वाधीन केले आहे. हरवलेल्या वा घरातून पळून आलेल्या किंवा आढळून आलेल्या अशा मुला-मुलींबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच ४ अल्पवयीन मुलांना बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले.  
 
डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक.
 
शाळा, महाविद्यालये, बसस्थानक वा अन्य वर्दळीच्या ठिकाणी जिल्ह्याच्या मुख्यालयी कार्यरत असलेले निर्भया पथक नेहमीच गस्तीवर असते. शाळा-महाविद्यालय परिसरात छेडखानी करणार्‍या टवाळखोरांविरूद्धदेखील ‘निर्भया‘ पथकातील महिला अधिकारी, कर्मचार्‍यांव्दारे कारवाई करण्यात येते. 
 
योगिता नारखेडे,  
एपीआय, निर्भया पथक, जळगाव
 
रेल्वे प्रशासनातर्फे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’
 
जिल्हा पोलीस पथकाप्रमाणेच रेल्वे सुरक्षा दलातर्फेही ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबविण्यात आली. यात भुसावळ विभागात विविध रेल्वे स्थानके अथवा रेल्वे हद्दीत सापडलेल्या ७२ मुले व ६६ मुली अशा एकूण १३८ मुला-मुलींना मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवरून रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ताब्यात घेतले. रेल्वे सुरक्षा दलाचे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या १३८ मुला-मुलींना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
 
‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ तर्फे ‘समतोल’ कक्ष कार्यान्वित
 
अनेकदा अल्पवयीन मुले-मुली काही कौटुंबिक समस्या किंवा शहरातील आकर्षणाला बळी पडून घरातून पळून जातात. अशी मुले रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांना ताब्यात घेतले जाते. त्यामुळे ते गैरमार्गाला वळण्याची शक्यता संपते. यासाठी आरपीएफव्दारे प्रशिक्षित जवान फलाटावर तैनात करून अशा मुलांमुलींचा शोध घेण्यासाठी मोहीम ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ राबविण्यात आली. जळगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ३ वर ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’तर्फे ‘समतोल’ हा अशा मुलांच्या शोधासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ‘समतोल’व्दारेही आजवर सुमारे १३०० हून अधिक मुला-मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
 
जळगाव रेल्वे स्थानकावरील आरपीएफ पथकाव्दारे आतापर्यंत सात मुले जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. तर १ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी सुरत येथून मुंबईकडे जाणार्‍या गाडीऐवजी हिस्सार एक्सप्रेसमध्ये नजरचुकीने बसलेल्या १४ वर्षीय मुलगा जळगाव स्थानकावर आरपीएफ जवानाला आढळून आला. या हरवलेल्या मुलाची वेळीच दखल घेत योग्य ती चौकशी करून त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
 
ज्ञानेश्वर पाटील, पोलीस निरिक्षक, (आरपीएफ) जळगाव.
Powered By Sangraha 9.0