रथचक्र उद्धरु दे!

    दिनांक : 31-Aug-2022
Total Views |

त्यामुळे मोरोपंतांच्या भाषेत, गणरायाला तुझ्या उत्सवाच्या माध्यमातून थबकलेल्या अर्थव्यवस्थेचे रथचक्र उद्धरु दे, असेच म्हणावेसे वाटते.
 

bappa 
 
 
मुंबईसह राज्यभरात आज श्रीगणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन होत आहे. तब्बल दोन वर्षांनंतर सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे. त्याला कारणही तसेच. २०२० साली चीनमधून भारतासह जगभरातल्या सर्वच देशांवर कोरोनाचे संकट आदळले. कोरोनाला रोखण्यासाठी ठिकठिकाणच्या सरकारांनी टाळेबंदीचा मार्ग स्वीकारला आणि सर्वच सार्वजनिक ठिकाणच्या मानवी हालचाली बंद झाल्या. भारताची परिस्थितीही याहून निराळी नव्हती. पण, सुरुवातीपासूनच मोदी सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचे सावट हळूहळू दूर गेले.
 
लसीकरणामुळे तर कोरोना चांगलाच आटोक्यात आला अन् देशवासीयांना आपापली कामे करायला संधी मिळाली. पण, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते अन् त्या सरकारने कोरोनाचे संकट टळलेले असूनही केवळ हिंदू मंदिरांवर, हिंदू सण-उत्सवांवर बंदी घातली. त्याचवेळी मुस्लिमांच्या वा ख्रिश्चनांच्या सणांवर बंधने लादल्याचे दिसून आले नाही. तत्कालीन महाविकास आघाडीच्या हिंदुद्वेष्टेपणाचे याहून निराळे उदाहरण ते कोणते? त्या सरकारच्या दडपशाहीमुळे हिंदूंना कोणत्याही आनंदाशिवाय, कोमेजलेल्या मनाने आपले सण साजरे करावे लागले, त्यात गणेशोत्सवाचाही समावेश होता.
 
पण, राज्यात गेल्या महिन्यात सत्ताबदल झाला आणि फडणवीस-शिंदेंचे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरेंच्या सरकारने मारुन टाकलेला हिंदूंचा आनंद पुन्हा एकदा शतगुणित करण्याचे काम फडणवीस-शिंदे सरकारने हाती घेतले. देश हिंदूंचा, राज्य हिंदूंचे आणि कोरोनाचे संकटही आवरलेले, अशा परिस्थितीत उगीचच जाचक नियम, निर्बंधांची टांगती तलवार हिंदूंच्या मानेवर लटकवण्यात कसलाही अर्थ नव्हता.
 
त्यातूनच यंदाच्या वर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोपाळकाला-दहीहंडी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. थरावर थर रचणारे गोविंदा, ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठीचा जल्लोष, कुठे अफझल खान वधाचा जीवंत देखावा, असा आनंदी अन् अभयी माहोल तयार झाला. त्यातच राज्य सरकारने दुर्दैवाने एखादी अनुचित घटना घडलीच तर गोविंदांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आला गणेशोत्सव. दरवेळी गणपतीची उंची अमूकच हवी, तमूक नियमांचे पालन केले तरच गणपती बसवता येणार नि अजून काय काय... पण यंदाच्या वर्षी तसे काही झाले नाही. फडणवीस-शिंदे सरकारमुळे कोणत्याही नियम-निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा होत आहे, गणेशभक्तांना गणेशोत्सवाचा मनसोक्त आनंद घेता येत आहे, चाकरमान्यांना आपापल्या गावी जाता येत आहे, व्यापारी पेठांतही झगमगाट आहे.
 
ढोल-ताशांच्या गजरात नाचत येणारा गणराय फक्त धार्मिक सण नसून आर्थिक चलन वलनाला गती देणारा उत्सवदेखील आहे. दोनच दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने मंदिरे कायदा-सुव्यवस्थेसमोरील समस्या असल्याचे कोणालाही न पटणारे विधान केले होते. पण, मंदिरे असो वा हिंदूंचे सण-उत्सव समस्या नसून हजारो, लाखो कोटींची उलाढाल करणारे अर्थोत्सव आहेत. नुकतीच शिर्डीतील साई मंदिरात कोरोनामुळे हार-फुले अर्पण करण्याची बंद केलेली पद्धती पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी विक्रेत्यांनी आंदोलन केले. त्याचा अर्थ काय, तर बंदी घातल्याने शिर्डीतील हार-फुलांची विक्री करणार्‍यांच्या पोटावर टाच आली. म्हणजेच, बंदी रद्द केली तर हार-फुलांच्या विक्रीतून या विक्रेत्यांचा घर-संसार चालणार! गणेशोत्सवाचेही तसेच आहे.
 
कोणत्याही नियम, निर्बंधांशिवाय साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाने राज्यातील हजारो, लाखो कुटुंबांमध्ये लखलखाट होणार असतो. त्यात गणेश मूर्ती तयार करणारे मूर्तिकार, मखर तयार करणारे, सजावटीचे साहित्य तयार करणारे, विजेच्या माळा तयार करणारे-लावणारे, मंडप-डेकोरेटर्सवाले, हार-फुल विक्रेते, धुप-उदबत्ती तयार करणारे, कपडे विक्रेते, दळणवळण सेवा पुरवणारे, शेतकरी, अशा कितीतरी घटकांना यातून लाभ होत असतो. म्हणजेच, छोट्याशा दुकानातून बसून वस्तू विक्री करणार्‍यांपासून मोठमोठ्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’करणार्‍या प्रत्येकाच्या आयुष्यात गणेशोत्सव आर्थिक समृद्धी आणत असतो.
 
कोरोनामुळे व तत्कालीन राज्य सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील व्यापार ठप्प पडल्याचे दिसून आले. पण, गणेशोत्सव वा अन्य हिंदू सण कोरोनामुळे रुतलेले अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा रुळावर आणण्याच्या, त्याला गती देण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे मोरोपंतांच्या भाषेत, गणरायाला तुझ्या उत्सवाच्या माध्यमातून थबकलेल्या अर्थव्यवस्थेचे रथचक्र उद्धरु दे, असेच म्हणावेसे वाटते. त्यानंतर येणारा नवरात्रोत्सव, दीपोत्सवदेखील असाच, अर्थव्यवस्थेच्या चक्राला बळकटी देणारा. पण, हे समजून घेण्याची क्षमता राज्यातील आधीच्या सरकारांनी दाखवली नाही आणि त्यांनी फक्त हिंदू सणांवर बंदी लादली.
 
गुलाल-फुलांची उधळण करत येणार्‍या गणरायाच्या स्वागतासाठी यंदा मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपापल्या गावी गेले. त्यांच्यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’सह भाजपच्यावतीने अनेक बस गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वे असो वा बसेस, सारे काही खच्चून भरून आपापल्या गावी जात असल्याचे यावेळी पाहायला मिळाले, यातूनच आनंदाला उधाण आल्याचे स्पष्ट झाले. राज्यात कोकणात दरवर्षी गणेशोत्सवाचा उत्साह अमाप असतो, दोन वर्षे पडलेल्या खड्ड्यांनंतर तो यंदा पुन्हा ओसंडून वाहताना दिसतो. गणेशोत्सव म्हणजे, फक्त धार्मिक कृत्य नाही, तर त्याने अर्थचक्रालाही गती मिळते, तसेच नातेगोते, मित्र-आप्तेष्टांतले संबंधही अधिक वृद्धिंगत होतात.
 
सार्वजनिकरित्या एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा होत असल्याने सामाजिक वीण घट्ट होते, एकीची भावना वाढीस लागते. ब्रिटिश काळात म्हणूनच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. आजच्या काळातही हिंदूंसमोर अनेक आव्हाने आहेत अन् त्यांचा सामना एकीच्या बळानेच केला जाऊ शकतो. त्यासाठी गणेशोत्सव एक माध्यम ठरू शकते. अशाप्रकारे, वाजत-गाजत येणारा गणराय आपल्या भाविक-भक्तांवर सर्वच प्रकारचा कृपावर्षाव करताना दिसतो. या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा!