खादीला लाभली चमक!

    दिनांक : 30-Aug-2022
Total Views |
 
मोदींनी सर्वच भारतीयांना सातत्याने खादी खरेदी करण्याचे आवाहन केले अन् खादीला नवी चमक लाभली. त्यामुळेच आज देशभरात खादीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे पाहायला मिळते.
 
 

khadi 
 
 
 
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा ‘टर्नओव्हर’ प्रथमच एक लाख कोटींच्या पल्याड गेल्याचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. देशात एखाद्या पंतप्रधानाने सार्वजनिक मंचावर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा ‘टर्नओव्हर’ मोठ्या अभिमानाने सांगण्याची ही बहुदा पहिलीच वेळ. कारण, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी येण्याआधी खादी आणि ग्रामोद्योग आयोग तसा केंद्रीय स्तरावर दुर्लक्षित विषय होता. त्यासाठी तत्कालीन काँग्रेसी सरकारांची मानसिकताच कारणीभूत होती. पण, मोदींनी सर्वच भारतीयांना सातत्याने खादी खरेदी करण्याचे आवाहन केले अन् खादीला नवी चमक लाभली. त्यामुळेच आज देशभरात खादीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे पाहायला मिळते.
 
परिणामी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) एक महत्त्वपूर्ण उपलब्धी प्राप्त करत देशातील जवळपास सर्वच ‘एफएमसीजी’ कंपन्यांनादेखील पछाडले आहे. ‘केव्हीआयसी’ने सरलेल्या आर्थिक वर्षात प्रथमच १.१५ लाख कोटींचा व्यापार केला अन् तो गेल्या वर्षीच्या म्हणजे २०२०-२१ च्या ९५ हजार, ७४१.७४ कोटींच्या तुलनेत २०.५४ टक्के अधिक आहे. सोबतच आर्थिक वर्ष २०१४- १५ च्या तुलनेत २०२१- २२ मध्ये खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या एकूण उत्पादनात १७२ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली. याचदरम्यान संपूर्ण विक्री तब्बल २४८ टक्क्यांनी वाढली.
 
नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी येताच जनतेशी संवाद साधण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाकडे न जाता आकाशवाणीच्या माध्यमातून ‘मन की बात’ सुरु केली. त्यातून त्यांना आपले विचार जनतेपुढे मांडता आले, तसेच जनतेकडूनही अनेक चांगले विचार पुढे आले. त्यातल्याच, रविवार, दि. २ ऑक्टोबर, २०१४ रोजीच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम देशवासीयांना खादी खरेदीचे आवाहन केले होते. त्यानंतर खादीच्या उत्पादन व विक्रीत मोठी वाढ झाली. नंतर पुन्हा एकदा रविवार, दि. २५ जुलै २०२१ रोजी पंतप्रधानांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये खादीचा उल्लेख केला. त्याचाही खादीच्या उत्पादन व विक्रीवर सकारात्मक परिणाम झाला.
 
देशाचे सर्वोच्च नेतृत्व खादीसारख्या विषयाकडे जनतेचे वारंवार लक्ष वेधतो अन् जनतादेखील त्याला भरभरुन प्रतिसाद देते, हे अद्भुत दृश्य त्यानंतर पाहायला मिळाले. कारण, मोदींनी खादी खरेदीचे आवाहन आले मनात म्हणून केलेले नव्हते, तर त्यामागे जनसेवा अन् राष्ट्रसेवेची भावना होती. खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची निर्मिती सामान्यपणे ग्रामीण भागात होते अन् त्यात काम करणारे विणकर वा अन्य कामगार हातावर पोट असणारेच असतात. खादीची मागणी व विक्री वाढली, तर त्यांच्या जीवनात समृद्धीचे क्षण येणार असतात. पंतप्रधान मोदींनी तोच विचार केला अन् खादीलाही राष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा मुद्दा केले. उल्लेखनीय म्हणजे, जनतेनेही त्यांचे यामागचे विचार समजून घेतले अन् त्यांच्या आवाहनानुसार खादी खरेदीकडे पावले वळवली.
 
मात्र, या सगळ्या प्रक्रियेत नरेंद्र मोदींनी सरकार म्हणून घेतलेले निर्णय, राबवलेल्या योजनांनी खादीचे उत्पादन, मागणी व विक्री वाढवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. ‘खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन’ अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. ‘खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन’चा नारा देत खादी व ग्रामोद्योगाला मोदी सरकारने नवे रुप दिले. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी येताच ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेकानेक उपक्रमांची सुरुवात केली. भारताच्या ग्रामीण भागात, तिथल्या जनतेत अफाट क्षमता असून त्याला संधी दिली तर त्यातून महत्कार्य घडू शकते, हे मोदींनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी खादी व ग्रामोद्योगच्या ग्रामीण भागातील केंद्रांच्या उत्थानाच्या दिशेने प्रयत्नांना वेग दिला.
 
गावा-गावातींल छोट्या छोट्या खादी व ग्रामोद्योगच्या केंद्रांना पंतप्रधानांनी अनेक योजनांच्या साहाय्याने प्रत्येक आवश्यक साधन-संसाधने उपलब्ध करुन दिले. खादी व ग्रामोद्योग केंद्र सुरु करण्यासाठी सुलभ कर्जाची उपलब्धता करुन दिली. इतकेच नव्हे, तर काँग्रेसी सरकारांप्रमाणे उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खादी व ग्रामोद्योगाशी संबंधित कामगारांच्या गरजा आणि अडीअडचणी समजून घेतल्या, त्या दूर करण्याच्या तरतुदी केल्या. संपूर्ण उन्नतीसाठी देशाच्या नेतृत्वाने अजस्त्र उद्योगधंदे उभारण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत, पण त्याने लघु, कुटीरोद्योगाकडेही त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे, याचा वस्तुपाठच नरेंद्र मोदींनी यातून घालून दिल्याचे दिसते. त्यातूनच आज खादी लोकप्रियही होत आहे.
 
मोदी सरकारने खादी व ग्रामोद्योगाच्या प्रगतीसाठी खादी ‘ई-पोर्टल’ची सुरुवात केली. ‘डिजिटल इंडिया’च्या काळात खादीदेखील ऑनलाईन झाली अन् देशासह जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली. तसेच खादी मास्क, खादी पादत्राणे, खादी नैसर्गिक रंग आणि खादी ‘हॅण्ड सॅनिटायझर’ आदींची मोदी सरकारने सुरुवात, नव्या ‘प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम’-‘पीएमईजीपी’-केंद्रांची विक्रमी संख्येने स्थापना, नवे स्फूर्ती ‘क्लस्टर’, स्वदेशासाठी सरकारने घेतलेला पुढाकार आणि खादी आयोगाचा निमलष्करी बलांना साहित्य पुरवठा करण्याचा ऐतिहासिक करार झाल्याने ‘केव्हीआयसी’च्या व्यापारात प्रचंड वाढ झाली. याच्याशीच संबंधित आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली खादी उत्पादनांत वैविध्य आणले गेले.
 
खादीला केवळ वस्त्रप्रावरणांपुरतेच मर्यादित ठेवले नाही. ग्रामोद्योग उत्पादनांची निर्मिती केली. परिणामी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेल्या सौंदर्य प्रसाधने, साबण आणि शॅम्पू, आयुर्वेदिक औषधी, मध, तेल, चहा, लोणची, पापड, मिष्टान्न, खाद्यपदार्थ आणि चामड्याच्या वस्तूंनीदेखील मोठ्या संख्येने देश-परदेशातील ग्राहकांना आकर्षित केले. परिणामी, गेल्या पाच वर्षांत ग्रामोद्योग वस्तूंच्या उत्पादन आणि विक्रीत जवळपास दुप्पट वाढ झाली. खादी व ग्रामोद्योग आयोग देशात आधीपासूनच अस्तित्वात होता, पण त्याला योग्य, फायदेशीर दिशा देण्याचे, त्यात सहभागी घटकांची उन्नती साधण्याचे काम कोणत्याही सरकारने केले नाही, ते मोदी सरकारने वरीलप्रमाणे नियोजनबद्धरित्या केल्याचे दिसून येते.