दुर्दैवी...पाचव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजूराचा जागीच मृत्यू

    दिनांक : 30-Aug-2022
Total Views |
जळगावात गणेश कॉलनीतील घटना
 
जळगाव : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने मजूर तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

apghat
 
 
 
सविस्तर माहिती अशी की, शेख उस्मान शेख इस्माईल (वय ४०, रा. पिंपळा हुडको) हा तरुण मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गणेश कॉलनीतील चंद्रप्रभा सोसायटी येथे बांधकामाचे ठिकाणी कामाला आला होता. पाचव्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल जाऊन थेट खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी १० वाजता घडली.
 
दरम्यान, उस्मान खाली पडल्यानंतर तेथील कामगारांनी त्याला तातडीने उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळतात नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती. या संदर्भात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
 
शहरातील अनेक बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमिवर, बांधकामाच्या ठेकेदारांनी योग्य ती सुरक्षा घ्यावी. अन्यथा सुरक्षा घेत नसल्यास संबंधीत यंत्रणांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.