नोंदणीकृत शेतकर्‍यांनी ३१ ऑगस्टपूर्वी इकेवायसी पूर्ण करा- जिल्हाधिकारी

    दिनांक : 29-Aug-2022
Total Views |
जळगाव - केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रूपयेप्रमाणे लाभ दिला जात आहे. या योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी अनिवार्य असून ३१ ऑगस्टपूर्वी नोंदणीकृत शेतकर्‍यांनी इकेवायसी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
 

pm-kisan-samman-nidhi-scheme
 
 
जिल्ह्यात आठ-अ नुसार ६ लाख ४४ हजारांहून अधिक शेतकरी खातेदार असून या योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ५ लाखांहून अधिक शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. यातील बहुतांश शेतकर्‍यांना त्यांच्या नोंदणीनुसार पाच ते सात किंवा ११ हप्त्यांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दोन हजार रुपये प्रति हप्त्याप्रमाणे वर्षाला तीन समान हप्त्यात सहा हजार रूपये दरवर्षी शेतकरी सन्माननिधी देण्यात येतो.
 
 
पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी इकेवायसी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत केंद्र शासनाकडून ३१ मार्च, ३१ मे अशी मुदतवाढ देण्यात आली होती. ती पुन्हा ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नांेंदणीकृत शेतकर्‍यांनी त्यांच्या बँक खात्यांची इकेवायसी प्रमाणीकरण ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. इकेवायसी प्रमाणीकरण असल्याशिवाय या योजनेचा पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही. लाभार्थीच्या मोबाईलव्दारे फार्मर कॉर्नरवर जाउन ओटीपीव्दारे इकेवायसी प्रमाणीकरण करता येईल. किंवा ग्राहक सेवा केंद्रावर जाउन बायोमेट्रीक पद्धतीने १५ रूपये शुल्क देउन इकेवायसी प्रमाणीकरण करता येईल, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे.