पशुपालकांना ५ लाखांचे बक्षीस जिंकण्याची मोठी संधी; या आहेत अटी

    दिनांक : 25-Aug-2022
Total Views |
गोपाल रत्न पुरस्कार : हा पुरस्कार राष्ट्रीय दूध दिनानिमित्त (२६ नोव्हेंबर २०२२) दिले जातील. पात्रता इत्यादींबाबत अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://awards.gov.in या वेबसाइटला भेट दिली जाऊ शकते.


Gopalak1 
 
देशाच्या ग्रामीण भागात पशुपालन हे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन असल्याचे सिद्ध होत आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी ग्रामस्थांना शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. या अंतर्गत, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने 2022 च्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत.
 
शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका पुरविण्याच्या उद्देशाने पशुपालन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक विकास घडवून आणण्यासाठी केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारतातील देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त आहेत आणि त्यांच्यात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची जनुकीय क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात 2014 सालच्या डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा “राष्ट्रीय गोकुळ अभियान(आरजीएम)” सुरु करण्यात आले.
 
या अभियानाअंतर्गत, दूध उत्पादक शेतकरी, या क्षेत्रात कार्यरत इतर व्यक्ती तसेच दूध-उत्पादकांना बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या सहकारी संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या वर्षी देखील खालील विभागांसाठी राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे:
 
देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे) 
 
सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ
 
सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था/ दूध निर्मिती कंपनी/दूध उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादक संघटना
 
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारामध्ये प्रत्येक श्रेणीसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मरणचिन्ह आणि खालील रोख रकमेचा समावेश आहे:
 
प्रथम क्रमांक – रु.5,00,000/- (पाच लाख रुपये)
द्वितीय क्रमांक- रु.3,00,000/-(तीन लाख रुपये) आणि
तृतीय क्रमांक- रु.2,00,000/- (दोन लाख रुपये)