जळगावात गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट, १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूससह दोघांना पकडले

    दिनांक : 23-Aug-2022
Total Views |
जळगाव : मध्यप्रदेशातील उमर्टी येथून मोठ्याप्रमाणात जळगावात शस्त्रे विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. सोमवारी चोपडा येथे पोलिसांनी धडक कारवाई केली असून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल १२ गावठी कट्टे, मॅगझीनसह आणि ५ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा अवैध धंद्यांचे केंद्र बनत चालले असून गुटखा, गांजानंतर आता गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट समोर येत आहे.

gavthi 
 
  
जळगाव जिल्ह्यात गावठी कट्टे तस्करीचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले असून दिवसेंदिवस गावठी पिस्तूल विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत. गेल्याच आठवड्यात दि.१८ रोजी ६ गावठी कट्टे आणि ३० जिवंत काडतूस पोलिसांनी पकडले होते. चोपडा परिसरातच गावठी पिस्तूल विक्री करणारे रॅकेट सुरु असून मध्यप्रदेशातून आणि सातपुड्याच्या कान्याकोपऱ्यातून विक्रेते चोपड्यात येत असतात. वर्षभरात अनेकदा पोलिसांनी गावठी कट्टे विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 
सोमवार २२ रोजी सांयकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास चोपडा बस स्थानक परिसरात संशयित अमीतकुमार धनपत धानिया (वय ३० रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी,हरीयाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय 32 रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी, हरीयाणा) हे गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने मोठ्या शिताफीने दोघांच्या मुसक्या आवळल्या. दोघांकडून २ लाख ६० हजार किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच ५ हजार रुपये किमंतीचे ५ पिवळया धातूचे जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. दोघे संशयीत सर्व मुद्देमाल कुणाला तरी विक्री करणार होते.
 
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींवर पोहेका किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं संशयित आरोपींजवळून १२ गावठी बनावटीचे कट्टे, ५ जिंवत काडतूस व ३ मोबाईल फोन असा एकुण २ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, सहा.पोलीस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे, पोलीस नाईक संतोष पारधी, संदिप भोई, किरण गाडीलोहार, पोकाँ. प्रमोद पवार, प्रकाश मथूरे आदिंच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.