चितोडा गावातील तरुणाची निर्घृण हत्या

    दिनांक : 22-Aug-2022
Total Views |
मृतदेह लपविण्यासाठी नेला फरफटत

जळगाव : यावल तालुक्यातील चितोडा गावात एका ३६ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकुन खुन केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या तरुणाचा मृतदेह गाडीला बांधुन फरफटत नेल्याचे पुरावे मिळाले आहेत.
 

Yawal 
 
मनोज संतोष भंगाळे (वय 38 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज याला रविवारी मध्यरात्री घरापासून काही अंतर लांब घेऊन जात त्याचा गळा चिरला आहे. यानंतर पोटात, पाठीवर चाकुने वार करुन ठार मारले आहे. दरम्यान, मृतदेह लपवण्यासाठी एका गाडीला बांधुन रस्त्यावरुन फरफटत नेल्याचे आढळून आले आहे.
 
चितोडा गावातील रहिवासी असलेल्या मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंदूशेठ चौधरी यांच्या शेतात असल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली. यावल पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर यावलचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गणेश ढाकणे, रोहिल गणेश, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी व पोलिसांचा ताफा दाखल झाला.
 
पंचनामा करण्यात येऊन मृतदेह यावलच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, मनोजचा खुन कोणी व का केला? याचा तपास अद्याप झाला नाही. पोलिस पुरावे गोळा करुन मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी जळगाव शहरात किरकोळ कारणावरुन अक्षय चव्हाण या २३ वर्षीय तरुणाचाही चाकूने भोसकून खून करण्यात आला. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तो पर्यंत यावल तालुक्यातील चितोडा येथे मनोज भंगाळे या तरुणाचा खुन झाला आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा हादरला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी यावल पोलिसांना सूचना करुन मनोजच्या मारेकऱ्यांचा लवकर शोध घ्यावा असे सांगीतले आहे.