मोठी बातमी : घरमालकाकडे ५० लाखांची चोरी करून पलायन करणारा नोकर गजाआड !

22 Aug 2022 17:57:19
 
गावाकडे पलायन करताना अंत्योदय एक्सप्रेसमधून केली अटक
 
भुसावळ : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील खार येथील बांधकाम व्यावसायिक मुकेश गांधी यांच्याकडे राहुल रोशन कामत (वय २५, मर्णेया, उमरकट, जि. मधुबनी, बिहार) हा कामाला होता. दरम्यान, राहुलने १९ ऑगस्टला दुपारी घरात कुणीही नसतांना सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व विदेशी चलन असे मिळून सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल लांबवला. येथून पलायन करून त्याने सूरत गाठले. तेथून तो अंत्योदय एक्सप्रेसने बिहारमधील आपल्या गावाकडे निघाला होता.
 
 

chor 
 
 
 
दरम्यान, नोकराने घरात हात साफ केल्यानंतर गांधी यांनी खारघर पोलिसांत तक्रार दिली होती. स्थानिक पोलिसांनी याची माहिती लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा यंत्रणेला दिल्यामुळे ते या नोकराच्या मागावर होते. यातून तो अंत्योदय एक्सप्रेसने गावी जात असल्याचे तपासात दिसून आले.
 
दरम्यान, भुसावळ येथील लोहमार्ग व आरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने २२५६४ अंत्योदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर आल्यावर कसून चौकशी करतांना जनरल डब्यातून प्रवास करणार्‍या राहूल कामत याला ताब्यात घेण्यात आले. झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून ४३ लाखांचे सोने, ३ लाख ८४ हजारांची रोकड, महागड्या घड्याळ, मोबाइल फोन, फाइल्स असा सुमारे ५० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत आरपीएफ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
 
ही कारवाई भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक ए.के.तिवारी, सहायक फौजदार प्रेम चौधरी, प्रकाश थोरात व लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, अजित तडवी, दिवाणसिंग राजपूत, धनराज लुल्ले यांच्या पथकाने केली.
Powered By Sangraha 9.0