पंजाबच्या बरनालामध्ये भर रस्त्यात थरार... स्कूल बसवर तलवारींनी हल्ला !

    दिनांक : 17-Aug-2022
Total Views |
 
जखमी ड्रायव्हरनं प्रसंगावधान राखत वाचविला विद्यार्थ्यांचा जीव
 
बरनाला : पंजाबच्या बरनालामध्ये स्कूल बसवर धारधार शस्त्रधारी बाइकस्वारांनी हल्ला चढवला. यात बस ड्रायव्हर जखमी झाला. काही दिवसांपूर्वी एका किरकोळ गोष्टीवरुन ड्रायव्हर लखविंदर सिंग याचं काही जणांसोबत भांडण झालं होतं. त्याच लोकांनी आज बसवर हल्ला केल्याचे लखविंदरसिंग यांच्या कडून समजले आहे.
 
 
 


school bus 
 
 
 
सविस्तर वृत्त असे कि, बरनालाच्या एअर फोर्सच्या केंद्रीय विद्या मंदिरच्या शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसवर काही हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला. बसमध्ये जवळपास ३० ते ३५ विद्यार्थी होते. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्याचं काम बस ड्रायव्हर करत होता. इतक्यात अचानक चार मोटरसायकलस्वारांनी बसवर हल्ला केला. बसवर चक्क तलवारी आणि लोखंडी हत्यारांनी हल्ला केला. यात बसच्या काचा फुटल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. ड्रायव्हर लखविंदर सिंग तलवारीच्या हल्ल्यात जखमी झाला. तरी. जखमी झालेल्या ड्रायव्हरनं प्रसंगावधान दाखवत हल्लेखोऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी बस थेट नजिकच्या डीएसपी ठाण्यात नेली. यामुळे बसमधील विद्यार्थ्यांचा जीव वाचला आणि त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. एका हल्लेखोराची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
 
बसवरील हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या काहींनी सांगितलं की बसवर ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा खूप दहशतीचं वातावरण होतं. शहरात दिवसाढवळ्या अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे संपूर्ण शहरात दहशतीचं वातावरण आहे. पोलीस प्रशासन आणि सरकारनं अशा पद्धतीचे हल्ले रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत, असं आवाहन नागरिकांनी केलं आहे. एका स्कूल बसवर अशापद्धतीचा जीवघेणा हल्ला होणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे.