सुंभ जळाला तरी...

    दिनांक : 17-Aug-2022
Total Views |
राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही, हे दिसून येते. अर्थात, त्या पीळ असलेल्या जळक्या सुंभाचा तसा काही उपयोग नाहीच अन् ‘वंदे मातरम्’चा विरोध करून मुस्लिमांना जवळ केल्याने त्या पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असेही होणे नाही.
 
 
 

sumbh 
 
 
 
 
स्वातंत्र्य दिनापुरते एका दिवसाचे देशप्रेम दाखवून ‘रझा अकादमी’, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुन्हा एकदा आपल्या देशघातकी धंद्याला लागल्याचे ‘वंदे मातरम्’च्या विरोधावरून दिसून येते. राज्याचे नवनिर्वाचित सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय स्तुत्य निर्णय घेत, सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी दूरध्वनीवरून संवाद साधताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे, असा आदेश दिला.
 
भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या ‘वंदे मातरम्’ या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते, तर ‘हॅलो’ शब्द १८व्या शतकात आला. आश्चर्य व्यक्त करणे असा त्याचा अर्थ होतो. इंग्रजांची ही आठवण पुसून काढली पाहिजे, अशी यामागची भावना आहे. पण, ब्रिटिशांच्याविरोधात लढून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा फक्त स्वातंत्र्यदिनी अभिमान बाळगणार्‍यांनी लगोलग ‘वंदे मातरम्’ला विरोध केला. विरोध करताना त्यांना ना ‘वंदे मातरम्’ म्हणत फासावर जाणार्‍या शेकडो क्रांतिकारकांची आठवण झाली ना ब्रिटिशांच्या जुलूमशाहीची. ते सारे विसरुन विरोधकांनी ‘वंदे मातरम्’लाच विरोध सुरू केला, त्यावरून त्यांच्यात आणि ब्रिटिशांत फरक तो काय, हाही प्रश्न उपस्थित होतो.
 
नुकताच आमीर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाला. हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाची हिंदी आवृत्ती असलेल्या ‘लालसिंग चड्ढा’चा प्रदर्शनाआधी आणि प्रदर्शनानंतर बहिष्कार सुरू झाला. त्याला कारण अधिकृतरित्या ढापलेला मूळचा मजकूर आणि आमीर खानसह लेखक अतुल कुलकर्णीची देशघातकी भूमिका, मते आहेत. त्यामुळे ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचा इतका विरोध केला गेला की, आमीर खानला ‘बहिष्कार करू नका, माझा चित्रपट पाहा,’ असे म्हणत माफीची भाषाही वापरावी लागली. आता तसाच बहिष्काराचा प्रकार ‘रझा अकादमी’, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबतही होऊ शकतो. कारण, एकच देशघातकीपणा.
 
‘रझा अकादमी’ तर बोलून चालून धर्मांध मुस्लिमांचीच संघटना. त्यांचे म्हणणे काय तर, आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. ‘वंदे मातरम्’ला दुसरा पर्याय द्यावा. पण, ‘रझा अकादमी’चे म्हणणे त्यांचेच धर्मबांधव खोटे पाडत असतात. ठिकठिकाणी उभारलेले पीर, दर्गे वगैरे अल्लाचे नसतात, तर कोण्या तरी फकिराचे, अवलिया, गाझी वगैरेंचे असतात. त्याची पूजा करू नका, असे आवाहन ‘रझा अकादमी’ने मुस्लिमांना केल्याचे दिसत नाही.
 
पण, ‘वंदे मातरम्’च्या विरोधासाठी ‘रझा अकादमी’ तत्काळ पुढाकार घेते. यासंदर्भातलाच आणखी एक मुद्दा म्हणजे, ‘रझा अकादमी’ ज्या ज्या गोष्टींचा विरोध करत नाही, त्या त्या गोष्टी इस्लाममध्ये मान्य आहेत, असा घ्यावा लागेल. अल्ला आणि मोहम्मद पैगंबराचे नाव घेऊन भारतच नव्हे, तर जगभरात इस्लामी कट्टरपंथीयांकडून निष्पापांचे गळे कापले जातात, मुली-महिलांवर बलात्कार केले जातात, दंगली भडकावल्या जातात, दहशतवादी-जिहादी हल्ले केले जातात.
 
पण, ‘रझा अकादमी’ने कधी त्याचा जोरदार विरोध केल्याचे दिसले नाही. त्याचा अर्थ काय घ्यायचा, ‘रझा अकादमी’ला व तिच्या इस्लामला ते मान्य आहे, असाच ना? ‘रझा अकादमी’ने ‘वंदे मातरम्’चा विरोध करण्यामागे धार्मिक कारण आहे आणि विरोधासाठी ते कारण राष्ट्रवादी काँग्रेस व त्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांना पुरेसे आहे. कारण, मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळल्या नाही, तर तो नावापुरता ‘राष्ट्रवादी’ काँग्रेस पक्ष कसा असेल? राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी, ‘वंदे मातरम्’ न म्हटल्यास तुरुंगात टाकणार का, असा सवाल विचारला.
 
मुळात, ज्या इसमावर राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणार्‍या एका तरुणाला जीवघेणी मारहाण करण्याचा आरोप आहे, त्या इसमाने राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचे नाव घेणेच हास्यास्पद. त्यावर तुरुंगात टाकण्याचा मुद्दा उपस्थित करणे विचित्रपणाच. कारण, संवाद साधताना ‘वंदे मातरम्’ म्हणणे, हे अभियान आहे. तसे कोणी न म्हटल्यास त्या व्यक्तीला कायदा करून तुरुंगामध्ये टाकू, असे सुधीर मुनगंटीवार म्हणालेले नाहीत वा तसा काही आदेशही नाही.
 
पण, मुस्लीम मतांसाठी जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकतात. पावसात भिजूनही शरद पवारांना २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ५४ पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नव्हते. त्याचे कारण, त्यांचे साडेतीन जिल्ह्यापुरते असलेले नेतृत्व आणि मुस्लीम लांगूलचालन हे आहे. त्यानंतर बेईमानी करून आलेल्या सत्तेतही राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिमानुनयाचा उद्योग सोडला नाही.
 
जितेंद्र आव्हाडांचा तर मतदारसंघच मुस्लीमबहुल. पण, या सार्‍या प्रकारामुळे राज्यभरातील बहुसंख्य समाज राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेला, याचे त्या पक्षाच्या नेत्यांना भान नाही. ते आपल्याच तुष्टीकरणाच्या मस्तीत अजूनही आहेत. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही, हे दिसून येते. अर्थात, त्या पीळ असलेल्या जळक्या सुंभाचा तसा काही उपयोग नाहीच अन् ‘वंदे मातरम्’चा विरोध करून मुस्लिमांना जवळ केल्याने त्या पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असेही होणे नाही.
 
‘वंदे मातरम्’च्या निर्णयाला निराळ्या पद्धतीने विरोध केला तो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी. ‘वंदे मातरम्’ आमचा स्वाभिमान, तर बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. बळीराजाचा सन्मान करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘जय बळीराजा’ म्हणावे, असे आवाहन त्यांनी केले. मुळात काँग्रेसला ‘वंदे मातरम्’चा स्वाभिमान असता तर त्यालाच ‘राष्ट्रगीत’ म्हणून मान्यता मिळाली असती. पण, तसे झाले नाही. दुसरा मुद्दा म्हणजे, बळीराजाच्या सन्मानाचा. काँग्रेसने देशात अनेक दशकानुदशके सत्ता गाजवली. पण, या काळात काँग्रेसने बळीराजा सन्मानाने जीवन जगू शकेल, असे काही निर्णय घेतले नाही वा बळीराजासाठी उपक्रम, योजना, प्रकल्पही आणले नाहीत.
 
उलट बळीराजा आपल्याच दावणीला बांधलेला राहील, म्हणून त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीत अडकवले, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुत गिरण्याच्या माध्यमातून बळीराजाला ओरबाडले आणि मोदी सरकारने बळीराजाच्या उन्नतीसाठी कृषी कायदे आणले, तर त्यालाही विरोध केला. त्या काँग्रेसने बळीराजाच्या सन्मानाचा शब्द उच्चारणे म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच. सोबतच, नाना पटोलेंना बळीराजाच्या सन्मानाचा मुद्दा आताच का आठवला?
 
गेली अडीच वर्षे त्यांच्या सहभागाचेच तर सरकार राज्यात सत्तेवर होते. तेव्हा, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी वा इतरही संकटात त्या सरकारने कधी बळीराजाची भरीव मदत केली नाही. त्यातूनच, त्यांना फक्त ‘वंदे मातरम्’च्या विरोधासाठी बळीराजाचा वापर करायचा आहे, हे स्पष्ट होते. पण, त्याचा नाना पटोले वा काँग्रेसला काहीही फायदा होणार नाही. बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेनेही काँग्रेसचा देशघातकी चेहरा ओळखलेला आहे. ‘वंदे मातरम्’ला विरोध करण्यातून तो चेहरा आणखी बदनाम होतोय आणि काँग्रेसला त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही.