भारताचा नवा विक्रम; जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची निर्मिती

    दिनांक : 16-Aug-2022
Total Views |
अभियांत्रिकीच्या इतिहासातील दुर्मिळ कामगिरी
 
श्रीनगर : स्वातंत्र्यानंतर प्रथमच श्रीनगर उर्वरित भारताशी जोडला जाणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ‘चिनाब पूल’ उभारण्यात आला आहे. या पुलाचं काम अंतिम टप्प्यात आहे. चिनाब पुलाच्या ‘गोल्डन जॉईंट’चं उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी करण्यात आलं. लवकरच या पुलाचं काम पूर्ण होणार आहे. जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज ठरणार आहे. यामुळे भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे. ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे. या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे.
 


Golden joint2 
 
जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला या ब्रिजचे काम सुरु आहे. चिनाब नदीपात्रापासून ३५९ मीटर उंची वरील ब्रिजचे ओव्हरआर्च डेक लॉन्चिंग गोल्डन जॉइंटसह पूर्ण होईल. गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच अशा या रेल्वे ब्रिजच्या स्टील आर्चचे काम पूर्ण झाले. हा ब्रिज जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीर मधील दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडले जातील. १३१५ मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे ३०३५० मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात १०६२० MT स्टीलचा वापर झाला आहे आणि १४५०४ MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे. हा ब्रिज पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असेल.
 

Golden joint1 
 
आयफेल टॉवरपेक्षाही उंच चिनाब पूल
 
चिनाब नदीवर बांधला जात असणारा हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. नदी सपाटीपासून ३५९ मीटर उंचीवर असल्याने चिनाब पुलाला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचा दर्जा मिळाला आहे. हा पूल फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, पुलाच्या संरचनात्मक तपशीलांसाठी ‘टेकला’ सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल स्टील -१० डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकते, असे सांगण्यात येत आहे.
 
कोकण रेल्वेच्या मदतीनं पुलाची उभारणी
 
उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांची चिनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेची मदत झाली. तसेच मेथड स्टेटमेंट आणि रेखाचित्रांसाठी मान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांनी स्थानिक रोजगार निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे या भागातील दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.