बहिणीला भेटायला जाणाऱ्या भावावर काळाचा घाला

    दिनांक : 16-Aug-2022
Total Views |
पातोंडा ता.अमळनेर : येथून जवळ असलेल्या विसपुते इन्डेन गॅस एजन्सी जवळ १५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बस व मोटर सायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात बहिणीला रक्षाबंधना करीता भेटायाला जाणारा टोळी ता. पारोळा येथील तरूण मनोज युवराज पाटील ( 26 वर्ष) याचा जागीच मृत्यू झाला.
 
Accident 1
 
टोळी ता. पारोळा येथील तरूण मनोज पाटील हा सावखेडा येथे आपल्या बहिणीला भेटायला येत असतांना विसपुते इन्डेन गॅस एजन्सी जवळ इगतपुरी बस डेपोची चोपडा नाशिक (बस क्र एम एच 40 - वाय 5977) ने अमळनेरकडे जातांना समोरून येणारी मोटर सायकल क्र. एम एच 19 - डीजी 9045 ला जोरदार धडक दिल्याने तरूण मनोज पाटील हा जागीच गतप्राण झाला.
 
सदर घटनेची माहिती मिळताच पो.हे.काॅ. कपिल पाटील व सुनिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यानंतर मयत प्रितेशचे शव शवविच्छेदना करीता अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. चोपडा नाशिक बसचे चालक गोकुळ दौलत चौधरी रा. मालेगाव अमळनेर पोलीस स्टेशनला जमा झाला असून पुढिल तपास पो.हे.काॅ. कपिल पाटील व सुनिल पाटील हे करीत आहेत.
 
मनोज पाटील हा मुळचा टोळी ता.पारोळा येथील रहिवासी असून आई वडीलांचा एकूलता एक मुलगा होता. रक्षाबंधना निमित्त बहिणीला भेटायला जात असतांना मला नवीन कपडे घेऊन दे असा फोनवरून आग्रह धरला होता. दरम्यान बहिणीचे गाव अवघ्या तिन किलोमीटरवर असतांनाच काळाने डाव साधला. मनोजचे आई-वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मनोज हा आपल्या कुटूंबाचा कमावता आधार होता. मनोजच्या निधनाची बातमी कळताच टोळी गावावर शोककळा पसरली. पातोंडा गावाजवळ अपघात झाल्याचे कळताच गावातील तरूण समाधान पाटील, रत्नाकर पवार, सोपान लोहार, महेंद्र पाटील, केतन ढिवरे, मंगेश पवार व तरूणांनी धाव घेत सहकार्य केले. समाधान पाटील याने अमळनेर पोलीस स्टेशनला व टोळी येथे संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.
 
मोटर सायकलने घेतला पेट
 
अपघात इतका भीषण होता की, मोटर सायकल व बसची धडक झाल्यानंतर मोटर सायकल बसच्या पुढिल बंफरमधे अडकून बरेच अंतर ओढली गेली व घर्षणाने स्पार्कींग होऊन मोटर सायकलने पेट घेतला. मोटरसायकलचा दुर बसमधे आल्याने बसने पेट घेतल्याच्या संशयाने बसमधील प्रवाशांमधे एकच गोंधळ उडाला.
 
दोन्ही अपघातातील बस या इगतपुरी डेपोच्या
 
बस चालकांच्या अतिवेगाने बस चालविल्याने गेल्या दिड महिन्यात दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागल्याने, बस चालकांबद्दल नागरीकांनी संताप व्यक्त केला. अमळनेर चोपडा रस्त्यावर दि.३ जुलै रोजी गोगुळवाड ता.मालेगाव येथील तरूण प्रितेश निकम व आज टोळी ता.पारोळा येथील तरूण मनोज पाटील यांना नाहक आपला जीव गमवावा लागला. दोघेही एकूलते एक असून, दोन्ही बहिणींना भेटायला जात असतांनाच अपघात झाला. योगायोग म्हणजे दोन्ही अपघातातील बस या इगतपुरी डेपोच्या होत्या.