सिनेमा का पडतो? नट का रडतो?

    दिनांक : 16-Aug-2022
Total Views |
लोक पहात असतात आणि मनातल्या मनात नोंदी ठेवत असतात. लालसिंग चड्ढाचेही तेच झाले आहे. घोडा का अडतो? भाकरी का करपते आणि पाने का सडतात? या तिन्ही प्रश्नांचे एकच उत्तर परंपरेने आलेल्या ज्ञानात सांगितले आहे. उत्तर अत्यंत सोपे आहे. न फिरविल्यामुळे. याचा आज संदर्भ काय तर उत्तर सोपे आहे. आमीर खानचा ‘लालसिंग चड्ढा` मग वर उल्लेखलेल्या प्रश्नांचा आणि त्याचा काय संबंध? तर त्याचे उत्तरही सारखेच आहे. बदललेला देश न समजल्यामुळे! स्वत:ला ‘मि. परफेक्शनिस्ट` म्हणून ओळखले जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि सामाजिक कामातही थोडाफार सहभाग असणाऱ्या आमीर खानचा ‘लाल सिंग चड्ढा` हा सिनेमा सपाटून आपटला.
 
 
 

vad1 
 
 
 
बॉलीवूडचे परस्परांची पाठ खाजविणारे नट तो चित्रपट किती चांगला आहे, हे सोशल मीडियावर सांगत असले, तरी ज्या ॲपच्या साहाय्याने हल्ली चित्रपटाची तिकिटे काढली जातात. त्यावर गेले की, खरी परिस्थिती लक्षात येते. सुट्टीचे दिवस असूनही ‘लाल सिंग चड्ढाच्या पडद्यासमोरील खुर्च्या रिकाम्या असल्याचे ॲपवर पाहायला मिळते. सुरुवातीला काही शोमध्ये तुरळक गर्दी होती. आता मात्र खुर्च्या ‘सपशेल` रिकाम्या आहे. एकही प्रेक्षक नाही, असा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा. काही काळानंतर प्रेक्षक नाही म्हणून हा चित्रपट बंद होण्याचीच शक्यता जास्त आहे.
 
लोक इतके का चिडले, हे शंकराच्या तिसऱ्या नेत्रप्रमाणे आहे. हिंदूंची सहनशक्ती तर सर्वात जास्त. त्यामुळे हिंदू समाज प्रतिक्रिया तत्काळ कधीच देत नाही. मात्र, प्रतिक्रिया द्यायची ठरली की कशी द्यायची, हे आता हिंदू समाजाने दाखवून दिले आहे. हिंदूंच्या व भारतीयांच्या भावनांशी खेळता येणार नाही, हाच या घटनेचा संदेश आहे. वस्तुत: आमीर खानचा हा काही पहिला चित्रपट नाही, जो अपयशी ठरला आहे. यापूर्वी त्याचे अनेक चित्रपट पडले आहेत. मात्र, यावेळी कथानकच निराळे आहे. आमीरच्या स्वैर वागण्याला कंटाळून भारतीयांनी त्याला धडा शिकविला आहे.
 
नटाची म्हणून एक मानसिक प्रक्रिया असते. सृजनाच्या सोबत हातोहात जाणारे मूल्य म्हणजे भारतीय घटना, ही तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वस्तुपाठ म्हणावा अशीच आहे. अनेक वेळा अनेक लोक त्याचा गैरवापरच करतात. आमीरनेही तो दिलखुलास केला. नुसता नट म्हणून मिळणारी ओळख पुरेशी नसते म्हणून मग नटनट्या जो काही आव आणण्याचा प्रयत्न करतात, तसाच आमीरनेही केला. ‘पीके` या त्याच्या गाजलेल्या चित्रपटात त्याने हिंदू देवी-देवतांची चेष्टा केली.
 
परमेश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावेळी थोडेफार निषेधाचे सूरही उमटले. मात्र, आता आता लोकांनी कडकडीत कृतीच दाखविली आहे. खरे म्हणजे हिंदूंना सुधारणांचे वावडे नाही. हिंदू धर्मातल्या कुप्रथा समाजसुधारकांनीच कडाडून टीका करून, आपले जीवन पणाला लावून दूर केल्या. त्यासाठी वाटेल, ती किंमत मोजण्याची तयारीही त्यांनी दाखविली. राजा राममोहन राय ते धोंडो केशव कर्वे अशी कितीतरी नावे घेता येतील. मात्र, यातील कुणीही तत्त्वज्ञ होऊन इतरांना बोधामृत पाजण्याचे उद्योग केले नाहीत. कोणाला काय वाटेल, याची पर्वा न करता ही मंडळी काम करीत राहिली आणि त्यांनी परिवर्तनाचे प्रवाह निर्माण केले. श्रद्धेची टवाळी मात्र मनोरंजनाच्या पुढे जाऊ शकत नाही, हे आमीर खानच्या लक्षात आले नाही.
 
लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे स्वत: आमीर खान एक सश्रद्ध मुसलमान आहे, तसे असायलाही हरकत नाही. त्याचे हज वगैरेला गेल्याचे फोटोही सोशल मीडियावर ‘व्हायरल` होत असतात. मात्र, इस्लाममधल्या ‘तिहेरी तलाक`, ‘खतना`, मुलींचे शिक्षण यासारख्या विषयांवर त्याचे कोणतेही मत नाही. त्याने ते तसे कुठे व्यक्त केल्याचे ऐकिवातही आलेले नाही. दांभिकता ही इथे सिद्ध होते. नट फसतो, जेव्हा तो सतत अभिनय करायला लागतो. गरज जिथे अभिनय करायला हवा तिथे करावा आणि अन्य ठिकाणी सर्वसामान्य माणसासारखे वागावे.
 
मात्र, चाहते वगैरे लोक या नटांना तत्त्वज्ञ मानायला लागतात. बुद्धिमान नट मग तत्त्वज्ञांची हुबेहूब नक्कल करायला लागतात आणि चाहते, नटांची तळी वाहणारी माध्यमेदेखील या नटांना तत्त्वज्ञ म्हणून पेश करायला लागतात. या बेगडी तत्त्वज्ञांचे बेगड मग तत्त्वांच्या ऐरणीवर आले की तुटून पडते. तुम्ही सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही, या उक्तीनुसार आमीर खान आणि त्याची री ओढणाऱ्यांचे पितळ आता उघड पडले आहे.
 
‘पीके` हा काही आमीरचा एकमेव खोडसाळपणा नव्हे. ‘लाल सिंग चड्ढा ` चित्रपटाच्या शूटिंगसाठी आमीर खान तुर्कीला गेला होता. तिथे तो तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला जाऊन भेटला. तुर्कीचे अर्देगान आणि त्यांची काश्मीरविषयीची मते, त्यांच्या पाकधार्जिण्या भूमिका जगजाहीर आहेत. तुर्की हे चित्रपटासाठी योग्य ‘लोकेशन` कसे, हे कदाचित आमीर खानच सांगू शकेल. मात्र, आपण नट आहोत, आपल्याला भौगोलिक सीमा नाहीत, आपण काय वाटेल ते करू शकतो, असे त्याला वाटते. त्या अतिशहाणपणातून या गोष्टी घडतात. नटांना राजकीय मते असू नयेत, असे मुळीच नाही.
 
मग त्यांनी ती पूर्णपणे अंगीकारावी. तटस्थतेचे नाटक करू नये. पुण्यातही अशाच एका नटाने राजकीय नेतृत्वावर टीका केली होती. ते प्रकरण थोडक्यात आटोपले. मात्र, या नटाचा भाऊ त्या दरम्यान त्याचे पुढचे व्यावसायिक उद्योग अडचणीत येऊ नये म्हणून राजकीय पक्षांच्या मंडळींचे पाय धरत फिरत होता. हिंदुत्वाची लहर आहे म्हणून अक्षयकुमारचा ‘पृथ्वीराज चौहान`ही बाजारात येतो आणि तोही आदळतो. कारण, तो अत्यंत कमी वकुबाने केलेला चित्रपट असतो. ‘शेवटचा हिंदूसम्राट` अशी पोस्टरबाजी जेव्हा या चित्रपटाच्या निमित्ताने केली जाते, शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ते झळकवले जाते तेव्हा ते जनभावनांच्या विरोधातच असते. फरक इतकाच की, आमीर खानचे १०० अपराध भरल्यानंतर लोकांनी त्याचा शिशुपाल केला. उरलेल्यांची गिनती सुरू आहे.