पंतप्रधान कार्यालयातील अनोखे रक्षाबंधन!

13 Aug 2022 10:48:03
वेध 
बहीण-भावाचा जिवाभावाचा सण Rakshabandhan रक्षाबंधन गुरुवारी देशभर उत्साहात साजरा झाला. बहिणींनी भावांना रक्षासूत्र बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी भावावर टाकली आणि भावाने ती स्वीकारलीदेखील!
 
 

rakshabandhan 
 
 
 
 
 
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळचे हे रक्षाबंधन अनोख्या प्रकारचे होते. आता पंतप्रधान कार्यालयात दरवर्षीच Rakshabandhan रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. यावर्षीदेखील तो साजरा करण्यात आला; त्यात अनोखे असे काय? असे कोणीही म्हणेल आणि यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला मोठा संदेश दडला आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हा माणूस अगदी लहान लहान गोष्टीत मोठे कार्य सिद्ध करीत असतो. पंतप्रधानपद स्वीकारताच त्यांनी देशात कोणतेही मोठे अभियान सुरू न करता किंवा मोठा कार्यक्रम न देता स्वच्छता अभियान हा अगदी किरकोळ उपक्रम हाती घेतला. त्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छता अभियानाशी जोडले. आपले घर, आपला परिसर, गल्ली, मोहल्ला, गाव, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि पर्यायाने देशात स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविले.
 
स्वत: हातात झाडू घेऊन देशवासीयांना स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून दिले. गांधीजींच्या तत्त्वानुसार स्वच्छता अभियान राबविले. काँग्रेसने गांधींचे नाव घेऊन सत्ता मिळविली, पण त्यांना गांधी कधी समजलेच नाहीत. मात्र, गांधी विचारांचे विरोधक म्हणून हिणविल्या जाणार्‍या नरेंद्र मोदींनी गांधीजींना अपेक्षित स्वच्छ भारत निर्माणाच्या दिशेने एक पाऊल टाकले. अशाच प्रकारे स्वदेशीचा मुद्दा त्यांनी 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून हाती घेतला. खादीला 'अच्छे दिन' प्राप्त करून दिले. खेलो इंडियाच्या माध्यमातून देशातील कानाकोपर्‍यातील खेळाडूंना संधी प्राप्त करून दिली. उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण, प्रशिक्षक, सर्व सोयी, नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या. विदेशात प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून दिली. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताची पदतालिका आज वाढली आहे. इंग्लंडमध्ये तिरंगा फडकला. त्याचप्रमाणे कालचा Rakshabandhan रक्षाबंधनचा पंतप्रधान कार्यालयातील कार्यक्रम किरकोळ वाटत असला, तरीही त्यामागचा उद्देश खूप मोठा आहे. पंतप्रधानांनी पीएमओ म्हणजे पंतप्रधान कार्यालयातील चालक, शिपाई, सफाई कामगार, माळी इत्यादी निम्नस्तरावर कार्यरत कर्मचार्‍यांच्या मुलींना विशेष आमंत्रित करून त्यांच्या हस्ते राखी बांधून घेतली. हे या कार्यक्रमाचे अनोखेपण आहे.
 
हे कोणाला कमी लेखण्यासाठी नव्हे, तर अंत्योदय हा भाजपाचा संदेश देशवासीयांपर्यंत पोहोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. आजपर्यंत त्यांच्यापूर्वी झालेल्या पंतप्रधानांनी (पुरुष) अशाप्रकारे आपल्या कार्यालयातील निम्न पदावरील कर्मचार्‍यांच्या मुलींच्या हस्ते Rakshabandhan रक्षाबंधन केल्याचे ऐकिवात नाही. मोदीजींनी मात्र, आपल्या कर्मचार्‍यांच्या मुलींच्या हाताने राखी बांधून समानतेचा संदेश दिला. त्या कर्मचार्‍यांच्या परिवारातील सदस्यांना हा क्षण सुखावून गेला असेल. कारण त्यांच्या मुलींना पंतप्रधानांशी यानिमित्ताने संवाद साधता आला. आपल्या समस्या मांडता आल्या असतील. त्यामुळे त्यांच्यासाठी हा क्षण नक्कीच सुखावह असाच होता. यापूर्वी राष्ट्रपतिपदी द्रौपदी मुर्मू यांना विराजमान करून आदिवासी महिलेला देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान केले आणि काल पंतप्रधान कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या मुलींच्या हस्ते Rakshabandhan रक्षाबंधन केले. त्यावरून समाजाच्या शेवटच्या घटक आणि विशेषत: महिलांच्या उत्कर्ष, उद्धारासाठी केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआचे सरकार काम करीत असल्याचा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय या संकल्पनेची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार करीत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
 
- विजय कुळकर्णी

- 8806006149
Powered By Sangraha 9.0