नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या (Silver Price) दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे आज म्हणजेच बुधवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 22 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 48,100 आहे. तर 24 कॅरेट सोने 52,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत 362 रुपयांनी वाढून 58,850 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये फरक काय जाणून घ्या.
- 24 कॅरेटच्या सोन्याला सर्वात शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही धातूची भेसळ नसते. त्याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हटले जाते.
- 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67 टक्के शुद्ध सोने आहे. इतर 8.33 टक्के इतर धातूंचा समावेश आहे.
- 21 कॅरेट सोने 87.5 टक्के शुद्ध असते.
- 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोने असते.
- आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5 टक्के शुद्ध सोने असते.