पवारांचा जातीयवाद

    दिनांक : 25-Jul-2022
Total Views |
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वादग्रस्त विधाने करू नये, असा संकेत सभ्य समाजात पाळला जातो. पवारांच्या मागे झांझा वाजवत पळणार्‍या तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत, पत्रकार-संपादकांच्या टोळक्याला आपले साहेब फार सुसंस्कृत असल्याचे वाटते. पण, त्यांनाही खोटे पाडण्याचे काम आता शरद पवारांनीच केले अन् बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यूनंतर ते त्यांच्याविषयीचा विखार ओकू लागले.
 
 
 
sharad
 
 
सत्ता गेली की, हयातभर काड्या लावण्याचेच काम करणारा राजकारणी पुन्हा अगदी नव्या जोमाने आपल्या जुन्याच धंद्याला लागतो, याचे जीवंत उदाहरण म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरेंनी केले होते. त्यावरून पवारालंबीयांनी काहूर माजवत शरद पवारांच्या जातीयवाद नष्ट करण्यासाठीच्या नसलेल्या कार्याचे दाखले देण्याचे उद्योग करुन दाखवले. पण, शरद पवारांनी राज ठाकरेंचे शब्द खरे करून दाखवण्यासाठी आणि पवारालंबीयांना खोटे पाडण्यासाठी आपण अस्सल जातीयवादी असल्याचे दाखवण्याचा चंगच बांधल्याचे दिसते. म्हणूनच शनिवारी पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. “धादांत खोटा इतिहास सांगणार्‍या बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसर्‍या कोणीही केला नाही,” असे ते म्हणाले. त्यामागे त्यांचा महाराष्ट्रात जातीय अस्मिता टोकदार करुन आपला राजकीय स्वार्थ साधण्याचाच हेतू असल्याचे उघड उघड दिसते. कारण, गेली अडीच वर्षे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पुढे करुन महाराष्ट्राची सत्ता उपभोगली. पण, आता फडणवीस-शिंदे सरकारमुळे सत्तेच्या आयत्या मिळालेल्या ताटावरुन भूक न भागताच उठावे लागल्याचे दुःख शरद पवारांना सतावते आहे. त्यातच राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत शरद पवारांनी पुढाकार घेऊन यशवंत सिन्हांना बोहल्यावर बसवले, पण त्यातही ते ‘सपशेल’ तोंडावर आपटल्याने त्याचे शल्यही शरद पवारांच्या सोबतीला आहेच. आपल्या तथाकथित मुरब्बीपणाचे दिवसाढवळ्या धिंडवडे निघाल्याचे पाहताना शांत बसतील, ते शरद पवार कसले? म्हणूनच आता नव्या सरकारला कुठून तरी अपशकुन करण्यासाठी शरद पवार कामाला लागल्याचे दिसते. त्यासाठी त्यांनी आपले नेहमीचेच हत्यार बाहेर काढले, ते म्हणजेच एका समाजाला दुसर्‍या समाजापुढे उभे करण्याचे. त्यासाठीच तर ते बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेवांच्या नावाने बोंब ठोकू लागले. पण, शरद पवार सत्तेत असताना गेल्या अडीच वर्षांत असे काही बोलल्याचे दिसले नाही. त्याआधी सत्तेत नसताना त्यांनी जातीयवादी विधाने केली होती व आताही ते तसेच करत आहेत. कारण, त्याचा संबंध राजकारणाशी आहे.
 
राजकारणात देदीप्यमान कार्य करता आले नाही की, क्षुद्र मनोवृत्तीच्या व्यक्ती जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम करतात. तसे केल्याने काही व्यक्तींचा जमाव आपल्यामागे उभा राहील, तर काही व्यक्तींचा जमाव आपल्या विरुद्ध उभा राहील, याची जाणीव या राजकारणी व्यक्तींना असते. अशाप्रसंगी त्या दोन्ही जमावाला एकमेकांशी भिडवून, त्यांच्या झगड्यातून आपल्या राजकारणाची पोळी कशी भाजता येईल, याचा विचार संबंधित राजकारणी करत असतो. शरद पवार याचप्रकारच्या राजकारण्यांचे प्रतिनिधित्व करणारे अनुभवी व्यक्तिमत्त्व. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही, “पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे, आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करतात,” असे विधान त्यांनी केले होते. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यत्व मिळण्याची शरद पवारांच्या विधानाला पार्श्वभूमी होती. त्यातूनही त्यांना दोन समाजात तणाव निर्माण व्हावा, असेच वाटत होते. आता त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे नाव घेतले, तेही त्यांच्या मृत्यूनंतर. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वादग्रस्त विधाने करू नये, असा संकेत सुसंस्कृत-सभ्य समाजात पाळला जातो. शरद पवारांच्या मागे झांझा वाजवत पळणार्‍या तथाकथित बुद्धिजीवी, विचारवंत, पत्रकार-संपादकांच्या टोळक्याला आपले साहेब फार सुसंस्कृत अन् सभ्य असल्याचे वाटत असते. पण, त्यांनाही खोटे पाडण्याचे काम आता शरद पवारांनीच केले अन् बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यूनंतर ते त्यांच्याविषयीचा विखार ओकू लागले. अशा व्यक्तीला प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीला भावी पंतप्रधान म्हणणारे किंवा देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान म्हणणारे किती महामूर्ख असतील, हेही समजते. महत्त्वाचे म्हणजे, असल्या गलिच्छ राजकारणामुळेच शरद पवार कायम भावीच राहिले. कारण, त्यांना सर्व समाजाला एकसंधतेने बरोबर घेऊन वाटचाल करण्याची अजिबात आवड नाही. सर्व समाजात जाती-जातीचे गट उभे ठाकावे आणि त्या तोडफोडीच्या राजकारणातून आपला स्वार्थ साधावा, हेच त्यांचे राजकारण.
 
पुढचा मुद्दा म्हणजे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपण इतिहासकार असल्याचे कधीही म्हटलेले नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे न्याय व अन्यायकारक इतिहासाचे शरद पवारांचे निकष नेमके काय आहेत? कारण, १६ मे, १९७४ सालचे शरद पवारांचे एक मनोगत सध्या समाजमाध्यमांतून वेगाने ‘व्हायरल’ होत आहे. “बाबासाहेब पुरंदरे यांच्या भगीरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली. महाराजांच्याबद्दल अपूर्व आत्मीयता, अभिमान ही शिवशाहीरांची प्रेरणा असल्याने शिवसृष्टी जीवंत वाटते. राज्याभिषेकातील दृश्य अतिशय प्रेरणादायक व उत्कृष्ट आहे. यानिमित्ताने प्रखर राष्ट्रभक्ती, अपार मातृप्रेम, स्वच्छ चारित्र्य या महाराजांच्या खास गुणांची ओळख होते. शिवसृष्टीमधून या गुणांचा प्रसार नव्या पिढीत होण्याची अपेक्षा यानिमित्ताने करुया. शिवशाहिरांच्या प्रयत्नांस संपूर्ण सदिच्छा,” अशा शब्दांत शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे व त्यांच्या शिवसृष्टीचे कौतुक केल्याचे वाचायला मिळते. त्यावेळी शरद पवारांचे न्याय-अन्यायकारी इतिहासाचे निकष वेगळे होते का? की आज त्यांना नव्याने काही साक्षात्कार झाला आणि त्यांचे निकष बदलले? तसे असेल तर शरद पवारांनी ते निकष का सांगितले नाहीत, धुरळा उडवण्यापुरते एखादे विधान करुन ते गप्प का बसले? तर त्याचे उत्तरही राजकारणातच आहे. फडणवीस-शिंदे सरकार सत्तेवर आल्याचे शरद पवारांना पाहवत नाही. पण, जनता आपल्याला विचारत नाही. अशा परिस्थितीत जाती-जातीत विष कालवून आपल्या तुंबड्या भराव्या, असा विचार त्यांनी केला, त्यातूनच ते अशी समाजशांती बिघडवणारी विधाने करत असल्याचे दिसते.