तोतया आयपीएस अधिकाऱ्याला उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये पोलिसांकडून अटक

    दिनांक : 23-Jul-2022
Total Views |
मुंबई : IPS होण्याचं स्वप्न पूर्ण न करू शकलेल्या एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. राकेश त्रिपाठी असं या आरोपीचं नाव आहे. 
 
 

totaya
 
 
 
 
सविस्तर वृत्त असे की , राकेश त्रिपाठी नावाचा हा आरोपी आयपीएस अधिकाऱ्याचा गणवेश घालून वावरायचा. त्याने व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल साइट्सवर पोलिसांच्या गणवेशातला डीपी लावला होता. हा आरोपी एका नामांकित कंपनीत दूध पुरवठादार म्हणून काम करत असल्याचं समोर आले आहे . राकेश हा सुशिक्षित असून तो उत्तमी इंग्रजी बोलतो. त्याचं प्राथमिक शिक्षण चांगल्या इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेतून झालं असून, नंतर त्याने इंदूरला जाऊन बीबीए केलं.
बीबीए पूर्ण केल्यानंतर त्याने नोएडाच्या अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीतून एमबीएची डिग्री मिळवली. त्याला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवायची होती; पण तो नोकरी मिळवू शकला नाही. त्यानंतर त्याने बनावट आयपीएस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. दूध सप्लायर राकेश त्रिपाठीने IPS अधिकाऱ्यांच्या गणवेशातले फोटो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केले आणि आयपीएस म्हणूनच सर्वांशी बोलू लागला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी यशस्वी यादव यांचा फोटो मॉर्फ करून त्यावर आरोपीने त्याचा फोटो लावला होता. एका सॉफ्टवेअरचा वापर करून त्याने यशस्वी यादव यांच्या फोटोवरून चेहरा काढून स्वतःचा चेहरा लावला आणि नंतर तो फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. राकेश त्रिपाठीला आयपीएस यशस्वी यादव खूप आवडायचे. तो त्यांच्यामुळे खूप प्रभावित झाला होता.
 
त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. एका दूध उत्पादन कंपनीत सप्लायर म्हणून काम करणाऱ्या राकेशने इन्स्टाग्राम , फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर आयपीएस गणवेशासह फोटो पोस्ट केला होता. ही बाब उघडकीस येताच महानगर पोलीस आणि सायबर क्राइम टीमने मिळून त्याला अटक केली आणि त्याची रवानगी कारागृहात केली. आरोपी राकेश हा महानगर पोलीस स्टेशन हद्दीतल्या न्यू हैदराबाद कॉलनी येथील रहिवासी आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याने गणवेशासह त्याचा फोटो, डीपी आणि प्रोफाइल पिक्चर म्हणून वापरल्यामुळे त्याच्याविरुद्ध आयपीसीचं कलम 171 आणि 66 आयटी कायद्याच्या अंतर्गत महानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे, असे लखनौच्या एसीपी जया शांडिल्य यांनी सांगितलं.