जळगाव झाला खुनाचा अड्डा ! पिंप्राळा येथे नाल्यात आढळला कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरू

22 Jul 2022 15:06:04
जळगाव : पिंप्राळ्यातील केदार नगरातील सुमारे १५ फूट खोल नाल्यात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास अंदाजे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी प्रौढाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह नाल्यात वाहून आला की घातपात झाला, याबाबत पोलिस तपास करत आहे.
 
 

dead body
 
 
 
 
केदारनगरातील एक नागरिक सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंपळाच्या झाडाला पाणी टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या नागरिकाला मोकळ्या जागे शेजारील नाल्यातील पाण्यात मृतदेह दिसून आला. त्या नागरिकाने पिंप्राळ्यातील नगरसेवक अतुल बारी यांना याबाबत कळवले. त्यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले.
 
मृतदेह गेल्या चार ते पाच दिवसांपासूनच नाल्यात असावा, अशा कुजलेल्या अवस्थेत होता. नाल्याच्या पाण्यात मृतदेह वाहून आला असावा, असा प्रथम संशय व्यक्त करण्यात आला. घातपाताच्या अनुषंगानेही पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी नाल्यातून मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. कुजलेला असल्याने मृतदेहाचे शीर धडापासून गळून वेगळे झाले होते.
 
मृतदेहाच्या हातावर त्रिशूल, टॅटू
 
मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम रामानंद नगर पोलिस करत आहेत. मृतदेहाच्या हातावर त्रिशूल,ओम व तात्यात असे टॅटू आढळून आले. त्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिस करीत होते. पिंप्राळ्यातील नगरसेवक, नागरिकांना ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी बोलविले होते. दुपारपर्यंत अनोळखी मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती.
Powered By Sangraha 9.0