पक्षांतर करणाऱ्या भुसावळच्या माजी नगराध्यक्षासह दहा नगरसेवक अपात्र

18 Jul 2022 21:39:12
भुसावळ : येथील माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह दहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना रात्री नऊ वाजता त्या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Bhusawal 
 
नगराध्यक्ष रमण भोळे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तर त्यांच्यासोबतच भाजपातर्फे प्रमोद नेमाडे, शोभा नेमाडे, अमोल इंगळे, ऍड. बोधराज चौधरी, किरण कोलते, मेघा वाणी, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, शालिनी नारखेडे हे भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा न देताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे यांना अपात्र करण्यात यावी अशी याचिका तत्कालीन नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली होती.
 
 
जिल्हाधिकारी यांनी आज संबंधित नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या सर्वांना 18 डिसेंबर 2021 पासून पाच वर्षासाठी निलंबित केले आहे तसा आदेश त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना पाठवला आहे . त्यामुळे ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल देण्यात आल्यामुळे भुसावळ येथील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे . याचिकाकर्त्या पुष्पा बत्रा यांच्या तर्फे ऍड. राजेंद्र राव यांनी काम पाहिले.
 
 
Powered By Sangraha 9.0