बनावट खरेदीखत : भावाने बळकावली भावाच्या हिश्श्याची शेती

    दिनांक : 11-Jul-2022
Total Views |
जळगाव : कोरोना महामारीचे कारण दाखवून, आईचे दुसरे आधारकार्ड तयार करून भावाने वडिलोपार्जीत शेती परस्पर स्वतःच्या नावे केल्याचा प्रकार एरंडोल तालुक्यातील फरकांडे गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
 

fake-documents1 
राजेंद्र रामदास ठाकूर (रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठाकूर कुटुंबीयांची फरकांडे गावात वडिलोपार्जीत शेती आहे. वडील वारलेले असल्यामुळे खरेदी-विक्रीचे अधिकारी त्यांच्या आई सुमनबाई ठाकूर यांच्याकडे होते. दरम्यान, त्यांचा भाऊ संजय व वहिणी संगीता संजय ठाकूर यांनी सन २०२० मध्ये आई सुनबाई यांना फरकांडे येथून एरंडाेलला नेले. कोरोनाची साथ सुरू आहे, अशी भीती दाखवून सुमनबाई यांचे आधारकार्ड असतानाही दुसरे आधारकार्ड काढले. याच आधारकार्डच्या मदतीने शेतीचे बनावट खरेदीखत तयार करून वडिलोपार्जीत शेती संजय व संगीता ठाकूर यांनी आपल्या नावे करून घेतली.
 
ठाकूर यांच्या आई सुमनबाई यांचे निधन झाले. यानंतर शेतीच्या वाटणीवरून राजेंद्र व संजय हे समोरासमोर आले. यावेळी संजय यांनी शेती आपल्या नावावर असल्याचे कागदपत्र सादर केले. हे कागदपत्र, खरेदीखत बनावट असल्याचा दावा राजेंद्र ठाकूर यांनी केला आहे. आई सुमनबाई यांचे दुसरे आधारकार्ड तयार करून फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. राजेंद्र ठाकूर यांनी कासोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संगीता व संजय रामदास ठाकूर या दोघांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज कोळी तपास करीत आहेत.