महिला कर्मचार्याशी गैरवर्तन भोवले; ‘महावितरण’चा व्यवस्थापक, लिपीक अखेर निलंबित
अद्यापही दोघेही मोकळेच
दिनांक : 07-Jun-2022
Total Views |
‘तरूण भारत’चा दणका
जळगाव : महावितरण कंपनीत कंत्राटी महिला कर्मचार्याकडे शरीरसुखाची मागणी करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी महावितरणचे एच.आर.व्यवस्थापक उध्दव कडवे आणि कनिष्ठ लिपीक राजेंद्र आमोदकर यांना महावितरणने अखेर निलंबित केले. यासंदर्भात ‘तरूण भारत’ने २९ मे रोजी वृत्त प्रकाशित करुन या घटनेला वाचा फोडली होती. त्यानंतर कामगार संघटनांनी या घटनेचा निषेध करीत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी अद्यापही या संशयितांना अटक न केल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे सर्व जिल्ह्याचे लक्ष याकडे लागले आहे.
जळगाव येथील महावितरण कार्यालयातील एच.आर.व्यवस्थापक उध्दव कडवेने विभागातील एका महिला कंत्राटी कर्मचार्याशी आक्षेपार्ह गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार २०१७ ते २०२१ दरम्यानही सुरूच होता. अशा स्थितीत १२ मे, २०२२ रोजीदेखील एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवेने पुन्हा या महिलेसोबत गैरवर्तन करीत तिला मानसिक व शारीरिक छळ करीत तिला कामावरून काढले. त्याचप्रमाणे याच कार्यालयातील राजेंद्र आमोदकर (रा. जळगाव) याने देखील गैरवर्तन करून मी तुला घरी सोडतो असे सांगत तिच्या गळ्यात हात टाकून अर्वाच्च्य भाषेत बोलून तिचा विनयभंग केल्याची तक्रार या महिलेने पोलिसात केली होती.
कर्मचार्यांद्वारे द्वारसभा, निषेध
महिला कर्मचार्याशी गैरवर्तन करणार्या व्यवस्थापकाविरोधात जळगाव परिमंडळ महावितरण संयुक्त कृती समितीतर्फे ३१ मे रोजी द्वार सभा घेवून या घटनेचा निषेध केला होता. तसेच व्यवस्थापकाला अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती. या महिलेने १ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून संशयित आरोपी एच.आर. व्यवस्थापक उध्दव कडवे आणि राजेंद्र आमोदकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.
कृती समितीद्वारे समाधान व्यक्त
या घटनेसंदर्भात जळगाव परिमंडळ महावितरण संयुक्त कृती समितीने निषेध नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली होती. घटनेनंतर १० दिवसांनी त्याची दखल घेत महावितरणने या दोघांना निलंबित केल्याने कृती समितीने समाधान व्यक्त केले.
नवीन व्यवस्थापक नियुक्त
पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर महावितरणचे कार्यकारी संचालक (मासं) तथा सक्षम अधिकार्यांनी एच.आर.व्यवस्थापक उध्दव कडवे आणि लिपीक राजेंद्र आमोदकर यांना निलंबित केले. याबाबतचे आदेश ३ जून रोजी संबंधित विभागाला देण्यात आले होते. दरम्यान, जळगाव मंडळाचा व्यवस्थापक (मासं) या पदाचा अतिरिक्त पदभार शिवराम बारेला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबचे पत्र जळगाव मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी काढले आहे.