औरंगाबाद नव्हे संभाजीनगर, उस्मानाबाद नव्हे धाराशिव!

29 Jun 2022 20:10:28
ठाकरे मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर
 
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी २९ रोजी नामांतराचे विविध निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद शहराचं देखील धाराशीव म्हणून नामांतरास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचा नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. अखेर महाविकास आघाडी सरकारकडून याबाबतचा आज निर्णय घेण्यात आला आहे.
 

Sambhaji Nagar
 
 
 
शिवसेनेच्या शिंदे गटाने ५० आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे हे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याची शक्यता मानली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने औरंगाबाद नामकरणाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे फक्त औरंगाबादच नाही तर उस्मानाबाद शहराचं देखील धाराशीव नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून भावनिक विधान केलं. "तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी धन्यवाद! आता जी कायदेशिर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊ. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली. या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावले असतील तर मी माफी मागतो", असं मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांना कॅबिनेट बैठकीत म्हणाले.
Powered By Sangraha 9.0