कुटुंबकेंद्रित पक्षांना इशारा

    दिनांक : 28-Jun-2022
Total Views |

जे जे घराणेकेंद्रित पक्ष आहेत, त्यांनी खरे म्हणजे आतापासूनच एकनाथ शिंदेंच्या बंडातून बोध घ्यायला हवा. कारण, पक्ष स्थापन करणारा नेता कर्तृत्ववान असू शकेल. पण, त्याचे वारसही तसेच असतील असे नाही. ते कर्तृत्वशून्य वारस त्या राजकीय पक्षांना राजकारणात टिकून राहू शकणारे नेतृत्व देऊ शकत नाहीत.

 
 
 
rahul gandhi
 
 
बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधाच्या कारणाने एकनाथ शिंदेंनी बंड केले अन् अख्खी शिवसेना हादरली. जवळपास ४० आमदारांसह गुवाहाटीत बसलेल्या एकनाथ शिंदेंमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सत्तासिंहासनावर टांगती तलवार लटकली. आता तर सर्वोच्च न्यायालयानेदेखील शिंदे गटातील १६ आमदारांविरोधातील अपात्रतेच्या नोटिसीला १२ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली अन् त्यांच्यावरील विधानसभा उपाध्यक्ष करु इच्छित असलेली कारवाई बराच काळपर्यंत टळली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे येत्या १५ दिवसांत राज्याच्या राजकारणातला सत्तासंघर्ष आणखी नाट्यमय घडामोडींनी रंगत चालल्याचेही पाहायला मिळू शकेल. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडाने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातही मोठी उलथापालथ होत असून, ती घराणेकेंद्रित राजकीय पक्षांच्या अस्तित्वाशी संबंधित आहे.
 
देशातला सर्वात मोठा घराणेशाहीचा पक्ष म्हणजे काँग्रेस. ब्रिटिशांविरोधात सनदशीर मार्गाने लढण्याच्या हेतूने स्वातंत्र्यपूर्व भारतात देशातील बुद्धिमंत, विचारवंतांनी एकत्रित येऊन काँग्रेसची स्थापना केली. पण, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस फक्त गांधी-नेहरु घराण्याच्या मालकीची झाली. इंदिरा गांधींनी काँग्रेसला गांधी घराण्याच्या दावणीला अधिक जोरदारपणे बांधले अन् आज त्यांचेच वारस काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वपदी आहेत. पण, त्यांचे नेतृत्व त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्याकडे आलेले नाही, तर फक्त घराण्याचे वारस असल्यानेच आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारावेळी ‘काँग्रेसमुक्त भारता’ची संकल्पना मांडली होती. पण, त्या संकल्पनेचा संबंध ‘काँग्रेसमुक्त भारता’पेक्षाही ‘गांधी परिवारमुक्त काँग्रेस’शी अधिक असल्याचे दिसते. त्याच आधारावर पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी मागणी करत काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधींविरोधात भूमिका घेतली. तथापि, काँग्रेसने त्याकडे लक्ष दिले नाही आणि अजूनही तो पक्ष राहुल गांधी वा प्रियांका गांधी चमत्कार घडवून निवडणुका जिंकून देतील, या आशेवर आहे. पण, जनतेने मात्र काँग्रेससारख्या घराणेकेंद्रित पक्षाला आधीच लाथाडलेले आहे अन् ज्योतिरादित्य सिंधियांसारखे अनेक तरुण नेते गांधी कुटुंबाविरोधात काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. तरी अजूनही काँग्रेसला शहाणपण आल्याचे दिसत नाही अन् याचमुळे त्या पक्षाचे अस्तित्वही शून्यवत होऊ शकते वा एकनाथ शिंदेंसारख्या बंडाचा त्या पक्षालाही सामना करावा लागू शकतो.
 
एकनाथ शिंदेंच्या बंडाला इतर मुद्द्यांच्या जोडीने घराणेशाहीचादेखील कोन आहे. कारण, एकनाथ शिंदे तब्बल ४० वर्षांपासून शिवसेनेसोबत आहेत. रस्त्यावरच्या लढाईपासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत त्यांनी आपले कर्तृत्व, नेतृत्व सिद्ध केलेले आहे. पण, शिवसेनेत त्यापेक्षाही घराणेशाहीलाच महत्त्व दिले गेले. शिवसेना पक्षप्रमुखपद उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आले आणि २०१९ साली उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती मोडून सत्ता स्थापन केली, तेव्हाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वतःकडेच ठेवले. घराणेशाही नसती, तर त्यांनी मुख्यमंत्रिपदावर खरोखरच सामान्य शिवसैनिकाला बसवले असते, पण तसे झाले नाही. सरकार आल्यानंतरही एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याचे महत्त्व कमी करण्याबरोबरच त्यांच्या विषयांत आदित्य ठाकरेंचा हस्तक्षेपही वाढू लागला. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी ठाकरे कुटुंबाविरोधात जात स्वतःचा वेगळा मार्ग निवडणे साहजिकच म्हटले पाहिजे.
 
आज २१व्या शतकात भारतात अनेक क्षेत्रात नवसंकल्पनांचा उदय होत आहे. ज्यांना उद्योगाची, व्यवसायाची कसलीही पार्श्वभूमी नाही, तेदेखील उद्योग, व्यवसायात अफाट यश मिळवत आहेत. आजच्या भारताच्या आशा, आकांक्षा अतिशय वेगळ्या आहेत आणि त्या घराणेकेंद्रित राजकीय पक्षांना समजून घेता येत नाहीत. घराणेशाहीतले पक्ष राजकीयच नव्हे, तर देशाच्या लोकशाही आणि तरुणांसमोरील मोठे शत्रू झालेले आहेत. एकाच कुटुंबाच्या हाती पक्षाची व निवडणुका जिंकल्यास राज्याची सत्ता एकवटल्यास त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचा, आर्थिक घोटाळ्यांचाच एककलमी कार्यक्रम राबवला जातो. राज्य वा देशाच्या विकासाऐवजी स्वपरिवाराचा विकास, स्वतःच्या तिजोर्‍या भरण्यावरच त्यांच्याकडून जोर दिला जातो, तर जिथे घराणेशाहीमुक्त राजकीय पक्षाची सत्ता येते, तिथे विकासाचे मार्ग सर्वांसाठी खुले होतात, उत्तर प्रदेश हे त्याचे उत्तम उदाहरण. पण, याच उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबाच्या समाजवादी पक्षाला वा मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला ते समजत असल्याचे दिसत नाही. मुलायमसिंहांनंतर समाजवादी पक्ष अखिलेश यादवांच्या हातात आला, तर मायावतींचा बसपही आकाश आनंद यांच्याच हातात जाईल, अशी स्थिती आहे. जम्मू-काश्मीरमधील ‘नॅशनल कॉन्फरन्स’वर फारुख अब्दुल्ला व ओमर अब्दुल्ला या पितापुत्रांचा कब्जा आहे, तर ‘पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी’वर मुफ्ती कुटुंबाचा. राष्ट्रीय जनता दल लालुप्रसाद यादवांचा मुलगा तेजस्वी यादवांच्याच ताब्यात गेला अन् ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर अभिषेक बॅनर्जीच कब्जा करतील, हे जगजाहीर आहे. तिकडे दक्षिणेतील निधर्मी जनता दल देवेगौडांचे पुत्र कुमारस्वामींनी ताब्यात घेतला असून, तामिळनाडूतील द्रमुकही करुणानिधींचा मुलगा असल्यानेच एम. के. स्टॅलिन यांच्याकडे आला.
 
आज एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले त्याला ठाकरे कुटुंबीयांचा त्यांच्या कामातील हस्तक्षेपाचे कारण आहेच, त्याच कौटुंबिक नेतृत्वाने चालणारा महाराष्ट्रातील आणखी एक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुप्रिया सुळे वा अजित पवार आणि नंतरही रोहित पवारांकडेच जाण्याची शक्यता अधिक. पण, जे जे घराणेकेंद्रित पक्ष आहेत, त्यांनी खरे म्हणजे आतापासूनच एकनाथ शिंदेंच्या बंडातून बोध घ्यायला हवा. कारण, पक्ष स्थापन करणारा नेता कर्तृत्ववान असू शकेल. पण, त्याचे वारसही तसेच असतील असे नाही. ते कर्तृत्वशून्य वारस त्या राजकीय पक्षांना राजकारणात टिकून राहू शकणारे नेतृत्व देऊ शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंच्या रुपात त्याचा दाखलाही मिळत आहे, अशा परिस्थितीत घराणेकेंद्रित पक्षांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाकडे येणार्‍या संकटाची चाहूल म्हणून पाहिले पाहिजे व वेळीच आपल्या मुला-मुलींकडे कर्तृत्व नसूनही नेतृत्व देण्याऐवजी खर्‍याखुर्‍या कर्तृत्ववानाकडे नेतृत्व दिले पाहिजे. तरच त्यांचे अस्तित्व टिकून राहू शकते.