शिवसेनेस पुन्हा एक जोरदार झटका; 'हा' मंत्री नॉट रिचेबल

26 Jun 2022 18:01:12
मुंबई : राज्यातील आणखी एक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात आता समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल आहेत. कालच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला ते उपस्थित होते, मात्र त्यानंतर आज सकाळपासून त्यांचा संपर्क झालेला नाही. शिंदे गटाच्या बंडखोरीने शिवसेना हादरली असून बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.
 
 
 uday samant
 
 
शिवसेनेतून शिंदे गटात आमदारांच संख्याबळ हे वेगाने वाढत आहे. एकनाथ शिंदे गटात शिवसेनेचे जवळपास 40 आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास 50 आमदारांचा समावेश आता पर्यंत आहे. सर्व आमदार सध्या गुवाहाटीमध्ये थांबले आहेत. या बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलण्याची कायदेशीर लढाई आता सुरु झालेली आहे.
 
उदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेत विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.
 
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन एक चारोळी केली आहे. त्यामध्ये, उपरोधात्मक टोला लगावत शिवसेनेला डिवचलं आहे. सामंत यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण हे खातं होतं. त्या खात्याला अनुसरुन त्यांनी सामंत यांच्यावर उपहासात्मक टिका केली आहे.
 
थेट पक्षप्रमुखांनाच केलं नापास
उतरवला शिवसेनेचा गणवेष
उच्च शिक्षणमंत्र्यांनी घेतला
गुवाहाटीच्या शिंदे कॉलेजमध्ये प्रवेश
Powered By Sangraha 9.0