एकनाथ शिंदेंचे काय चुकले?

    दिनांक : 25-Jun-2022
Total Views |

उद्धव ठाकरे व शिवसेनेचे अन्य नेते तोंडाने जरी हिंदुत्ववादाचा उल्लेख करत असले, तरी प्रत्यक्षात ते हिंदुत्वाविरोधात कृती करत असल्याचेही कारण आहे. ते पाहता, एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या विचारांच्या रक्षणासाठी, पुरस्कारासाठी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल बंड उचित ठरते.

 
 
 
shinde
 
  
“शिवसेना हिंदुत्वापासून कधीही दूर जाऊ शकत नाही, म्हणूनच आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. विधिमंडळात हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बुधवारच्या आपल्या फेसबुक संवादातून आपण हिंदुत्ववादीच आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला, तर चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संगत करत हिंदुत्वाला वार्‍यावर सोडल्याचा आरोप केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही हिंदू, हिंदुत्वाचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकले नाहीत. कारण, तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची!
 
उद्धव ठाकरेंच्या गेल्या अडीच वर्षातील कारभाराकडे पाहिल्यास त्यांचा आपण हिंदुत्ववादी असल्याचा केलेला दावा फोल ठरतो, तर एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वासाठी काम करता येत नसल्याचा केलेला दावा बरोबर ठरतो. त्याला काही कारणे आहेत, हिंदूविरोधी घटना, घडामोडींची पार्श्वभूमी आहे. इतकेच नव्हे, तर उद्धव ठाकरे व शिवसेनेचे अन्य नेते तोंडाने जरी हिंदुत्ववादाचा उल्लेख करत असले, तरी प्रत्यक्षात ते हिंदुत्वाविरोधात कृती करत असल्याचेही कारण आहे. ते पाहता, एकनाथ शिंदेंनी हिंदुत्वाच्या विचारांच्या रक्षणासाठी, पुरस्कारासाठी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल बंड उचित ठरते.
 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी आल्यापासून काहीच दिवसात शिवसेना पदाधिकारी पांडुरंग सकपाळ यांनी मुला-मुलींसाठी अजान पठण स्पर्धेचे आयोजन केले. अजानचा आवाज कानाला अतिशय गोड वाटतो, असे विधान त्यांनी केले. तथाकथित हिंदुत्ववादी शिवसेनेची यापुढची वाटचाल धर्मनिरपेक्षता म्हणजेच मुस्लिमानुनयाकडे होईल, हे स्पष्ट झाले. मुंबईच्या माजी महापौर हेमांगी वरळीकर यांनी प्रभादेवी मंदिरासमोर ख्रिश्चन स्मृतीस्तंभ उभा करत हिंदूंना डिवचण्याचा प्रकार केला, तर सत्तेत सहभागी तिन्ही पक्षांनी, पक्षनेत्यांनी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले.
 
पण, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात अशा इफ्तार पार्ट्यांच्या आयोजनावर शिवसेनेकडूनच टीका होत असे. मात्र, दोन्ही काँग्रेसशी घरोबा केल्याने शिवसेनाही इफ्तार पार्ट्यांचा आनंद घेऊ लागली. इतकेच नव्हे, तर उद्धव ठाकरेंच्या सत्ताकाळात पुण्याच्या पोलीस आयुक्तांसह इतरही विभागातील शासकीय अधिकार्‍यांनी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले. त्यावरही शिवसेनेने कधी आक्षेप घेतला नाही. मशिदींवरील भोंग्यांबाबतही उद्धव ठाकरेंच्या सरकारने मुस्लिमांसमोर शेळपटपणा केला. पण, हिंदूंविरोधात मात्र कायद्याचा बडगा उगारला. मानखुर्दमधील करिश्मा भोसले या मुलीने मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजाने त्रास होत असल्याची तक्रार केली, तर तिच्याविरोधातच गुंडगिरी केली गेली.
 
पण, भाजप नेते मोहित भारतीय यांनी मंदिरांसाठी भोंगे वाटपाचे काम केले, तर त्यांच्याविरोधात कारवाईसाठी उद्धव ठाकरे सरकार पुढे सरसावले. हनुमान चालीसाला विरोध करताना, रस्त्यावर हनुमान चालीसा पठण करणार्‍यांविरोधात देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करताना रस्त्यावर नमाज पठण करणार्‍यांना मात्र पाठीशी घातले. कोरोना संपला तरी गेल्या वर्षी वारी, गणेशोत्सव, दहीहंडी, होलिकोत्सवावर बंधने लादली. नियमांचे जंजाळ जारी करत हिंदूंनी आपले सण साजरे करू नये, अशी परिस्थिती निर्माण केली. पण, ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांना खुशाल परवानगी दिली. अशाप्रकारे मुस्लिमांना काहीही करायला मोकळीक अन् हिंदूंना मात्र कायदे, नियमांचा धाक असा उद्योग उद्धव ठाकरे सरकारने केला.
 
उद्धव ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांत दहावी आणि बारावीच्या परीक्षा फॉर्ममधून ‘हिंदू’ शब्द हटवत तिथे ‘नॉन-मायनॉरिटी’ असा नवाच शब्दप्रयोग करण्यात आला. इथेच उद्धव ठाकरेंना ‘हिंदू’ शब्दाची प्रचंड ‘अ‍ॅलर्जी’झाल्याचे दिसून येते, तर हिंदूंच्या शतकानुशतकांच्या लढ्यातून निर्माण होत असलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीस्थळावरील श्रीराम मंदिरात जमीन घोटाळा झाल्याचा आरोप करत सरसंघचालकांनी त्याबाबत खुलासा करण्याची मागणीही शिवसेना खासदार संजय राऊतांनी करून दाखवली. त्यावरून शिवसेनेला अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणीही बघवत नाही, श्रीराम मंदिरातही त्यांना खोडा आणायचा आहे, हे म्हणता येते अन् यामागे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या साथीने स्थापन केलेले सरकार टिकण्याचीच अगतिकता होती.
 
त्याचवेळी दिल्लीतील जहांगिरपूरीत हनुमान जयंतीला उसळलेली दंगल हिंदूंनीच घडवल्याचा दावा संजय राऊतांनी केला. म्हणजे, हिंदू दहशतवादाची संकल्पना रुजवणार्‍यांबरोबर जाऊन सत्ता मिळवणार्‍या शिवसेनेला हिंदूच दंगलखोर वाटले. यासोबतच काँग्रेसच्या शिदोरी नियतकालिकात स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘माफीवीर’ म्हटले गेले तरी त्याविरोधात कोणतीही कृती शिवसेनेने केली नाही. याबरोबरच मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ करणार्‍या उद्धव ठाकरे सरकारने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्यासाठी मात्र चांगलेच प्रयत्न केले. याव्यतिरिक्त इतरही अनेक घटना आहेत, ज्यात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी बाणा दाखवणे गरजेचे होते.
 
जसे की, पालघरमधील साधू हत्याकांड, हिंदूविरोधी गरळ ओकणार्‍या शरजील उस्मानीचे भाषण, काश्मीरच्या आझादीचे फलक झळकावणारी महेक प्रभू, श्रीराम नवमी मिरवणुकीत धिंगाणा घालणार्‍यांविरोधात शिवसेनेने कारवाई करायला हवी होती. पण, ते न करता शिवसेना नेतृत्व उत्तर प्रदेशातील दंगलीवर बडबड करत होत, तर बंगालमधील हिंसाचारावर मूग गिळून गप्प होते. राज्यातील विविध शहरांत ‘रझा अकादमी’ने दंगली घडवल्या तरी त्याविरोधात तत्काळ ठोस कारवाई उद्धव ठाकरेंकडून झाली नाही. मुस्लीम लांगूलचालनासाठी त्यांना पाठीशी घातले गेले.
 
याच कारणासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईतील उड्डाणपुलाला ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्तीचे नाव देण्याची शिफारस केली होती. त्याच कारणाने मालाडमधील क्रीडा संकुलाला क्रूरकर्मा व लाखो हिंदूंच्या हत्या करणार्‍या टिपू सुलतानचे नाव देण्यात आले. मालेगावमधील हज हाऊसला ‘हिजाब’च्या मुद्द्यावरुन राष्ट्रविरोधी, हिंदूविरोधी घोषणाबाजी करणार्‍या मुस्कान बीबीचे नाव देण्यात आले. तसेच, विविध ठिकाणी हज हाऊसची उभारणीही मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळातच सुरू झाली.
 
‘झाकीर हुसैन मदरसा मॉडर्नायझेशन स्किम’अंतर्गत मदरशांना मोठ्या प्रमाणावर निधीही उद्धव ठाकरे सरकारने दिला. इतकेच नव्हे, तर मुस्लिमांना निरागस ठरवत ‘हिंदू दहशतवादा’ची संकल्पना तयार करणार्‍यातले प्रमुख व्यक्ती म्हणजे परमबीर सिंग यांनाही उद्धव ठाकरे सरकारनेच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बसवले. मुस्लीम तुष्टीकरणासाठी मुस्लीम तरुणांना पोलीस व प्रशासकीय सेवेत मोठ्या प्रमाणावर दाखल होता यावे म्हणून योजना सुरू केल्या. पण, ग्रामीण भागातील वा शहरी भागातील मराठी, हिंदू तरुणांसाठी तसा काही उपक्रम सुरू केला नाही. यासोबतच मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून अनंत करमुसे या तरुणाला मारहाण केली गेली, पत्रकार अर्णव गोस्वामींना अटक करण्यात आले, अभिनेत्री कंगणा राणावतचे घर तोडण्यात आले.
 
यावरून उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदूंना विरोध करणारे तर मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणारेच असल्याचे दिसून येते. एकनाथ शिंदेंसारख्या बाळासाहेब ठाकरेंच्या कडव्या कार्यकर्त्याला ते रुचणे शक्य नव्हते. पण, उद्धव व आदित्य हे पिता-पुत्र आपल्याच मस्तीत धुंद होते, अन् विदुषकाला चाणक्य करुन २५ वर्षांच्या सत्तेची स्वप्ने पाहत होते. उद्धव ठाकरेंच्या याच हिंदूविरोधी कारभाराला वैतागून, जनतेच्या मनातली भावना ओळखून एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी विचारधारेपासून भटकलेल्या उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेतली व त्यात त्यांचे काही चुकल्याचे अजिबात दिसत नाही.