शिवसेनेने काय गमावले?

    दिनांक : 23-Jun-2022
Total Views |
नामधारी पक्षप्रमुखांप्रमाणे त्यांची आता स्थिती होईल. संजय राऊत व त्यांच्या बंधूंनी गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांची माया त्यांना राजकीय नेतृत्व देऊ शकणार नाही.
 
 
 
 
thakare1
 
 
 
 
सध्याचा घटनक्रम काळजीपूर्वक पाहिला, तर महाराष्ट्र राजकीय अराजकाकडे निघाला आहे, यात काही शंका नाही. हे अराजक कुणी खमका प्रशासक येऊन मुख्यमंत्रिपदावर बसत नाही तोपर्यंत थांबणारे नाही, हेदेखील स्पष्ट आहे. सध्या उपलब्ध पर्यायांत देवेंद्र फडणवीस हेच सगळ्यात योग्य आहेत, यातही काही शंका नाही. मात्र, राजकारणाला स्वत:चा तर्क आणि गती असते. राजकारण त्याच मार्गाने जाते आणि आपला प्रवास पूर्ण करते. महाराष्ट्रातही तेच होईल. प्रश्न उरेल तो शिवसेनेचा. आजघडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे सत्तेशिवाय गमावण्यासारखे काहीच नाही.
 
सत्तेत असताना त्यांनी जे काही कमावले, ते त्यांच्या पुढच्या काही पिढ्यांची सोय करून ठेवेल. शिवसेना आणि शिवसेनेचे लोक यापेक्षा निराळे नाहीत. ‘लोक’ शब्द वापरला आहे. कारण, ‘नेता’ म्हणावा असा कोणताही नेता आता शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेत उरलेला नाही. ठाकरे परिवार वगळला, तर आता ‘नेतृत्व कोण’ हा प्रश्नच आहे. आता जे आहेत ते निरनिराळे कार्यक्रम ‘मॅनेज’ करणारे ‘मॅनेजर’ आहेत. मूळ मुद्दा आता ठाकरे परिवाराच्या नेतृत्वाचाच आहे; जे या बंडामुळे आता गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे. खरंतर कुठलाही पक्ष असा संपत किंवा सुरू होत नाही.
 
शिवसेनेसारखा पक्ष चळवळीतून आलेला असतो, तो तर अशा वादळातही तग धरतो, हाच शिवसेनेचा इतिहास राहिला आहे. छगन भुजबळ ते राज ठाकरे यांच्यासारखे मातब्बर नेते शिवसेनेला सोडून जाऊनही शिवसेना संपली नव्हती; उलट मिळेल त्या मार्गाने सत्ता मिळवून शिवसेना गबर झाली. सत्तेतून आलेली वाढ सूज होती, वाढ नव्हे हे आता शिवसेनेच्या नेतृत्वाच्या लक्षात आले असावे, म्हणजे किमान आतातरी सेनेच्या हे लक्षात यायला हवे. ‘लढवय्या लोकांची संघटना’, ‘जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारी शिवसेना’ हे २० वर्षांपूर्वीच्या शिवसेनेचे चित्र होते.
 
मात्र, त्याची जागा हळूहळू सत्तालोलूपांनी घेतली. मराठी माणसाचा मुंबईतला घसरता टक्का, त्यामुळे बंद होणार्‍या मराठी शाळा यांसारख्या शिवसेनेच्या अस्मितेच्या राजकारणाच्या प्रश्नांकडेही शिवसेनेकडे उत्तर नव्हते. बाळासाहेबांनी अत्यंत बेमालूमपणे किंवा अपरिहार्यता म्हणून आपले चिरंजीव असलेल्या उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व सोपविले आणि तिथून शिवसेनेसमोरच्या नव्या कालखंडाला सुरुवात झाली. राजकारणात चूक किंवा बरोबर असे काहीच नसते, जे असते ते काळाचे गणित. या गणितात मात्र उद्धव ठाकरे पुरते फसले. याची कारणेही त्यांच्या कार्यपद्धतीतच दडलेली आहेत.
 
शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा मिळाला मुंबईच्या दंगलीत. बेहरामपाड्यात आपल्या शिवसैनिकांसमवेत उतरलेले बाळासाहेब ठाकरे हे हिंदूंसाठी ‘आयकॉन’ ठरले. यापूर्वी बाळासाहेबांनीही आपल्या राजकीय अस्त्वित्वासाठी अनेक प्रयोग केले होते. राजकारणाला असे प्रयोग लागतातच. आतून-बाहेरून या आणि अशा कितीतरी छुप्या युत्या त्यांनीही केल्या. काँग्रेसच्या राषट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या कृतीवर चांगलीच टीकाही झाली होती. मात्र, आपला हिंदुत्वाचा भगाव चोला मात्र त्यांनी काढून फेकला नव्हता. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी ते केले आणि त्यांना संजय राऊतांनी त्यासाठी भरीस पाडले.
 
सत्ता येते-जाते, पण तुमच्या अस्त्वित्वाच्या कारणांशीच, तुमच्या अधिष्ठानांशीच तुम्ही प्रतारणा केली. तुमची अवस्था कशी केविलवाणी होते, त्याचे उदाहरण समोर आहे. उद्धव ठाकरेंनी हे केळ्याच्या रोपावर फणसाचे केलेले कलम मोठी काटेरी फळे घेऊन आले आहे. कुठलेही बंड नेतृत्वासमोर आव्हाहने उभी करते. मात्र, नेतृत्वाला ते मोडून काढून संघटनेवर आपली मांड पुन्हा ठोकावी लागते. एकनाथ शिंदेंनी उभे केलेले बंड उद्धव ठाकरेंना पेलवणारे नाहीच. बाळासाहेबांच्या काळात असे बंड करणार्‍यांचे काय केले जायचे, ते सगळ्यांनीच पाहिले होते.
 
आता शिंदेंना तशी शिक्षा देण्याची हिंमत असलेला कुणीच नाही. त्याचे कारण लोकांमधून निवडून येणार्‍या लोकांपेक्षा सेनेच्या नेतृत्वात विधान परिषद आणि राज्यसभेच्या माध्यमातून म्हणजेच मागच्या दाराने आत गेलेल्यांचाच भरणा मोठा आहे. ही मंडळी पक्ष चालवित नाहीत. सत्तेत त्यांना स्थान नसते. मग साहेबांच्या कानापर्यंत पोहोचून ती जागा अडवून ठेवायची आणि अन्य कुणालाही तिथपर्यंत पोहोचू द्यायचे नाही, असा हा शिरस्ता! यातून लोक दूर गेले. राजकारण ही छंदी माणसाच्या आवाक्यातली गोष्टच नाही.
 
उद्धव ठाकरेंच्या पदरात आज ‘पदच्युत केलेला नेता’ आणि ‘गमावलेले मावळे’ अशी दूषणे पडली आहेत. इतके होऊनही सध्या ज्या केविलवाण्या स्वरात ते आपल्या शिवसैनिकांना साद घालत आहेत, त्यात राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे म्हणून ‘परत या’ असा सूर आहे. ज्यांच्यावर कुणीच भरवसा ठेवला नाही, अशा शरद पवारांवर भिस्त ठेवून हा सगळा खेळ सुरू आहे. शिवसेनेला सत्ता मिळाली, मात्र अधिकार फारसे मिळालेले नाहीत. छान छान कार्यक्रमात मुख्यमंत्री व त्यांचे सुपुत्र रमले असले तरी खाली काम करणारा शिवसैनिक कामे होत नसल्याने ओरड करीत होता. मात्र, त्याचा आवाज सत्तेत मश्गूल असलेल्यांच्या कानापर्यंत पोहोचला नाही.
 
एकनाथ शिंदे दावा करीत असल्याप्रमाणे त्यांच्यासोबत ५० आमदार असतील, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला काही अर्थच राहात नाही आणि बंड शमले असे गृहीत धरले तरी यापुढे शिंदेंकडे पाहूनच त्यांना कुठल्याही प्रकारच्या निर्णयांचा विचार करावा लागेल. नामधारी पक्षप्रमुखांप्रमाणे त्यांची आता स्थिती होईल. संजय राऊत व त्यांच्या बंधूंनी गोळा केलेल्या कोट्यवधी रुपयांची माया त्यांना राजकीय नेतृत्व देऊ शकणार नाही. पुढे काय घडेल याचा घटनाक्रम सुस्पष्ट आहे. शिवसेनेच्या राजकीय उत्कर्षाची सुरुवात ठाण्यातून झाली होती. ठाणे महानगरपालिका ही शिवसेनेने जिंकलेली पहिली महानगरपालिका. आत शिवसेनेच्या अपकर्षाची सुरुवातही ठाण्यातूनच झाली आहे. घराण्याच्या कच्छपी लागून राजकीय कारकिर्द करू इच्छिणार्‍या मंडळींनाही हा घटनाक्रम जो संदेश द्यायचा तो देणारा असेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.