जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शिवसैनिकांनी एकत्र येत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत पाठिंबा दिला आहे. जळगाव शहर शिवसेनेतर्फेही टॉवर चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. शिवसेनेतून बाहेर गेलेल्या आमदारांनी पक्षात परत यावे असे आवाहन केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापलेलं असून राजकीय समीकरणे बदलणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेत पक्षांतर्गत नाराजी आता समोर आलेली असून गटबाजी सुरु झालेली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्य सरकार मधील शिवसेनेतच फूट पडलेली आहे. यामुळे राज्य सरकार हे अस्थिर झालेले दिसून येत आहे. यासाठी मुख्यमंत्री यांना धीर देण्यासाठी टॉवर चौकात शिवसैनिक एकत्र आले होते.
यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना शहरच्या वतीने शिवसेना कार्यलय ते टॉवर चौकात पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक सचिन पाटील, प्रशांत नाईक, युवा सेनेचे शिवराज पाटील, शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, प्रशांत सुरडकर. गजानन मालपुरे, ज्योती शिवदे, मंगला बारी, श्याम कोगटा आदी सहभागी झाले होते. टॉवर चौकात मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.